विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट; यश तुमचेच आहे...!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे, तर तीन मार्चपासून दहावीची परीक्षा होणार आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला ४९ हजार ४०३, तर दहावीच्या परीक्षेला ६४ हजार ७० विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा म्हटले की थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परीक्षेचा काळ हा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही कठीणच असतो. आजूबाजूला स्पर्धेचे वातावरण असताना ताण येणेही साहजिकच आहे, पण मार्कांना अवाजवी महत्त्व देण्याचे कारण नाही. परीक्षा म्हणजे सर्वकाही नाही. यासाठी कोणताही ताण न घेता परीक्षेला आपण शांतपणे, आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे. परीक्षेत मला चांगले टक्के मिळाले नाही तर आई-वडील नाराज होतील, चांगल्या कॉलेजमध्ये अडमिशन मिळणार नाही, मला हव्या त्या शाखेला प्रवेश मिळवता येणार नाही अशी अनेक प्रकारची भीती किंवा प्रश्‍न मनातून काढून टाका व ‘मी हे करु शकतो’ यावर विश्‍वास ठेवून परीक्षा द्या...


परीक्षेतील यश म्हणजे यशस्वी आयुष्य नव्हे 

भारतीय शिक्षण पध्दतीत दहावी व बारावी या दोन परीक्षांना प्रचंड महत्व देण्यात येते. या दोन्ही परीक्षानंतरच करीयरचा मार्ग सापडतो किंवा निश्‍चित होतो, अशी विद्यार्थी व पालकांची धारणा असल्याने स्वाभाविकपणे या परीक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांसह पालकांनाही असतेच! चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी जास्त गुण मिळविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी दडपणाखाली अभ्यास करतात. यामुळे त्यांना कदाचित चांगले गुण मिळतातही मात्र त्याना ज्ञान मिळते का? या प्रश्‍नाचे उत्तर बारावीत ९० टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी जेंव्हा पहिल्याच सेमिस्टरला नापास होतो, तेंव्हा मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी मनावर दडपण न घेता परीक्षा दिली पाहिजे. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे परीक्षा हा आपल्या संपूर्ण आयुष्यातला एक छोटासा भाग असतो. यामुळे परीक्षेत किती गुण मिळतील याची चिंता करण्याचे कारण नाही. परीक्षेचा ताण जेवढा हलका होईल तितके विद्यार्थ्यांना यश मिळवणे सोपे जाते. परीक्षेतील यश म्हणजे यशस्वी आयुष्य असे जे काही समिकरण तयार झाले आहे. ते बदलण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने शाळांमधून आणि घराघरातून या परीक्षेचा जो काही बाऊ केला जातो. त्यामुळे निखळ यशापेक्षा उत्तीर्ण होण्याचा किंवा गुणवत्तेचा पराकोटीचा आग्रह पाहायला मिळतो. आपल्या मुलांनी चांगले टक्के मिळवावेत अशी पालकांची अपेक्षा चुकीची नाहीच, पण त्याबरोबरीने आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आपल्या सततच्या काळजीची मुलांनाही भीती वाटू शकते. त्यांच्यावर वेगळे दडपण येते. म्हणूनच त्यांच्या मागे सतत अभ्यास कर म्हणून मागे लागणे किंवा त्याची तुलना इतर कुणाशीतरी करणे पुर्णपणे चुकीचे आहे. 

