भारताचा ‘जेम्स् बॉण्ड’; ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह

भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक आणि सर्वाधिक रिझोल्युशनच्या ‘कार्टोसॅट-३’ या रिमोट सेन्सिंग उपग्रहाचे बुधवारी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झाले. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-३ चे प्रक्षेपण करण्यात आले असून संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-३ महत्त्वाची भूमिका बजावेल. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-३ मधील कॅमेर्‍यात आहे. फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. आता कार्टोसॅट-३ च्या मदतीने पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-३ मध्ये आहे. भविष्यातले युद्ध तोफा आणि बंदुकांनी युद्धे लढली जाणार नाहीत. अंतराळावर वरचष्मा राखणारा देशच जगात खरी महासत्ता असेल. या दृष्टीने पाहता भारताने अवकाशातील महासत्तेकडे निश्‍चितपणे वाटचाल केली आहे.


दुसर्‍या देशाची हेरगिरी करण्यासाठी वापर

पृथ्वीच्या भोवती साधारण तीनशे किलोमीटर पासून ३६ हजार किलोमीटर उंचीवर विविध प्रकारचे कृत्रिम उपग्रह फिरत असतात. जगातल्या बहुतेक देशांचे उपग्रह दळणवळण, संचार, संरक्षण, हवामान, संशोधन अश्या विविध कारणासाठी कार्यरत आहे. काही देश दुसर्‍या देशाची हेरगिरी करण्यासाठी याचा वापर करत असतात. साधारण तीनशे ते सातशे किलोमीटर उंचीवरील उपग्रहांचा जमिनीवरील हालचाली टिपण्यासाठी वापर केला जातो. अमेरिकेने प्रथम अश्या उपग्रहांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते. १९५० च्या दरम्यान अमेरिकेने आणि रशियाने एकमेकांच्या भीतीने हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना खुप वेळा अपयश आले. पुढे ८०च्या दशकात अमेरिकेने आणि रशियाने हे तंत्रज्ञान प्राप्त केले. भारतामध्ये प्रथम डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांनी हे तंत्रज्ञान भारताकडे असावे म्हणून प्रयत्न केले होते. त्याची फलश्रुती म्हणून भारताचे अनेक उपग्रह अवकाशत यशस्वीरित्या भ्रमण करत आहेत. चांद्रयान-२ या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोच्या महत्त्वकाक्षेला मोठा धक्का बसला होता. मात्र या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात इस्रोचे चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. मात्र त्याआधी एक आनंदाची बातमी इस्त्रोने दिली. ती म्हणजे, कार्टोसॅट-३च्या यशस्वी प्रक्षेपणाची. विशेष; म्हणजे या मोहिमेत अमेरिकेचे १३ लघु उपग्रहही ध्रुवीय कक्षेत पाठवण्यात आले आहेत. 

तिसर्‍या पिढीतील पहिला उपग्रह 

गेली दहा वर्षे इस्रोतर्फे ‘कार्टोसॅट’ या पृथ्वी निरीक्षण करणार्‍या दूरसंवेदक उपग्रहांची शृंखला अवकाशात पाठवण्यात येत आहे. ‘कार्टोसॅट-३’ हा त्या शृंखलेतील नववा उपग्रह असून, तिसर्‍या पिढीतील पहिला उपग्रह आहे. या उपग्रहाद्वारे २५ सेंटीमीटरच्या रोझोल्युशनने जमिनीचे चित्रण करण्यात येणार असून, खराब हवामानातही जमिनीवरील हालचाली टिपण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचे, विकासकामांना सहाय्य करण्याचे काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-३ पार पाडणार आहे. जमिनीसह जलमार्गावरील टेहाळणीसाठी हा अत्याधुनिक उपग्रह प्रचंड फायदेशिर ठरु शकतो. भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने हिंदी महासागर आहे. एडनचे आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून दक्षिण चीन सागरापर्यंत आणि दक्षिणेला मोझाम्बिकपर्यंतच्या विस्तृत प्रदेशातील भारताच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणासाठी आज भारतीय युद्धनौका, पाणबुड्यांना नियमित संचार करावा लागत आहे. एडनच्या आखातात व्यापारी जहाजांवर सातत्याने हल्ले करणार्‍या सोमाली चाच्यांच्या विरोधात गेल्या पाच वर्षांपासून भारताने युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या युद्धनौका, पाणबुड्यांचा नियंत्रण कक्षाशी संपर्क राहणे अत्यंत आवश्यक असते. नैसर्गिकदृष्ट्या या भागावर युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानातूनही दूरवर टेहळणी करण्यावर मर्यादा येतात. यामुळे हिंदी महासागरावर प्रभुत्व गाजवणार्‍या भारतीय नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन सागरी संदेशवहनासाठी भारताने जीसॅट-७ हा खास उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

पाकिस्तान व चीनवर बारीक नजर

केवळ संरक्षणाच्या उद्देशाने अवकाशात धाडलेला हा भारताचा पहिलाच उपग्रह म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत इन्मरसॅट या परकीय उपग्रहाच्या मदतीने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांदरम्यान संदेशांची देवाणघेवाण करण्यात येत होती. परिणामी संदेशवहनावर मर्यादा येत होत्या. मात्र जीसॅट-७ नंतर आपण अन्य कोणत्याही देशावर अवलंबून नाही आता तर कार्टोसॅटच्या रुपाने अत्याधुनिक जेम्स् बॉण्ड भारतीय सीमांवर लक्ष ठेवून आहे. मुळात जमीन व समुद्री मार्गांवर भारताला पाकिस्तान व चीन सारखे कुरापतखोर शेजारी लाभले आहे. म्हणतात ना कोणत्याही देशाला त्यांचे मित्र किंवा शत्रु निवडता येतात मात्र शेजारी निवडता येत नाहीत. पाकिस्तान व चीन यांच्या उचापती सुरुच असतात. भारतात घुसखोरी करणे असो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने भारताच्या मार्गात आडकाठी आणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यामुळे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगण्यासाठी त्यांच्यावर बारीक नजर ठेवणे, हा एकमेव मार्ग आहे. यादृष्टीने अंतराळातून करण्यात येणारी हेरगिरी हा सोपा मार्ग मानला जातो. अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करुन विविध सेवा-सुविधांचे जाळे बळकट करण्याचा प्रयत्न जगातला प्रत्येक विकसित आणि विकसनशील देश करत आहे. देशांतर्गत टेहाळणीसह दुसर्‍या देशांमध्ये हेरगिरी करण्यासाठी, तिथली माहिती टिपण्यासाठीही कृत्रिम उपग्रहांची मदत घेतली जाते. या तंत्रज्ञानात इस्त्रोचा डंका जगभरात वाजतो, हे सत्य आता सर्वच देशांनी मान्य केले आहे. कार्टोसॅट-३च्या रुपाने ते पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.


Post a Comment

Designed By Blogger