आगीचे हकनाक बळी!

दिल्लीच्या धान्य बाजार परिसरात लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक कामगार या इमारतीत असलेल्या छोट्या कारखान्यात काम करणारे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील मजूर होते. रात्री काम झाल्यानंतर बहुतेक कामगार कारखान्यांमध्ये झोपले होते. प्रत्येक खोलीत १० ते १५ कामगार होते. हे सर्व कामगार दिवसभर काम करून आणि संध्याकाळी, त्यांना जेथे जागा मिळेल तेथे झोपी जात असत. रोजीरोटीच्या शोधात ते आपले घर सोडून दिल्लीला आलेले हे कामगार इथल्या अरुंद गल्लीतील खोल्यांमध्ये अत्यंत वाईट परिस्थितीत राहत होते. कामगारांनी दिवसभर काम करून नेहमी प्रमाणे ते थकल्यानंतर झोपी गेले. परंतु त्यातील बहुतेकांना नव्या दिवसाची पहाट पाहताच आली नाही. आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लाखमोलाचे जीव जातात आणि करोडो रुपयांचे नुकसान होते. अग्नी सुरक्षा कायद्याच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. कामगार कायद्यानुसार कारखाना मालकाने त्यांना सोयीसुविधा पुरवल्या असत्या किंवा प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ४३ जग मृत्युमुखी पडले नसते. आता सर्व झाल्यानंतर या मृत्युच्या तांडवास जबाबदार कोण? 


नियम-कायदे धाब्यावर

आगीच्या घटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मानवी चुकाच कारणीभुत असतात. मात्र जो कोणी या चुका करतो त्याला सोडून निष्पाप जीवांनाच याच जीव गमवावा लागतो. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास वर्षभरात आगीत ४००च्या वर जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील बहुतांश घटना शॉर्टसर्किट किंवा बेकायदेशिर चालविल्या जाणार्‍या कारखान्यांमध्ये घडल्या आहेत. मागे मुंबईत अंधेरी भागातील कामगार राज्य विमा महामंडळाच्या इस्पितळास भीषण आग लागली त्यात, ज्यांचा काहीही दोष नसलेल्या आठ जणांचा बळी गेला होता. या आगीत १४५ जण जखमी झाले होते. कमला मिल कम्पाउंडमधील भीषण आगीत १४ जण दगावले होते. परळच्या क्रिस्टल टॉवर, ताडदेवच्या वेलिंग्टन हाईट्ससह प्रभादेवीच्या ३३मजली टॉवरच्या तीन मजल्यांना लागलेल्या आगीच्या काही घटनांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याच पंग्तीत दिल्लीची घटना मोडते. ज्या कारखान्याला आग लागती तो कारखाना निवासी क्षेत्रात बेकायदेशीरपणे कार्यरत आहे. त्यासाठी नियम-कायदे धाब्यावर बसवण्यात आले आहेत. हे कारखाने सुरू करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून कोणतीही एनओसीही घेतली गेली नसल्याची धक्कादायक माहिती दुर्घटना घडल्यानंतर समोर आली. 

पैशांसाठी जिवाशी खेळ

महाराष्ट्र शॉप्स् इस्टॅब्लिशमेंट कायदा कलमान्वये काम संपल्यानंतर कामगारांना काम करत असलेल्या दुकान, मॉल अथवा कारखान्यात थांबू न देता त्याच्या आराम अथवा राहण्याची व्यवस्था इतरत्र करणे गरजेचे आहे. असा नियम आहे. केवळ आर्थिक बचत व्हावी या हेतूने दुकानाची वेळ संपल्यानंतर कामगारांना तेथेच दुकानावर लक्ष राहावे व चोरी होवू नये म्हणून तेथेच निवासी मुक्काम करण्यास भाग पाडले जाते. मालक व चालकांना आपण त्यांच्या जिवाशी खेळत आहोत हे नियम माहित असूनही याकडे ते जाणूनबूजून दुर्लक्ष केले जाते.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नी सुरक्षा कायद्यानुसार कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर येत आहे. उपाहारगृहे आणि शॉपिंग सेंटरमध्ये फक्त पैशांसाठी जिवाशी खेळ केल्याचे एकूणच चित्र समोर येत आहे. प्रत्येक ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. या यंत्रणेची चाचणी दर सहा महिन्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच ही यंत्रणा वापरण्याचा अनुभव असलेले सुरक्षा रक्षक असणे बंधनकारक आहे. मात्र यातील एकही नियम पाळला जात नाही. अनेक वेळा इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा ही योग्य पद्धतीने काम करत नाही. व्यावसायिक इमारत उभारताना सर्वजण नियम पायदळी तुडवताना दिसतात. आपल्या व्यवस्थेचे हे दुर्दैव्य आहे की व्यवसायिकांना नियमानुसार बांधकाम करण्यासाठी विविध खात्याच्या परवानग्या आवश्यक असतात. सरकारी निकषांनुसार काम करून इमारत उभी करणे हे वेळखाऊ व आर्थिकदृष्टया परवडणारे नसते. त्यामुळे सर्व नियम गुंडाळून ठेवून बांधकामे केली जातात. याचा फटका कामगारांना बसतो आगीसारख्या आणीबाणीच्याप्रसंगी अशा इमारतीमध्ये काम करणार्‍या कामगारांना प्राणासही मुकावे लागते. बांधकामव्यवसायिक नामानिराळे राहतात. कारण इमारत विकून त्यातून नफा मिळवून झालेला असतो. यासाठी सर्वसामान्यांनीही जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. 

नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक

इलेक्ट्रीकल शॉर्टसर्किटमुळे लागणार्‍या आगी टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल उपकरणांविषयी कोणती काळजी घ्यायची, आयएसआय मार्क उपकरणांवर कुठे असतो? तो कसा पाहायचा? इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन जेव्हा नवा असतो तेव्हा त्याच्याकडे आवश्यक तो परवाना आहे की नाही याची खात्री कशी करून घ्यायची? यासह इमारतीत सदनिका घेताना अग्निरोधक उपकरणे कोणती आणि कुठे बसवली जातात? तसेच इमारतीला रेफ्यूज फ्लोअर आहे की नाही, अग्नी सुरक्षा यंत्रणा कोणत्या असतात? त्या कशा वापरायच्या? या सर्व गोष्टींबाबत सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. एकदा का नागरिकांमध्ये जनजागृती झाली की, अग्नी सुरक्षेबाबत सजगता येईल व दुर्देवी घटना टळू शकतील. शासनाने केलेल्या नियमानुसार छोट्या -मोठ्या उद्योग, व्यवसायाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उभारणे गरजेचे आहे. या आगप्रतिबंधक यंत्रणावर व्यावसायिक इमारतीमध्ये नसतील तर कडक कारवाई गरजेची आहे. अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन सर्व संबंधित अशा दुर्घटनांना जबाबदार आहेत, पण केवळ या सर्वांना जबाबदार धरून आगीचा प्रश्न सुटणार नाही, तर यावर कोणता उपाय केला पाहिजे याचाही सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे. रहिवासी किंवा नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आधीच्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या सुरक्षा उपायांबाबतची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. 

Post a Comment

Designed By Blogger