दबावतंत्र आणि बार्गेनिंग

पक्षांतर्गत कारस्थानामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबते झाली. पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे  व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगली. विशेष म्हणजे खडसे दिल्लीत भाजप नेत्यांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर तसे सांगितलेही होते. पण भाजप नेत्यांऐवजी पवारांचीच भेट घेतल्याने राजकीय चर्चांचा धुराळा उडणे स्वाभाविक आहे. मुळात ऐकीकाळी खडसेंचा भाजपातील हेवीवेट नेते म्हणून उल्लेख व्हायचा मात्र आता पक्षाने त्यांना पार अडगळीत टाकले आहे. आक्रमक स्वभावाच्या खडसेंना पक्ष शिस्त, पक्ष निष्ठा अशा गोंडस शब्दाच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याने अधूनमधून ते स्वकियांना लक्ष करतात. भाजपामधील खदखद सध्या मोठ्याप्रमाणात प्रत्ययास येते आहे. खडसेंच्या नाराजी नाट्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट, गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेल्या किंवा पराभूत झालेल्या नेत्यांनी चालवलेल्या परस्परांच्या भेटीगाठी आणि येत्या बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर एकत्र येत शक्तिप्रदर्शनाची चालवलेली तयारी या सार्‍यामधून भाजपमध्ये सगळेच काही आलबेल नाही याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेले आहेत.


भाजपाची पाळेमुळे घट्ट करणार्‍या नेत्यांमध्ये खडसेंचा मोठा वाटा

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेल्या सरकार या हिंदी चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘राईट ऑर राँग कुछ नही होता, जिसके पास पॉवर है उसका राँग भी राईट होता है’ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यांना हा संवाद चपखलपणे बसतो. भाजपा जेंव्हा सत्तेत होती तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येईल, ती पुर्व दिशा होती. याचा पहिली चार वर्ष भाजपाला फायदाच झाला विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांसह जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकला; मात्र मराठीत एक प्रसिध्द म्हण आहे, अति तेथे माती, यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला फटका बसला. त्यानंतर भाजपाचे वासे फिरल्यामुळे की अन्य कोणत्या कारणांमुळे भाजपाचा गेली ३० वर्ष मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाची साथ सोडून एकेकाळचे त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवा संसार थाटला. एवढेच नव्हे तर भाजपातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे पक्षापासून दुरावले. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे किमान डझनभर नेते शांत असले तरी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या ‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’ प्रमाणे त्यांची अवस्था आहे. फडणवीसांची पॉवर गेल्यानंतर खडसे, मुंडे यांनी दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. ते चुक की बरोबर, याचे हे येणारा काळच ठरवेल मात्र कोणत्याही संघटनेमध्ये सर्वांचे सदाकाळ समाधान शक्य नसते. त्यामुळे मतभेद निर्माण होणे हेही स्वाभाविक असते, परंतू भाजपात ठराविक नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याची अनेक उदाहरणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत समोर आली. भाजपाची महाराष्ट्रात पाळेमुळे घट्ट करणार्‍या नेत्यांमध्ये खडसेंचा निश्‍चितच मोठा वाटा आहे. विधीमंडळ गटनेते, विरोधीपक्ष नेते, महसूल मंत्री अशी अनेक पदेही त्यांनी भुषवली आहे. खडसे २०१४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, परंतु त्यांच्याजागी देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना जरूर मिळाले, परंतु जमीन घोटाळ्याचा आरोप होताच तीन वर्षांपूर्वी त्यांचे महसूलमंत्रिपद काढून घेतले गेले. क्लिनचीट मिळाल्यानंतरही त्यांना पक्षाने झुलवत ठेवले. 

ओबीसींचे खच्चीकरण?

यंदाच्या निवडणुकीत तर चक्क त्यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना संधी देण्यात आली मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला किंवा करण्यात आला, यावरुन खडसे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या चंद्रकात पाटील यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला जो खडसेंच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे तिच्या पराभवामागे भाजपचे नेतेच असल्याचा त्यांचा थेट आरोप राहिला आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकताच खडसेंनी त्यांना जाहीर समर्थन देत पंकजांच्या पराभवासही भाजपचे काही नेते कारणीभूत असल्याच्या आरोपाची तोफ डागली यावेळी त्यांची ओबीसी काडर्र्ची खेळी करत पक्षामध्ये ओबीसींचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला. मागच्या आठवड्यात खडसे यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीका केली होती. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले. भाजपात दुर्दैवाने बहुजन समाजाला डावलण्याचा होतोय, असा आरोप त्यांनी केला होता. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतिक्षा आहे असे एकनाथ खडसे म्हणाले होते. मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपकडून होणारी उपेक्षा आणि भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत झालेलं कटकारस्थान यामुळे खडसे नाराज आहेत. पक्षातील या नेत्यांची तक्रारही त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतरही संबंधित नेत्यांविरोधात कारवाई न करण्यात आल्याने खडसे प्रचंड नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी दिल्लीत भाजप नेत्यांऐवजी पवारांची भेट घेतली असू शकते. भाजपमध्ये सध्या पक्षनिष्ठेपेक्षा जिंकून येण्याच्या क्षमतेला अतोनात महत्त्व दिले जात आहे. कर्नाटक, गोव्यापासून महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र हेच सुरू आहे. पक्षामध्ये सत्तालोलुप आयारामांची सध्या चलती आहे. साहजिकच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जाणारच. मात्र कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला हे परवडणारे नसते, याची जाणीव पक्षश्रेष्टींना असेलच, यावर यथाअवकाश निर्णय देखील होती मात्र साप निघून गेल्यानंतर काठी मारण्यात काहीच फायदा होत नाही, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.

Post a Comment

Designed By Blogger