राजकीय अस्तित्वासाठी झगडणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन मुंबईत पार पडले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाची नवी भूमिका व वाटचाल कशी असेल, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनसेच्या स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेताना झेंड्यामध्ये विविध रंग ठेवले होते. त्यात निळ्या, हिरव्या, भगव्या व पांढर्या रंगाचा समावेश होता. मात्र महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन राज ठाकरे यांनी पक्षासाठी भगव्या रंगातील नव्या झेंड्याचा स्विकार केला यावेळी व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही लावली. यामुळे भविष्यात मनसेचा राजमार्ग हा हिंदूत्त्वाच्या वाटेवरुन जाईल, हे स्पष्ट झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांच्या मदतीने धर्मनिरपेक्षततेच्या वाटेवर निघाली असल्याने ही पोकळी भरुन काढण्यासाठी मनसेने हिंदूत्त्वाचा हा राजमार्ग निवडून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची खेळी केलेली दिसते, यात कितपत यश मिळते, याचे उत्तर येणारा काळाच देईल!
मनसेच्या इंजिनात बिघाड झाल्यागत पक्षाची वाटचाल
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत तयार झालेल्या राज ठाकरे हे बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषणांसाठी ओळखले जातात. सुरुवातीपासून त्यांच्याकडे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले.
मात्र महाबळेश्वरच्या अधिवेशनात शिवसेनेचे पुढचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले, तेव्हापासून नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन करून राजकारणात उडी घेतली. त्यावेळी राज ठाकरे नावाचे वादळ संपुर्ण महाराष्ट्रात घोंगावत होते. त्यांची वकृत्वशैली, कार्यपध्दती बाळासाहेबांशी मिळतीजुळती असल्याने मराठी माणसाच्या मनात मनसेविषयी एक आपुलकी निर्माण झाली होती. रेल्वेच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलल्यावरून घातलेल्या राड्यावरून मनसेची वाटचाल शिवसेनेच्या मार्गावरूनच सुरु झाली. त्यानंतर टोलमुक्ती, फेरीवाले, मराठी पाट्या, बेरोजगारी आदी प्रश्नांवर त्यांनी केलेल्या ‘खळ्ळखट्याक’ किंवा ‘मनसे’ स्टाईल आंदोलनांमुळे युवकवर्ग मनसेकडे आकर्षित झाला. त्यामुळे स्थापनेनंतरच्या अवघ्या तीन वर्षामध्ये मनसेने महाराष्ट्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. याचे प्रतिबिंब मनसेला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांमध्ये दिसले. त्यानंतर झालेल्या २००९च्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने पहिल्याच दमात १३ जागांवर विजय मिळवला. अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिले. यावेळी मनसे कडे राज्यातील प्रस्थिापित पक्षांचा पर्याय म्हणून पाहिले गेले. मात्र अवघ्या काही दिवसात मनसेच्या इंजिनात बिघाड झाल्यागत पक्षाची वाटचाल सुरु राहिली. त्यावेळी प्रत्येक सभेत ते विकासाची ब्ल्यू प्रिंट बद्दल बोलले मात्र पाच वर्ष सरली तरी विकासाची ब्ल्यू प्रिंट समोर आलीच नाही. त्यांनी सुरु केलेली अनेक आंदोलने मध्येच थांबली. परिणामी अनेक पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनीही मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला.
राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती!
दरम्यानच्या काळात अधूनमधून राज ठाकरेंच्या सभा व्हायच्या त्यावेळी समारेची प्रचंड गर्दी पाहूनच मनसे खूश होत होती. मात्र ही गर्दी केवळ राज ठाकरे चांगले बोलतात म्हणून त्यांना ऐकायला येतात त्याचे मतात रुपांतर होत नाही, हे मनसेला उमगलेच नाही. यास अनेक कारणे होती. त्यातही प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती! मनसे जेंव्हा बाळसे धरत होता तेंव्हा राज ठाकरे गुजरातला गेले. तेथील विकास कामे पाहून त्यांनी नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतूकही केले. मात्र नंतर त्यांच्या इंजिनाची दिशा अचानक बदलली, ज्या मोदींचे ते वारेमाप कौतुक करत होते, त्यांच्यावरच ते टीका करायला लागले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुलाखती घ्यायला लागले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपच्या दाव्यांची पोलखोल करायला लागले. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेने एकत्र येण्याची तयारी केली होती; परंतु काँग्रेसमुळे ते शक्य झाले नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीने मनसेला आणि मनसेने राष्ट्रवादीला मदत केली, तरीही मनसेला गेल्या सलग दोन निवडणुकीतील एका आमदारापेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत. याचा अर्थ की राष्ट्रवादीने केवळ मनसेचा वापर करुन घेतला व निवडणुकीनंतर शिवसेनेशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. हिंदूहृदयसम्राट यांनी स्थापन केलेल्या शिवसनेने धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्या मात्र विशिष्ट धर्माशी जवळीक करणार्या दोन्ही काँग्रेसशी केलेली जवळीक अनेक शिवसैनिकांना आवडलेली नाही. हाच धाग पकडत राज ठाकरेंनी शिवसैनिकांना ‘मनसे’ साद घातली आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाशी युती केल्याने हिंदू मते शिवसेनेपासून दूर जातील, असा कयास बांधून मनसेने पूर्वीच्या झेंड्याचा रंग बदलून भगवा केला आहे. तसेच दोन हिंदुत्ववादी पक्षांनी एकत्र येण्याचे संकेत दिले. भाजपला न मिळणारी मते शिवसेनेलाही न मिळता मनसेला मिळाली, तर त्यात आपलाच फायदा आहे, असा हिशेब करून भाजप मनसेला बरोबर घेण्याची शक्यता आहे.
सभा घेऊन यश मिळत नाही फक्त टाळ्या मिळतात
काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळे हिंदुत्व व मराठीची भूमिका घेताना शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. हेच लक्षात घेऊन मनसे मराठीबरोबर हिंदुत्वाची कास धरण्याची वाटचाल सुरु केली आहे. मागील काही दिवसांमध्ये सावरकरांच्या मुद्यांवरून काँग्रेस व भाजपमध्ये वादही झाले होते. या वादात शिवसेनेने सावरकरांच्या बाजूने भूमिका मांडली होती. मात्र, त्यात पूर्वीसारखा आक्रमकपणा नव्हता. महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा गुंडाळून ठेवला असल्याची टीका भाजपकडून होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी मनसेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र केवळ झेंड्या रंग भगवा करुन किंवा सावरकरांचा फोटो लावून मनसेची मते वाढणार नाही. त्यासाठी त्यांनी धरसोड वृत्तीची भूमिका बदलायला हवी. जसे बाळासाहेब एकदा बोलले की, मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्र्यास केला किंवा मला तसे म्हणयाचे नव्हते, असे कधीच बोलत नव्हते. होय मी बोललो...अशी स्पष्ट आणि परखड भूमिका बाळासाहेबांची असायची. याचा आदर्श राज ठाकरेंनी घ्यायला हवा. निवडणुकीच्या काळात पाच-दहा सभा घेऊन यश मिळत नाही फक्त टाळ्या मिळतात, हे आता त्यांना कळून चुकलेले दिसते. याकरीता जे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत त्यांची घरवापसीची योजना राबवावी लागेल. तर या हिंदूत्त्वाच्या ‘राज’मार्गाला यश मिळेल!
Post a Comment