चीनमधील कोरोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्था फणफणली!

अमेरिका व चीन मधील व्यापारयुध्दात होरपळलेली जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसत नसतांना आता चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. चीनमध्ये पसरत असलेला धोकादायक आणि प्राणघातक कोरोनाव्हायरस मानवासह उद्योगजगतावरही विपरित परिणाम करीत आहे. एक-एक करून वेगवेगळी क्षेत्रे त्याला त्याला बळी पडत आहेत. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधीच भारताचा जीडीपीचा रेट गेल्या पाच वर्षात निच्चांकी पातळीवर आहे. बँकिंग क्षेत्र मोडकळीस निघण्याच्या मार्गावर आहे. वाहन उद्योगावर मंदीचे सावट पसरले आहे. देशांतर्गत महागाईने कळस गाठला आहे. भारतातील या आर्थिक मंदीच्या काळात कोरोनामुळे आयात उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने देशातील मॅन्यूफॅक्चरिंग, ऑटो, केमिकल आणि फार्मा उद्योगांना याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.


चीनमधून आयात होणार्‍या सर्व बाबींवर परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे स्वप्न देशवासियांना दाखवत असले तरी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेला एकामागून एक हादरे बसतच आहेत. अमेरिका - चीनमधील ट्रेडवॉर, अमेरिका - इराणमधील युध्दज्वर, ब्रिटनचे ब्रेग्झिट यासारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडी व उलथापालथींमुळे जागतिक अर्थव्यवस्था चहुबाजुने संकटांच्या व आव्हानांच्या मालिकांमुळे घेरली गेली असताना आता चीनमधील कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. प्रथमदर्शनी ही चीनमधील अंतर्गत बाब दिसते व अन्य देशांवर होणारा परिणाम म्हणजे या आजाराची लागण अन्य देशातील काही नागरिकांनाही होणे, इतकीच याची व्याप्ती दिसून येते मात्र हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजाराच्यावर लोकांचा मृत्यू झाला आहे, हे जारी खरे असले तरी कोरोनामुळे लाखों कोटींचे नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार, जागतिक औद्योगिक उत्पादनातील एक पंचमांश वाटा चीनचा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमधील चीनचा वाटा १६ टक्के आहे. मात्र आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधील आपले व्यवसाय बंद केले आहेत. देशांतर्गत आणि जगासोबतचे चीनचे व्यापार बहुतांशी बंद असल्यामुळेही चीनचे भरपूर अर्थिक नुकसान झाले आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे यामुळे भारतासारख्या देशांना नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वस्तुतः कोरोना व्हायरसमुळे भारतात चीनमधून आयात होणार्‍या सर्व बाबींवर परिणाम होत आहे. 

चीनमधील अनेक कारखाने बंद करण्याचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चीनमधील अनेक कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या गोष्टीचा भारतातील वाहन क्षेत्र आणि स्मार्टफोन क्षेत्रावर परिणाम होत आहे. चीनमधून मालाचा पुरवठा बंद असल्याने ऑनलाईन ट्रेडिंग कंपन्यांनी अनेक वस्तुंचे दर वाढविले आहेत. कपडे, चपला इत्यादीचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. भारतात बनारसी साड्यांची मोठी मागणी असते या बनारसी साड्यांसाठी लागणारे रेशीम चीनमधून येते. मात्र ते आता चीन पाठवू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ७ लाख लोकांच्या कामावर गदा येऊ शकते. यासह दर महिन्याला २०० कोटींचे नुकसान होऊ शकते. याशिवाय अनेक भेटवस्तू, प्लास्टीकच्या वस्तू यांच्या व्यापारावरही परिणाम होत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये मिरचीचे दर वाढले आहेत. कारण वर्षभरात येथील ६० टक्क्यांपेक्षा जास्त मिरची आयात चीनकडून केली जाते. चीनने ही आयात रोखली आहे. चीनकडून औषधांसाठी लागणार्‍या कच्च्यामालाच्या आयातीवरही परिणाम झाल्याने भारतात दररोज वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत चीनमधून ७० टक्के बल्क ड्रग्स आणि त्यांचे साहित्य आयात करतो. आणि औषधे तयार करण्यासाठी काही आवश्यक औषधे यासाठी चीन चिनी बाजारपेठेवर भारत जास्त अवलंबून आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामोलच्या किंमतीत ४० टक्के वाढ झाली आहे. बॅक्टेरियामुळे घसा, दात आणि कानाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅझिथ्रोमाइसिनची किंमत ७० टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय औषध उत्पादकांच्या मते, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पुरवठा पुन्हा सुरू न केल्यास, एप्रिल महिन्यात फार्मा उद्योगास औषध निर्मितीच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. याचा अर्थ असा आहे की या किंमती आणखी वाढू शकतात. 

आर्थिक चक्रव्ह्यूवमध्ये अडकण्यापुर्वीच ठोस उपाययोजना आखणे गरजेचे

नजिकच्या काळात चीनमधून भारतात आयात होणार्‍या मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे हुवेई, शाओमी, ओप्पो, विवो या स्मार्टफोन कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल. तज्ञांच्या मते, चीनमधून आयात केलेल्या ५ उत्पादनांवर संकट ओढवू शकते. यात इलेक्ट्रिकल मशीनरी, मेकॅनिकल उपकरण, ऑप्टिकल केमिकल, प्लास्टिक आणि सर्जिकल उपकरणांचा समावेश आहे. चीनमधून येणारी ही ५ उत्पादने भारताच्या एकूण आयातीपैकी २८ टक्के आहेत. नजिकच्याकाळात भारताच्या आयात उद्योगात २८ टक्के तोटा होण्याची शक्यता आहे. आयातीमध्ये सेंद्रिय रासायनिक उद्योगाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. भारत चीनमधून सुमारे ४० टक्के सेंद्रीय रसायन आयात करतो. निर्यातीचा विचार केला तर भारताकडून चीनला ५ टक्के पर्यंत निर्यात होते. अशात कापूस उद्योगाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख कापसाच्या गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातून जाणारा माल देखील चीनने थांबवला आहे. परिणामी भारताकडून चीनला पाठविण्यात येणाजया ३ लाख गाठी पडून आहेत. याव्यतिरिक्त पर्यटन क्षेत्राचे करोनामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार पर्यटन उद्योगातील भारतीय कंपन्यांचे आतापर्यंत ३५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. हीच स्थिती आगामी वर्षभर तशीच राहिली तर हे नुकसान १४ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची भीती आहे. या आर्थिक चक्रव्ह्यूवमध्ये अडकण्यापुर्वीच मोदी सरकारने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहेत. अन्यथा ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न दुरच राहील मात्र आहे ती अर्थव्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger