देशात गोडावा निर्माण व्हावा!

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत एकांमेकांमधील स्नेह आणि प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन करणारा सण म्हणजेच मकर संक्रांत आज सर्वत्र साजरा होत आहे. आज प्रत्येकाचे धकाधकीचे जीवन, सोशल मीडियाच्या जाळ्यात गुरफटलेली आजची पिढी व त्यांच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या माणसांपासून दुरावा वाढत चालला आहे. घरात व देशातही अशीच परिस्थिती दिसून येते. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील हिंसाचार या प्रमुख तिन मुद्यांवरुन संपूर्ण देशात अशांतता व अजारकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वसामान्य भारतीयांशी काही एक संबंध नसला तरी मुठभर लोकांनी या मुद्यांवरुन संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. ही कटूता कमी होण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्ताने हा दुरावा कमी होवून स्नेह वाढावा, अशी अपेक्षा आहे.


देश संक्रमणावस्थेतून जात आहे

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी प्रत्येकाच्या आयुष्यातील कडवटपणा नष्ट करण्याच्या दृष्टीने तसेच मनातील सर्व राग आणि रुसवा दूर करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिला जातो. या सणाला धार्मिक व वैज्ञानिक महत्व देखील आहे. १४ जानेवारीला सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे. सूर्य आषाढ महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास प्रारंभ होतो व पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो मकर संक्रांतीचा दिवस असतो. संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते. दुसर्‍या दिवशी संक्रांत असते. तिसर्‍या दिवशीच्या किंक्रांतीने या सणाचा आनंदाने समारोप होतो. यंदा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. संक्रमणाच्या ‘पुण्यकाला’तले सर्वांत महत्त्वाचे पुण्यकर्म असते गोड बोलण्याचे! संक्रांत हा एकच असा सण आहे, त्यानिमित्ताने अभिप्रेत कृती आणि उक्ती स्पष्ट शब्दांकित करणारा असतो. म्हणूनच या दिवशी तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, असे म्हटले जाते. या सणाला खर्‍या अर्थाने देशभरात साजरे करण्याची आवश्यता आहे कारण सध्या आपला देश संक्रमणावस्थेतून जात आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. 

देशात ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न

सीएए व एनआरसी या दोन विषयांवरुन देशातील सलोखा व बंधुभाव धोक्यात येतांना दिसत आहे. या वादांवरुन झालेल्या हिसांचारात काही निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या दोन्ही विषयांना विरोध करण्यासाठी केंद्राती भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्य नेतृत्वाखाली एनसीपी, डीएमके, इंडियन यूनियन मुस्लीम लीग, डावी आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीसह केंद्र सरकारविरोधातील जवळपास सर्वच पक्ष एकवटलेले दिसून येत आहे. दुसरीकडे  शिवसनेबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यासह आम आदमी पार्टीने एकला चालो रे ची भूमिका स्विकारली आहे. या दोन्ही विषयांवरुन देशात ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात याचा सर्वसामान्या भारतियांशी काडीमात्र संबंध नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले असले तरी देशात भीतीचे वातावरण तयार करण्यात विरोधीपक्ष यशस्वी झाले आहेत. मुळात हा राजकीय मुद्दा असल्याचेही आता सर्वसामान्यांचे लक्षात येवू लागल्याने याची धार बोथट होतांना दिसत आहे मात्र उसने आवसान आणून राजकीय पक्ष याला चिघळविण्याता केविलवाणा प्रयत्न करत आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात, भिन्न भाषा, जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्र राहत असताना मतभेदाची, वादांची विपुल शक्यता असते. वादामुळे आपण आपला एखादा सहकारी, एखादा मित्र कायमचा दुरवून बसतो. म्हणूच वादविवाद टाळणेच शहाणपणाचे असते. याचा अर्थ असा नव्हे, की आपल्या मनांना नेहमीच मुरड घालावी. अजिबात नाही. आपली मते जरूर मांडावीत; पण मते मांडणे म्हणजे भांडणे नव्हे, एवढे तरी भान ठेवावे, हेही लक्षात ठेवायला हवे. वादांवर मात करता येते, ती संवादातूनच. मात्र सुसंवाद घालण्या ऐवजी वाद घालण्यात धन्यता मानली जात असल्याने देशातील अनेक विषय चिघळत चालले आहे. यास केवळ विरोधपक्षच जबाबदार आहेत असे नाही तर सत्ताधारीदेखील तितकेच जबाबदार आहे. 

....तरच आपली संस्कृती आणि प्रेम टिकून राहील

देशातील ही कटुता टाळली पाहिजे. कटुता टाळण्यासाठीचे पहिले महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्हणजे ‘माफ करा, मन साफ करा!’... दुसरे असे की, सोशल मीडियाचा वापर करताना सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करा. कारण याच्यामाध्यमातून प्रेम पसरविण्याऐवजी व्देश अधिक पसरविला जातांना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून गोडवा पेरता आला नाही तरी हरकत नाही; पण निदान कटुता तरी पसरवू नका, यामुळे समाजात तेढ निर्माण होते व त्याची किंमत निष्पाप व सर्वसामान्यांनाच चुकवावी लागते. आपण सर्वजण सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलो आहोत की, या आभासी जगात स्वत:ला कुठेतरी हरवून बसलो आहोत. फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, इन्स्टाग्राममुळे फक्त संपर्क वाढतो, सु‘संवाद’ नव्हे! हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. प्रेम आणि स्नेह या दोन्ही शब्दांचा अर्थ मोठा असला तरी दोन्ही गोष्टी आपल्या जीवनातून हळूहळू दुरापास्त होत चालल्या आहेत. मग हेच प्रेम दुरापास्त का होत चालले आहे. त्याच व्यक्तींना एकमेकांपासून का दूर लोटत आहे, हाही विचार मकर संक्रांतीच्या निमित्ताने होण्याची गरज आहे. या सणाला शाश्वत प्रेम देण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा संकल्प करा. तरच आपली संस्कृती आणि प्रेम टिकून राहील. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger