हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून वंदिले जातात. शौर्य, पराक्रम, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. शिवाजी महाराजांचे जीवन एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. परंतू आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणार्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. आपल्या पक्षाच्या नेत्याची हुजरेगिरी करण्याच्या नादात काही अतिउत्साही कार्यकर्ते नेत्यांची तुलना थेट शिवछत्रपतींशी करतात, मग ते दिल्लीतील भाजपाच्या नेत्याचे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तक असो का महाराष्ट्रात ‘जाणाता राजा’ म्हणवून घेत होणारे राजकारण असो!
नेपोलियन, ज्युलियस, सिकंदर या सर्वांपेक्षा महाराज कांकणभर अधिक
दिल्लीतले भाजपचे एक नेते जयभगवान गोयल यांनी आपल्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पुस्तकावर तात्काळ बंदी घातली जावे व हे पुस्तक बाजारातून मागे घेतले जावे अशी मागणी राजकीय व सामाजिक थरातून केली जात आहे. सोशल मीडियावर देखील याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. या मुद्याचे राजकीय भांडवल झाले नसते तर राजकीय विरोधक म्हणायचे कुणाला? राजकीय हुजरेगिरी हा जणू राजकारणाचा अविभाज्य घटकच झाला आहे, याचे प्रतिबिंब अशा प्रकारच्या अनेक घटनांवरुन दिसून येत. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. मध्यंतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. हा वाद आता कुठे शमत असताना आता तर गोयल नामक महाशयांनी चक्क पुस्तक लिहून अकलेचे तारे तोडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चयाचा महामेरू म्हणून ओळखल्या जाणार्या महाराजांच्या त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस, सिकंदर यांच्याशी अनेकवेळा महाराजांची तुलना केली जाते मात्र त्यावेळीही त्या सर्वांपेक्षा महाराज कांकणभर अधिक ठरतात, हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते.
तुलना कुणासोबतही होणे शक्यच नाही
महाराजांना केवळ महाराष्ट्रातच पुजले जाते असे नाही तर अवघ्या हिंदूस्थानात त्यांना पुजले जाते. छत्रसालासारख्या तरुणाने महाराजांचा आदर्श घेऊन दूर वरती बुंडेलखंडात राज्याची उभारणी केली होती, अशी शेकडो उदाहरणे इतीहासाची पाने उलगडल्यास सापडतात. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणार्या व आचरणार्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते. अशा रयचेच्या राजाची तुलना कुणासोबतही होणे शक्यच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची तुलना स्वत:च केलेली नसली तरी पक्षातील अशा चमकोगिरी करणार्या नेत्यांना त्यांनी आवरायला हवे, दुसरे म्हणजे की, या पुस्तकाच्या प्रकाशनला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. यामुळे गोयल महाशयांच्या या अतातयीपणाला पक्षाचा पाठिंबा होता की काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या तुलनेवर आक्षेप घेत ‘जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही,’ असे ट्विट केले आहे. यातील राजकीय विरोध बाजूला ठेवला तरी हे तितकेच खरे आहे की, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्यच नाही. महाराजांच्या नावाने होणारे राजकारण महाराष्ट्राला नवे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी कायमच अत्यंत भावनिक मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्राच्या अनेक निवडणुका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित मुद्द्यावरही लढल्या गेल्यात. अलीकडच्या काही वर्षात हे प्रमाण तर अधिक वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
महाराजांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आचार-विचार आंगिकारा
१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली त्यावेळी राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करणारा पक्ष स्थापन झाला. शिवसेनेने पुढच्या राजकारणात शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने केलेला दिसून येतो. मग ते शिव वडापाव असो किंवा शिवशाही बस असो. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेतही महाराजांच्या नावाचा वापर झाला आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करण्यात काँग्रेस पक्ष देखील मागे नाही. १९८० ते १९८२ या काळात बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची कारकीर्द गाजली, ती भवानी तलवार लंडनहून परत आणण्याच्या घोषणेने. महाराष्ट्रात २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीतच काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. २००४ पासून आज २०१९ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत, विधानसभा, लोकसभा आणि मुंबई महापालिकेची निवडणूक, शिवस्मारकाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. २००९ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरीमन पॉईंटजवळच्या समुद्रात ‘जलपूजन’ केले होते. मात्र अजूनही या स्मारकाचे काम दृष्टिपथात नाही. २०१४ साली भाजपने ‘शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चलें मोदी के साथ’ असे म्हणत प्रचार केला होता. त्यानंतर आताच्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘नवा स्वराज्याचा नवा लढा’ म्हणत ‘शिवस्वराज्य यात्रा’ राज्यभर काढली. महाराजांच्या नावाने होणारे राजकारण इथेच न थांबता आता त्यांची तुलना राजकीय नेत्यांशी करण्याचा संतापजनक प्रकार होवू लागला आहे. जो कदापी मान्य होणारा नाही. महाराजांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आचार-विचार आंगिकारणे हाच खरा त्यांना सन्मान ठरेल.
Post a Comment