कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३० देशांतील १५० च्या वर लोकांना त्याची लागण झाली आहे. चीनमध्येकोरोनाच्या संसर्गामुळे ८११ लोक मृत्युमुखी पडले असून, ३७ हजार १९८ जणांना त्याची लागण झाली आहे. २००२-०३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने चीन, हाँगकाँग व अन्य प्रदेशांत एकूण ७७४ जणांचे बळी घेतले होते. त्यापेक्षा अधिक लोक कोरोनाच्या साथीमध्ये मरण पावले आहेत. त्यापेक्षा कोरोना कितीतरी पटीने अधिक घातक आहे. हा विषाणू वटवाघूळ, खवलेमांजर, साप असे प्राणी खाल्ल्यामुळे पसरला, अशी सुरुवातीला चर्चा होती. आपण निसर्गाशी खेळतो तेंव्हा - तेंव्हा निसर्ग कोपतो, असे नेहमी बोलले जाते. याचा संदर्भ कोरोव्हा व्हारयसबाबतीही जोडला गेला. मात्र त्यानंतर हा व्हायरस म्हणजे रासायनिक युध्दाचे षडयंत्र असल्याची चर्चा रंगली आहे. कारण ज्या वुहान शहरातून हा विषाणू बाहेर पडला, तिथेच चीनची जैविक प्रयोगशाळा असल्याचा दावा करण्यात येत आहे. जैविक अस्त्रे तयार करताना हा व्हायरस प्रयोगशाळेच्या बाहेर पडला असावा, अशी शंका व्यक्त होत असताना; अमेरिकेतल्या माध्यमांनी तसे वृत्त देखील प्रसिद्ध केले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या प्रसारामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा रशियाचे ‘चॅनल वन’ने आपल्या ‘रेम्या’ नामक कार्यक्रमात केल्याने गोंधळात अजून भर पडली आहे.
निसर्गाशी खेळाबरोबर तंत्रज्ञानाचा गैरवापर
कोरोना व्हायरसबाबत जगभरात चर्चा सुरु असताना याचा संदर्भ निसर्गाशी सुरु असलेला खेळ व रासायनिक युध्दाशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर तर या विषयावरील स्वयंघोषित तज्ञांचे ज्ञान पाहता नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनाही लाज वाटेल, अशी परिस्थिती आहे. प्रथमदर्शनी निसर्गाशी खेळाबरोबर तंत्रज्ञानाचा गैरवापरामुळे निर्माण होणार्या संकटाच्या मुळाशीच कोरोना सारख्या घातक व्हायरसचा संबंध आढळून येतो. तंत्रज्ञानाने मानवी जीवन नक्कीच सुलभ केले परंतु, त्याचे धोकेसुद्धा आज जगासमोर आहेत. तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त विधायक कार्यासाठीच होणे गरजेचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे ते कसे वापरायचे हे वापरणार्याने ठरवायचे आहे. तंत्रज्ञान आणि रासायनिक युध्दाची जेंव्हा चर्चा होते तेंव्हा चर्चा होते ती, अण्वस्त्रधारक राष्ट्रांची! जगात आज ९ राष्ट्रांकडे अण्वस्त्रे असून त्यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, यूके, भारत, पाकिस्तान, चीन, इस्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश होतो. तर इराण सध्या अण्वस्त्रे बनविण्याच्या वाटेवर आहे. अण्वस्त्र युद्धाचा धोका २०व्या शतकातच निर्माण झाला होता. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते की, जगातील तिसरे महायुद्ध कशाने लढले जाईल हे मला माहीत नाही. परंतु, चौथे महायुद्ध हे फक्त काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने लढले जाईल. म्हणजेच आण्विक किंवा अण्वस्त्र युद्ध हे संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्वच नष्ट करेल आणि शेवटी काहीही उरणार नाही.
1240 जणांचा बळी
1240 जणांचा बळी
आताही कोरोना व्हायरसचा संबंध रासायनिक हल्ल्यांशी जोडला जात आहे. रशियाच्या ‘चॅनल वन’च्या दाव्यानुसार, अमेरिकेने जॉर्जियात एक प्रयोगशाळा तयार केली आहे. या प्रयोगशाळेत मनुष्यावर रासायनिक शस्त्रांची चाचणी घेतली जाते. या चाचणीमुळेच कोरोनाचा फैलाव झाला. आता अमेरिकन औषध कंपन्या यावर लस शोधून बक्कळ पैसा कमावतील, असा तर्क ‘रेम्या’च्या कार्यक्रमात लावण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमागे अमेरिकन गुप्तहेर संघटना व औषध कंपन्या असल्याचा तर्क मांडण्यात येत असल्याने संशयकल्लोळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा व्हायरस किती घातक आहे, याची जाणीव आज संपूर्ण जगाला झाली आहे. कोरोना विषाणूची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर भारताने गेल्या आठवड्यात एअर इंडियाची विमाने पाठवून तेथून ६४० भारतीयांना परत आणले. त्यात बहुतांशी विद्यार्थी आहेत. ६४० पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असे स्पष्ट झाले. मात्र केरळमध्ये एक कोरोनाग्रस्त संशयित आढळून आला असल्याने भारतातही भीतीचे सावट आहेच. चीनपासून उगम पावल्यानंतर कोरोना व्हायरसने ३० देशांमध्ये हातपाय पसरले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूमुळे चीनच्या ३१ प्रांतांत तब्बल 1240 जणांचा बळी गेला आहे. तर ६७,१९८ प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
भारतानेही सज्ज रहायला हवे
जागतिक आरोग्य अधिकार्यांनी जगभरातील ३७५०० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. यात हाँगकाँगच्या २५, मकाऊच्या १०, जपानमधील ९६, सिंगापूरच्या ४०, थायलंडच्या ३२, दक्षिण कोरियाच्या २५, तैवान व मलेशियाच्या प्रत्येकी १६, ऑस्ट्रेलिया, जर्मनी व व्हिएतनामच्या प्रत्येकी १४, अमेरिकेच्या १२, फ्रान्स, यूएई, कॅनडा व फिलिपिन्सच्या अनुक्रमे ११, ७, ६ व ३, भारत, ब्रिटन व इटलीच्या प्रत्येकी ३, तर बेल्जियम, नेपाळ, श्रीलंका, स्वीडन, स्पेन, कम्बोडिया व फिनलँडच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे आधीच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आणीबाणी जारी केली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून जपानने समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर ३,७०० प्रवासी अडकले असून, त्यात १३२ कर्मचारी व सहा प्रवासी असे १३८ भारतीय आहेत. क्रूझवरील ६४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. हाँगकाँगमध्येही वर्ल्ड ड्रीम या जहाजावरील ८ जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने ते जहाज दूर समुद्रात उभे केले आहे. वेस्टरडॅम या जहाजालाही बंदरात येण्यास जपान व तैवानने परवानगी नाकारली आहे. यावरुन सर्वच देशांनी कोरोनाचा किती मोठा धसका घेतला आहे, हे लक्षात येते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला ठरवून दिलेल्या वेळेत दिवसातून एकदाच बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. ही परिस्थिती पाहता भारतानेही सज्ज रहायला हवे. कारण चीन हा भारताचा शेजारीतर आहेच त्याशिवाय चीन पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. यामुळे अशा व्हायरसचा फैलाव होण्याची भीती तेवढीच जास्त आहे.
Post a Comment