उचलली जीभ आणि लावली टाळ्याला!

भारतीय राजकारणात वाचाळवीर व चापलूसी करणार्‍यांची संख्या काही कमी नाही. गेल्या काही वर्षांत तर त्यात चांगलीच भर पडली आहे. आपण काय बोलत आहोत किंवा काय करतोय, याचे जराही भान त्यांना राहात नाही. अर्थात, यातील अनेक जण ठरवून तसे करतात कारण त्यांना राजकारणात त्यांचे अस्तित्व ठिकवायचे असते. त्यातील अनेकांना पक्के ठावूक असते की, पक्षाचे किंवा पदाचे वलय काढून टाकल्यास त्यांना काळं कुत्रं देखील विचारणार नाही, यामुळेच काही ना काही बोलून किंवा कृती करुन त्यांना चर्चेत रहायचे असते. अशा वाचाळवीर व उपद्व्यापींची संख्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कित्येक पटींनी वाढली होती. त्याचा अनुभव नंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका व सत्तास्थापनेच्या डावपेचात पुन्हा आला. सध्या याचाच ‘सिक्वेल’ पहायला मिळत आहे. 


अकलेचे तारे 

सत्तेत आल्यानंतर, काही नेत्यांना आपण परमग्यानी झाल्याचा भास व्हायला लागतो आणि ते दिवसाढवळया आपल्या अकलेचे तारे तोडायला लागतात. अलीकडच्या काळात याची अनेक उदाहरणे देता येतील. अगदी काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांचेही रेकॉर्ड भाजपाच्या काही नेत्यांनी तोडले आहेत. महाभारतात इंटरनेटचा शोध असल्याचे दिवास्वप्न उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांने रंगवले होते. त्यानंतर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सीतेचा जन्म हा टेस्टट्यूब मुळे झाल्याचा दावा केला होता. या आधीच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनीही महाभारत काळात इंटरनेट होते असे वक्तव्य केले होते. आता महाराष्ट्रातात याचाच नवा अध्याय लिहीला जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणार्‍या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या निमित्ताने उफाळलेला वाद आता वेगळ्याच वाटेवर येवून ठेपला आहे. भाजपाचे नेते आणि लेखक जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आणि वादाला सुरुवात झाली. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपने नंतर प्रकरण अंगलट येते असे दिसताच पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही असे जाहीर करत अंग झटकले. मात्र त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेत. छत्रपतींच्या वारसांना हे मान्य आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला मात्र त्याआधीच शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी या पुस्तकाचा जाहीर निषेध करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर संजय राऊत आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले. भाजपात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणार्‍या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले. संजय राऊत यांच्या ट्विटनंतर संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांना ट्विटरवर टॅग करत, उद्धवजी संजय राऊत यांना आवरा, त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. शिवरायांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही परखड भुमिका मांडली. यावेळी ते शिवसेना आणि शरद पवारांच्यावर घसरले. त्यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली. मागे हटतील ते संजय राऊत कसे? राऊत यांनी प्रतिउत्तर देतांना थेट उदयनराजेंनी ते वंशज असल्याचा पुरावा द्यावा अशी टीका केली. आता या टीकेनंतर हा वाद अधिकच चिघळला. राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान केला असून त्यांनी याबाबत माफी मागावी, असे भाजपने म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजपा आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. इतकेच नाही, तर भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी राऊत यांचा उल्लेख जेम्सलेनची औलाद असा केला. 

सोईच्या राजकारणाची संपूर्ण महाराष्ट्राला किळस 

या वाक्युध्दात काँग्रेसदेखील रणांगणात उतरली आहे मात्र त्यांचा आक्षेप शिवछत्रपतीच्या घराण्याच्या अपमानाबद्दल नसून, मुंबईचा माफिया डॉन असलेल्या करीम लाला याला भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी या देखील येत असत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. इंदिरा गांधी यांच्याबाबत संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे गैर असून, आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्याबाबत त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसचे नेते करू लागले आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल त्यांनी अद्यापही ठोस अशी भुमिका जाहीर केलेली नाही. या सोईच्या राजकारणाची आता संपूर्ण महाराष्ट्राला किळस वाटायला लागली आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी कायमच अत्यंत भावनिक मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्राच्या अनेक निवडणुका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित मुद्द्यावरही लढल्या गेल्यात. अलीकडच्या काही वर्षात हे प्रमाण तर अधिक वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. आजपर्यंत राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणे काही नवे नाही. राज्यातील एकाही पक्षाने ती संधी सोडलेली नाही. सर्वचजण महाराजांचे नाव वापरुन राजकारण करतात. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. शिवरायांचे वंशज असलेले उदयनराजे यांनी कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपाकडून निवडणूक लढली. त्यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले मात्र कधीही थेट छत्रपतींचा अवमान होईल, अशी टीका कोणीही केली नाही. राज्यात प्रथमच इतक्या खालच्या पातळीवर टीका झाल्याने छत्रपतींना दैवत मानणार्‍यांच्या (केवळ राजकीय स्वार्थासाठी नव्हे) भावना दुखावणारच! राजकारणात खालच्या पातळीवर होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांची आता जणू प्रत्येकाला सवयच झाली आहे मात्र असं प्रत्येकवेळी उचलली जीभ आणी लावली टाळ्याला, हे देखील योग्य नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवायला हवे.

Post a Comment

Designed By Blogger