सततचा तणाव आणि दबावामुळे नैराश्य 

मुलाला आपली भीती न वाटता आधार वाटला पाहिजे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. सततचा तणाव आणि दबाव यांनी मुलांना नैराश्य येण्याची शक्यता असल्याने पाल्यांकडून अपेक्षा ठेवतांना त्याची आवड काय, त्याची क्षमता किती याचाही विचार करावा. पालकांनी आपल्या मुलांच्या यशाचा संबंध स्वतःच्या प्रतिष्ठेशी लावू नये. यामुळे मुलांच्या मनावर दडपण येण्याची शक्यता असते. परीक्षा हा केवळ संपूर्ण जीवनातला एक टप्पा असतो. तो पार करताना यश आले तर ठीक. नाही आले तरी निराश होण्याचे कोणतेही कारण नसते. आपल्यापैकी अनेकांनी ‘छिछोरे’ हा हिंदी चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटाच्या नावावर न जाता त्यात पाल्य व पालकांसाठी जो संदेश दिला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण एखाद्या परीक्षेत यश मिळाले तर पुढे काय करायचे? याचा प्लान आखून ठेवलेला असता मात्र यदाकदाचित अपयश आले तर पुढे काय करायचे? यावर अजिबात विचार करत नाही. या ताणामुळेच अनेकवेळा विद्यार्थी नको तो टोकाचा निर्णय घेतात. यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षा निश्‍चितपणे महत्त्वाच्या आहेतच, यात कोणतेही दुमत नाही मात्र त्याचा इतकाही ताण घेवू नका की, ज्यामुळे तुमचेच नुकसान होईल. विद्यार्थी मित्रानों तुम्ही सर्वांनी वर्षभर खूप अभ्यास केलेला आहेच यामुळे आता ताण न घेता आत्मविश्‍वासपुर्वक परीक्षेला सामोर जा. ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते की, वर्षभर आपण काहीच केले नाही किंवा अभ्यास करायला हवा होता, आता कसे होईल? त्यांनीही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण ती त्यासाठी आताची वेळ योग्य नाही किंवा त्यातून काहीही साध्य होणार नाही. यासाठी त्यांनीही डोके शांत ठेवून परीक्षेला आत्मविश्‍वासपुर्वक सामोरे जावे.

सकारात्मक विचार करा

परीक्षेला जातांना परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र स्वत: पाहून खात्री करावी. रात्री झोपण्यापूर्वीच परीक्षेसाठी आवश्यक असलेले साहित्य तयार ठेवावे. रिसीटची झेरॉक्स काढून ठेवावी. परीक्षेच्या पूर्व रात्री पुरेशी शांत झोप घ्यावी. परीक्षेला जाण्यापूर्वी हलका आहार घ्यावा. परीक्षेला वेळेच्या आत ३० मिनिटे पोहोचण्यासाठी शक्य तितके लवकर निघावे. परीक्षेला जाताना सोबत प्रवेशपत्र, ओळखपत्र व इतर आवश्यक साहित्य घ्यावे. परीक्षा दालनात प्रसन्न मनाने प्रवेश करावा. नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे अगोदर मिळालेल्या उत्तर पत्रिकेवर आवश्यक ती माहिती योग्य ठिकाणी भरावी. नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे अगोदर मिळालेल्या प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचनच करावे. नियोजित वेळी बेल वाजल्यावरच लिहिण्यास सुरुवात करावी. परीक्षा कक्षात कृतीपत्रिका हातात पडल्यानंतर काहीजणांच्या बाबतीत अचानक ब्लँक होणे, घाम येणे, छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरु नका. थोडावेळ डोळे मिटून शांत बसा, आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या व सोडा. वर्षभर तुम्ही अभ्यास केला आहे काहीतरी आठवेलच असा विश्वास निर्माण करा व लिहायला सुरुवात करा. हळूहळू सर्व आठवायला लागेल. परीक्षेचा ताण जाणवत असेल तर घरातील लोकांशी मनमोकळेपणाने बोला. जे येते ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा. जे अजिबात जमणार नाही असे वाटते त्याच्या खूप मागे लागून आत्मविश्वास गमावू नका. जितके येते तितक्याचाच लिहा, मित्रमैत्रिणींशी स्वतःची तुलना अजिबात करू नका, कोणताही तणाव घेऊ नका, भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, यश तुुमचेच आहे...ऑल द बेस्ट

Post a Comment

Designed By Blogger