नड्डाजी जरा संभलना...

बाबूजी धीरे चलना
प्यार में जरा संभलना
हाँ बडेे धोखे हैं
बडे धोखे हैं इस राह में...

१९५४ साली आलेल्या आर-पार या चित्रपटात ओ.पी नय्यर यांनी संगीतबध्द केलेल्या व गीता दत्त यांनी मधूर आवाजात गायलेल्या या गाण्याने अनेक दशके संगीतप्रेमींच्या ह्वदयावर राज्य केले. या गाण्याची आज आठवण होण्याचे निमित्त म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची झालेली बिनविरोध निवड! नड्डा यांच्याकडे भाजपाचे सर्वोच्च पद आले आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. गेली काही दिवस ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असली तरी २०२४ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता जे.पी.नड्डा यांची वाट सोपी नसेलच, अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसत असतानाच दिल्ली विधानसभेपाठोपाठ होणार्‍या पश्‍चिम बंगाल व केरळ विधानसभा निवडणुकांचे ‘हर्डल्स’ पार करावे लागणार आहे. शिवाय त्यांची तुलना अमित शहा यांच्याशी प्रत्येकवेळी होईल.


आयुष्मान भारत, मोदी केअर योजना लागू करण्यात महत्त्वाचा सहभाग 

मूळचे हिमाचल प्रदेशचे आणि बिहारमध्ये जन्मलेले जे.पी. नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोठा वाटा आहे. जे.पी. नड्डा हे विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. १९८६ पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत. १९९३ मध्ये ते विधानसभेवर निवडले गेले. १९९८ मध्ये फेरनिवड झाली. ते आरोग्यमंत्री बनले. २००७ मध्ये ते प्रेमकुमार धुमल यांच्या सरकारात मंत्री झाले. २०१२ मध्ये त्यांनी निवडणूक रिंगणात उतरणे टाळले. पण, राज्यसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये ते आरोग्यमंत्री झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत. ते कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पडले नाहीत. त्यांची प्रतिमा कायम स्वच्छ अशीच राहिली. हिमाचल प्रदेशात ते आरोग्यमंत्री होते. त्यानंतर गडकरींनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. २०१० साली त्यांना भाजपाचे महासचिव केले. ही त्यांच्या कामाची पावती होती. नड्डा अमित शाह यांचे विश्वासू व अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचे कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना लागू करण्यात नड्डा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ही कामगिरी त्यांना या निवडीवेळी फायद्याची ठरली. 

पुढची वाट खडतर असल्याची जाणीव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती. यावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीचे आव्हान नड्डा यांच्यासमोर होते. पण, नड्डा यांनी ८० पैकी ६२ जागा निवडून आणल्या. त्यांच्या या विजयी कामगिरीमुळे पक्षात त्यांचा चांगला दबदबा निर्माण झाला. नड्डा यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. शहा यांच्या तोडीस तोड संघटनकौशल्य असलेले नड्डा व्यूहरचनात्मक चाली रचून यशस्वी करण्यात माहीर आहेत. भाजपच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांत त्यांचे योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी २०१९मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाले. पण पक्षाचे कामकाज कोण पाहणार? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी नड्डांवर पक्षाची जबाबदारी सोपवली. जुलै २०१९मध्ये आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले. २०२० ची सुरुवात होत असतांनाच नरेंद्र मोदींनी २०२४ कडे लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या भाजप विरोधात सर्वच विरोधीपक्ष एकवटत असल्याने पुढची वाट खडतर असल्याची जाणीव भाजपा व मोदी दोघांनाही आहे. याची प्रचिती गेल्या वर्षभरात पडलेल्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आली. 

दिल्ली, पश्‍चिम बंगाल व केरळ या तिन राज्यांच्या निवडणुकांना समोर

२०१४ ला भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएची फक्त ७ राज्यात सत्ता होती. २०१४ ला महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपने सत्ता स्थापन केली. २०१७ ला देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातही भगवा फडकला. २०१८ येईपर्यंत २१ राज्यात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता होती. पण डिसेंबर २०१९ येईपर्यंत हा आकडा १५ वर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि राजस्थान ही तीन महत्त्वाची राज्य गमावली झारखंडमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेली युती भाजपने अखेरच्या क्षणी तोडली यामुळे चौथे राज्य गमविण्याची वेळ भाजपावर आली. या धक्क्यातून बाहेर पडत नाही तोच महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपाला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. म्हणजे  वर्षातच भाजपने ५ राज्य गमावले आहेत. याला भाजपाचे वजाबाकीचे राजकारण कारणीभुत आहे. एक एक मित्रपक्ष का दुरावत आहेत? याचे तटस्थपणे मुल्यमापन जे.पी.नड्डा यांना करावे लागणार आहे. आता त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडताच दिल्ली, पश्‍चिम बंगाल व केरळ या तिन प्रमुख राज्यांच्या निवडणुकांना सामोर जावे लागणार आहे. शिवाय भाजपाला गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचे आव्हान देखील नड्डा यांच्यापुढे राहील.

Post a Comment

Designed By Blogger