तरुणाईचे प्रतिनिधी; ‘रॉकस्टार’ पंतप्रधान

भारतात राजकारण्यांच्या निवृत्तीचे वय व घराणेशाहीवर वायफळ चर्चांचे फड रंगत असताना फिनलँड या देशात सना मारिया ही अवघी ३४ वर्षांची तरुणी पंतप्रधान पदावर विराजमान झाली आहे. पंतप्रधान पदाची धुरा हाती घेताच सना यांनी विश्व विक्रम रचला आहे. त्या जगातील सर्वात तरुण पंतपधान बनल्या आहेत. सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम युक्रेनचे पंतप्रधान आलेक्सी होन्चेरुक यांच्या नावे होता. ओलेक्सी होन्चारूक (३५) हे सर्वात तरुण पंतप्रधानांच्या यादीत आता दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्या पाठोपाठ न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या ३९ वर्षांच्या आहेत. होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. दोघेही पदावर असतानाच, दोघांचाही विक्रम सना यांनी मोडीत काढला आहे. तरुणमंडळींकडे ज्ञान, सामर्थ्य, बळ, बुद्धी या इतरांपेक्षा खूप जास्त असतात. त्यांना केवळ एका संधीची आवश्यकता असते. सना मारिया, जॅकिंडा आर्डन किंवा होनारुक यांनी ती दाखवून दिली आहे. तरुणांचा देश म्हणून भारताचा नावलौकिक आहे. मात्र सध्याच्या घडामोडी पाहता देशातील तरुणांची ओळख ही बेरोजगार, राजकारण्यांच्या हातातील बाहूले बनून छोट्या छोट्या कारणांवरुन रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे, अशी तर होत नाही ना? याचा तरुणांनी गांभीर्यांने विचार करण्याची आवश्यकता आहे.


लोकसभेत ६४ तरुण खासदार 

जगातील सर्वात जास्त तरुण असलेल्या भारतात तरुणांच्या राजकीय सक्रियतेबद्दल अनास्था (झालेली किंवा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली) हे जाणून घेण्यासाठी सतराव्या लोकसभेतील खासदारांचा अभ्यास पुरेसा ठरतो. सध्याच्या लोकसभेत ४० वर्षांखालील एकूण ६४ उमेदवार आहेत. म्हणजे साधारणतः १२ टक्के. २९ वर्षं सरसरी वय असलेल्या या तरुण देशाचे नेतृत्व अजूनही ५५ वर्षं सरासरी वय असलेली लोकसभा करत आहे. त्यातही बहुतांश उमेदवार राजकीय घराण्यातून आलेले दिसतात. यात कविता सिंग(२९), नुसरत जहाँ (२९), मिमी चक्रवर्ती (३०), गाडट्टी माधवी (२६), तेजस्वी सुर्या (२८), प्रज्वल रेवण्णा (२८),  इंद्र हंग सुभा (३०), चंद्राणी मुरुमु (२५), अभिषेक बॅनर्जी (३१), किंजरपु राम मोहन नायडू (३२), हिमाद्री सिंग (३२) यांच्यासह महाराष्ट्रातील पुनम महाजन (३२), रक्षा खडसे (३२), हीना गावित (३१), श्रीकांत एकनाथ शिंदे (२७) असे काही तरुण चेहरे संसदेत दिसतात मात्र ते महाराष्ट्रातील प्रस्तापित राजकीय कुटुंबाचे प्रतिनिधीत्व करतात. लडाख भागातून लोकसभेत पोचलेले जामयांग नामग्याल (३३) किंवा केरळच्या सर्वसामान्य कुटुंबातील रम्या हरिदास (३२), अशी बोटावर मोजण्याइतकी अपवादात्मक नावे वगळता फारसे काही दिसत नाही. कदाचीत यामुळेच घराणेशाहीची खूप चर्चा होते. एकाच घरात सतत सत्ता राहिल्याने अनेक दोष निर्माण होतात. एकहाती सत्ता केंद्रित झाल्याने भ्रष्टाचार वाढतो. यामुळे नवे नेतृत्त्व तयार होणे आवश्यक असते. तरुण नेतृत्व पुढे येण्या मागचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्थापित नेत्यांच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्यानेच तरुण पिढीला सरळ, साधं आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व हवे आहे. 

