मोदींचा जादू संपली!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघे दोन सदस्य असलेल्या फडणवीस सरकारने तिन दिवसातच मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे निश्‍चित झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शिवतीर्थावर राज्याभिषेक देखील होणार आहे. भाजपाचे बालेकिल्ले मानले जाणारे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांनंतर महाराष्ट्रातील सत्ता भाजपाने गमावल्याने प्रदेश पातळीवरील मोदी लाट ओसरल्यानंतर हळूहळू मोदींची जादूही संपत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले महाराष्ट्रासारखे मोठे राज्य भाजपाच्या हातून निसटल्याने नेमके कोणाचे व कुठे चुकले? यावर भाजपातील चाणक्य विचारमंथन करतीलच यात शंका नाही. यात एकमात्र तेवढेच खरे, विरोधकच नको, असे म्हणणार्‍या भाजपावर अनेक राज्यांमध्ये विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे 


‘बाय हुक ऑर क्रुक’ सत्ता मिळवायचीच भाजपाचा फॉम्यूला

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ यांसारख्या घोषणांमधून नरेंद्र मोदींचे नाव दुमदुमू लागले. मोदी लाट तयार झाली. त्याचा भाजपला निश्चितच फायदा झाला. २०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी झारखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप सरकार होते तर नागालँड, पंजाब आणि आंध्र प्रदेशात सहकारी पक्षाचे सरकार होते. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी अरुणाचल प्रदेश, आसाम, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम आाणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र दिल्ली, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात काँग्रेसने सत्ता गमावली होती. नंतर २०१४ मध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातही काँग्रेसचे पानिपत झाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचीही पडझड झाली. शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला व देवेंद फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणार्‍या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. भाजपाचा हा विजयरथ वेगाने धावत असताना २०१७ मध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये भाजपने सत्ता मिळवली. २०१८ मध्ये त्रिपुरात भाजपने सत्ता काबीज केली. मेघालयात एनपीपीने भाजपसोबत युती करून सरकार बनवले, नागालँडमध्ये भाजपने विरोधी पक्षांशी आघाडी करून सरकार बनवले. यात ट्रिपल तलाक, सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक सारख्या मुद्यांचा राजकीय श्रेयासाठी वापर करण्यात आल्यामुळे टीकाही झाली. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) ही आठ राज्ये वगळता जवळपास सर्वच राज्यांमध्ये भाजपाचे थेट किंवा सहकारी पक्षांच्या मदतीचे सरकार सत्तेत होते. गोवा, कर्नाटकसारख्या राज्यात बहुमत नसतांना भाजपाने तोडाफोडीचे राजकारण करत सत्ता हस्तगत केली. ‘बाय हुक ऑर क्रुक’ सत्ता मिळवायचीच जणू हा भाजपाचा फॉम्यूलाच झाला होता. साडेचार वर्षे काँग्रेसला थेट टक्कर देऊन एकहाती सत्ता मिळवल्यामुळे नरेंद्र मोदी यांची अजेय नेता अशी प्रतिमा झाली होती. 

मोदींच्या प्रतिमेला तडा 

मध्यंतरीच्या काळात नोटाबंदी, बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवरुन मोदी विरोधी वातावरण तयार झाले होते. परिणामी २०१८ च्या मध्यनंतर भाजपाची विजयी घौडदौड मंदावली. बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपाने गमावली. आंध्रप्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपापासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजपा आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले. या उलथापालथीत २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने पुन्हा दमदार पुनरार्गमन करत केंद्रात एकहाती सत्ता मिळवली. यामुळे महाराष्ट्रात होणार्‍या निवडणुकीत भाजपाही एकहाती सत्ता मिळेल, असा कयास बांधला जात होता. यामुळे फडणविसांच्या अतिमहत्वकाक्षेंमुळे अनेक जण दुखावण्यास सुरुवात झाली, एकनाथराव खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गजांना खड्यासारखे बाजूला करण्यात आले. पंकजा मुंडेंसह काही मातब्बरांनाही पाडण्याचा कुटील डाव खेळण्यात आला. दुसरीकडे अन्य पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना तिकीटे दिल्याने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले, परिणामी भाजपाचा उधळलेला वारु अवघ्या १०५ जागांवर येवून थांबला. गेली पाच वर्षे दुय्यम वागणूक मिळालेल्या शिवसेनेने भाजपावर कुरघोडीचा डाव साधला नसता तर ते राजकारणच काय! बार्गेनिंग पॉवर वाढलेल्या सेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची अट भाजपापुढे ठेवली. येथूनच राजकीय गणिते बिघडण्यास सुरुवात झाली. सेनेपुढे झुकायचे नाही कारण त्यांच्यापुढे पर्याय नाही, अशी भाजपाने आखलेली रणणिती पुढे फोल ठरली. येथे भाजपाचा अहंकारच नडला, हे उघड सत्य कोणीही नाकारु शकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करुन, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड केली. आता उध्दव ठाकरेचे मुख्यमंत्री राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा पराभव भाजपाचा असला तरी यामुळे मोदींच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. कारण सत्ता मिळविण्यासाठी गेल्या ७२ तासात भाजपाने जे घाणेरडे राजकारण केले, ते महाराष्ट्राला पटलेले नाही. कर्नाटकमध्ये जुलै महिन्यामध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशाचप्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा डाव होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तो फसला आणि महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. शेवटपर्यंत मोदी काहीतरी हुकमी एक्का वापरतील, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत होते मात्र शेवटपर्यंत तसे काहीच झाले नाही.

Post a Comment

Designed By Blogger