छत्रपतींच्या जन्मतारखेचा वाद अत्यंत क्लेशदायक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून तारीख की तिथीचा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. शासनातर्फे शासकीय शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारीला साजारा केला जातो तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशा तिन पक्षांच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना तिथीचा हट्ट सोडून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीची तारीख जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण होवून ते एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. मुळात महाराजांच्या जन्मतारखेवरून वारंवार होणारे वाद अत्यंत क्लेशकारक आहेत. महाराज एकदाच जन्मले व आज आपण जे काही आहोत; ते केवळ महाराजांमुळेच, हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही. पण वर्षातून तीन-चार वेळा साजरी होणारी जयंती हा तर महाराजांचा अवमानच आहे. हा विषय कायमचा निकाली काढण्याची संधी चालून आली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे, अशी शिवसेनेची दुटप्पी भुमिका पुर्णपणे चुकीची आहे.


दोन तारखा आणि दोन तिथींना जयंती 

राज्यात छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा वाद काही नवा नाही. यापूर्वीही अनेकदा राजकीय पक्ष, इतिहास संशोधक शिवजयंतीच्या तिथी व तारखेच्या वादावरुन आमनेसामने आले आहेत. सर्वप्रथम १५ एप्रिल १८९६ रोजी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजयंती साजरी केली. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळकांना उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून शिवरायांचा जन्म वैशाख शुद्ध प्रतिपदेला झाल्याचे मानण्यात येत होते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधन करून ही तिथी वैशाख शुद्ध पंचमी असल्याचे सांगितले. पुढे १९१४च्या सुमारास शिवरायांच्या जन्मकालाची नोंद ‘जेधे शकावली’त सापडली. ही तारीख म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०! परंतु या नोंदीवरुन इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नव्हती. अनेक वर्ष हा घोळ सुरुच होता. त्यानंतर ज्येष्ठ इतिहासकारांनीही त्यांच्या संशोधन, पुरावे व निष्कर्षास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती उत्सवासाठी घोषित केली. यानंतर अनेक वर्ष म्हणजे १९९९ पर्यंत याच तारखेला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत होता. परंतु नंतर नवा वाद निर्माण झाला तो म्हणजे, शिवजयंती साजरी करायची ती इंग्रजी तारखेनुसार की हिंदु पंचागानुसार? सद्य:स्थितीत शिवाजी महाराजांची जयंती दोन तारखा आणि दोन तिथींना अशी चार वेळा साजरी केली जाते. 

तारीख व तिथीचा वाद निर्माण करणे दुर्देवी

शासनाने नेमलेल्या अभ्यासकांच्या समितीतील काहीजणांनी १९ फेबु्रवारी १६३०, तर काहीजणांनी ८ एप्रिल १६२७ ही तारीख असावी, असे मत मांडले होते. त्यापूर्वी अनेक वर्षे परंपरेप्रमाणे अक्षयतृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात होती; तर काही हिंदुत्ववादी मंडळी फाल्गुन महिन्यातील तृतीयेला शिवजयंती साजरी करतात. मात्र तिथीनुसार शिवजयंतीची तारीख दरवर्षी बदलली जाते. मराठी महिन्यानुसार तिथीला महत्त्व असले तरी दैनंदिन जीवनात सहसा तिथीचा वापर केला जात नाही. किंबहुना ज्यांच्याकडून तिथीचा आग्रह धरला जात आहे, त्या व्यक्ती, संस्था आणि पक्षांकडूनही कधी रोजच्या कामकाजासाठी तिथीचा वापर केला जात नाही. आंतरराष्ट्रीय पातळीपासून भारतात केंद्र सरकारपासून ते राज्य पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्था, दैनंदिन कामकाज, महत्त्वाच्या घटना, नोंदींसाठी इंग्रजी तारखाच वापरल्या जातात, असे असताना तारीख व तिथीचा वाद निर्माण करणे हे दुर्देवी आहे. यंदाची शिवजयंती बदलेल्या राजकीय समीकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेचा किंबहुना वादाचा मुद्दा ठरु शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. दुसरीकडे, भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही एकच शिवजयंती झाली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचे सांगत शिवसेनेला डिवचले आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय.. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजेंनीही दोन शिवजयंतीवरुन सेनेला सवाल केला होता. 

एकत्रित शिवजयंती उत्सव साजरा केला तर... 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्याच जयंतीवरुन होणारा वाद दुर्दैवीच म्हणावे लागेल. मागच्या शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळातही शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर आग्रही होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांकडून तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र शासनाने शासकीय शिवजयंती साजरी केली तरी शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. आता मात्र शिवसेनेच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची यंदा पहिलीच शिवजयंती साजरी होणार आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या या सर्व पक्षांसमोर या जयंतीच्या निमित्ताने एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री तारेखनुसार शिवजयंती साजरी करतील, तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करतील असे जाहीर करून शिवसैनिकांमध्ये आणखी संभ्रम वाढविला आहे. तसे पाहिल्यास या दुर्देवी वादाचा तिढा सोडविण्याची संधी सेनेकडे चालून आली होती. आज सर्वांनी मिळून एकत्रित शिवजयंती उत्सव साजरा केला असता तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यातून खूप मोठा संदेश गेला असता. मात्र येथेही सोईस्कर राजकरण आडवे आले, याला दुर्देव्यच म्हणावे लागले.

Post a Comment

Designed By Blogger