हाँगकाँगचा जोशुआ वांग आणि न्यूझीलंडची जसिंडा आर्डेन 

सध्या भारतातच नव्हे तर जगभरातील परिस्थिती पाहिल्यास एक मुद्दा ठळकपणे लक्षात येतो कि राजकीय नेत्यांच्या वागणूकीमुळेच त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडला आहे. देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहेच. पण ते नेतृत्व सर्वबाजूंनी विचार करणार असावे. नव्या पिढीचे विचार समजून घेणार्‍या शिक्षित तरुण नेतृत्वाची देशाला नितांत गरज आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे, हाँगकाँग चिनी हुकूमशाहीविरूद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचे देता येईल. या आंदोनात लाखो निदर्शक रस्त्यावर उतरले, या आंदोलनाचे नेतृत्त्व अवघ्या २२ वर्षाचा जोशुआ वांग नावाचा तरुण करत होता. या तरुणाची धास्ती चीनने देखील घेतली होती. जोशुआचे नाव अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. टाइम नियतकालिकाने २०१४ मध्ये सर्वांत प्रभावशाली मुलांमध्ये त्याचा समावेश केला. तसेच, २०१४ मध्ये ‘पर्सन ऑफ द इयर’साठी त्याचे नामांकन झाले होते. फॉर्च्युन नियतकालिकाने तर त्याला जगभरातील आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थान दिले. त्याचे २०१७ मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठीही नामांकन झाले होते. अगदी त्याच्यावर नेटफ्लिक्सने ‘टीनएज व्हर्सेस सुपरपॉवर’ हा माहितीपटही प्रदर्शित केला आहे. दोन वर्षांपुर्वी जसिंडा आर्डेन ही ३७ वर्षांची तरुणी अशीच जगभरात चर्चेत होती कारण ही तरुणी न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाली होती. जसिंडा यांचाही प्रवास प्रेरणादायीच आहे. २००८मध्ये जसिंडा आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेची अध्यक्ष झाली होती. त्याच वर्षी न्यूझीलंडमध्ये संसद सदस्य म्हणूनही ती निवडून आली होती. २००८पूर्वी जसिंडा न्यूझीलंड लेबर पार्टीतर्फे आययुएसवायमध्ये प्रतिनिधित्व करत होतीच. अध्यक्षीय मंडळातही होती. आययुएसवाय ही जगातील युवकांची सर्वांत मोठी राजकीय संघटना आहे. यामुळेच या संघटनेतून आलेल्या अनेक नेत्यांना आपापल्या देशांमध्ये नेतृत्व करण्याचीही संधी मिळालेली आहे. त्यात जसिंडाच्या रूपानं अजून एका युवा नेतृत्वाची भर पडली. 

३४ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती

कमी वयात पंतप्रधान होण्याचा त्यांचा रेकॉर्ड युक्रेनचे पंतप्रधान आलेक्सी होन्चेरुक यांनी तोडला ते अवघ्या ३५ व्या वर्षी पंतप्रधान झाले. वयाच्या ४०व्या वर्षी पंतप्रधान बनलेले राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. मात्र सना मारिया यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी फिनलँड देशाच्या पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेत सर्वांचे रेकॉर्ड तोडले आहेत. सना मरीन यांनी टॅम्पर विद्यापीठातून प्रशासकीय विज्ञानमध्ये मास्टर ही पदवी मिळविली आहे. २०१२ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. वयाच्या २७ व्या वर्षी त्या टॅम्पर नगरपरिषदेच्या महापौरपदी निवडून आल्या. यंदा जून महिन्यात त्यांची फिनलँडच्या परिवहन आणि संचारमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांच्याच पक्षाचे म्हणजेच सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे पंतप्रधान एंटी रिने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यानंतर सना मारिन यांची निवड या पदासाठी झाली. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात कतरी कुलमुनी (३२) आर्थिक व्यवहार मंत्री, मारिया ओहिसालो (३४) गृहराज्यमंत्री, ली अँडरसन (३२) शिक्षणमंत्री या महिला देखील तरुणाईचेच प्रतिनिधीत्व करत आहेत. सद्यस्थितीत भारातातही अशाच प्रकारची नेतृत्व तयार होण्याची काळाची गरज आहे. प्रामाणिकपणाच्या जोरावर नवे नेतृत्व जर पुढे आले तर नजीकच्या काळात देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होईल, यात तिळमात्रही शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger