इंग्रजांनी तब्बल १५० वर्ष भारतावर राज्य केले. त्यावेळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असे बोलले जाते मात्र इंग्रजांनी साप आणि गारुड्यांचा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण केली. पुढे अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रतिमा कायम राहिली. मात्र आज भारत देश जगातील शक्तीशाली देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. असे असले तरी इंग्रजांनी दिलेल्या जखमा आजही तशाच आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विशेष कामगिरी करतो त्यावेळी त्याची तुलना स्वातंत्र्यापूर्वीच्या काळाशी होत असते. आता तशीच एक घटना घडली आहे. ब्रिटनच्या महाराणींच्या वकीलाची नियुक्ती झाली मात्र त्याचे थेट कनेक्शन भारताशी त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मराठी मातीशी असल्याने संपूर्ण भारतियांचा व कांकणभर जास्त मराठी माणसांचा ऊर भरुन आला आहे. कारण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ मराठमोळे हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला
हरीश साळवे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. ते १९९९ से २००२ पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. हरिश साळवे यांनी भारताच्यावतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. त्यानंतर साळवे यांनी केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडल पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला होता. या खटल्यानंतर त्यांचे नाव सर्वसामान्यांना अगदी तोंडपाठ झाले. केम्ब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढणारे सर्वात कमी वयाचे वकील आहेत. त्यांची एका दिवसाची फी जवळजवळ ३० लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळाले असे म्हणावे लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. तर हरीश साळवेंचे वडील वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे हे नागपुरकर म्हणून ओळखले जात असले तरी यांचा जन्म खान्देशातील धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली.
हरीश साळवे अत्यंत महागडे वकील
वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत. १९८० मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली. १९८० ते १९८६ दरम्यान साळवे यांनी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले. हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली. कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती. भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती. सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली. मुंबई सेशन्स कोर्टाने अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सलमान आणि कुटुंबीयांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. सलमानला थेट तुरुंगात नेले जाणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र तेव्हाच वरिष्ठ वकील हरिश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला. साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती. २००९ साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला. २०११ मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला. हरीश साळवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे.
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
परखड व्यक्तीमत्व ही साळवे यांची खरी ओळख आहे. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टू जी स्पेक्ट्रम खटल्यात १२२ परवाने रद्द केले. तसेच २०१२ मध्ये कोळसा खाणींचे वाटपही रद्द केले. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचा आरोप करत साळवे यांनी देशातील आर्थिक मंदीसाठी सर्वोच्च न्यायालयालाही जबाबदार ठरवले होते. कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल. कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणार्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, यावर खुद्द शाही घराण्याने शिक्कामोर्तब केल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या तिन महिन्यात हा मराठी माणसाचा तिसरा मोठा सन्मान झाला आहे. आधी देशाच्या सर्वोच्च सरन्यायाधिशपदी मूळ नागपूरचे न्यायमूर्ती एस.ए.बोबडे तर भारतीय लष्करप्रमुखपदी मूळ पुणेकर असलेल्या मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे. त्या पाठोपाठ साळवे यांच्या नियुक्तीने मराठी माणसाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे.
Post a Comment