मराठमोळ्या नरवणेंच्या हाती सामर्थ्यशाली लष्कराची कमान

विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्करप्रमुखपदासाठी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे. गेल्या महिन्यातच सरन्यायाधिशपदी शरद बोबडे यांची नियुक्ति झाली आहे. त्यांच्यानंतर नरवणे यांच्या रुपाने एक मराठी मणुष्य देशातील महत्त्वाचे पद भूषविणार आहे. नरवणे यांच्याआधी अरुणकुमार वैद्य यांना हा सन्मान मिळाला होता. एकूण १३३ देशांच्या सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. एका अहवालानुसार, भारताकडे ४२ लाख ७ हजार २४० सशस्त्र सैनिक आहेत. इतक्या मोठ्या सैन्यदलाचे प्रमुखपद भुषविणे साधी गोष्ट नाही.


पुणे शहराशी नाते 

मूळ पुण्याचे असलेले नरवणे हे ७ जून, १९८० रोजी ते लष्कराच्या ७व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले. जम्मू-काश्मिरातील दहशतवादविरोधी लढा व ईशान्य भारतातील सेवेचा त्यांना अनुभव आहे. त्यांची लष्करात ३७ वर्षे सेवा झाली आहे. लष्करी युद्ध कॉलेजात ते प्रशिक्षक होते. तसेच लष्कराच्या प्रशिक्षण कमांडचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. एरवी फक्त कमांडो पूर्ण करीत असलेला पॅराशूटमधून उडी घेण्याचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी लेफ्ट. जनरल नरवणे हे लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुखपदी पोचलेले तिसरे महाराष्ट्रीय ते आहेत. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवले होते. पुणे शहराशी त्यांचे नाते असून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे ते माजी विद्यार्थी आहेत. १९७६च्या दहावीच्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. नव्या वर्षात नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. नरवणे यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. असा दांडगा अनुभव असलेल्या नरवणे सध्याचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या पाठोपाठ भूदलातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. तेंव्हापासून मराठमोळ्या अधिकार्‍याला लष्करप्रमुखाचा मान मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. 

पाकिस्तान व चीनच्या कुरापती

भूदलाच्या इतिहासात आजवरच्या ३९ उपप्रमुखांपैकी फक्त नऊ अधिकारीच पुढे ‘जनरल’ अर्थात प्रमुख झाले आहेत. आता दहावा नंबर नरवणे यांचा लागला आहे. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील. सध्या भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान व चीनच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्कराचे सामर्थ्य पाहून त्यांची थेट लढण्याची हिंम्मत होत नाही मात्र वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे छुपे युध्द सुरुच असते. भविष्यात चीन व पाकिस्तानला त्यांची औकात दाखविण्याची गरज आहे. देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल, हवाई दल ही तिन्ही दले आपापल्या पद्धतीने काम करतात, परंतु बाह्य सुरक्षेची आव्हाने इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे संरक्षण दलाच्या तिन्ही दलांनी एकत्र काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद निर्माण केले आहेच. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे प्रचंड महत्त्वाचे पद आहे. सर्वात पहिल्यांदा १९७१ च्या युद्धसमाप्तीनंतर फिल्डमार्शल सॅम माणकेशा यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर १९९९ च्या कारगील युद्धानंतर सुब्रमणियम यांच्या नेतृत्वाखाली कारगील रिह्यू कमिटीने अहवाल दिला होता त्यातही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या आवश्यकतेवर भर दिला होता. त्याशिवाय नरेशचंद्र समितीनेही आपल्या अहवालात हेच म्हटले होते. महाराष्ट्रातील जनरल शेकटकर समितीनेही यावर आपले विशेष मत नोंदवले होते. म्हणजेच हिंदुस्थानी संरक्षण दलांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची गरज होती हे सर्वच समित्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये वेळोवेळी सांगितले होते. मात्र तरीही त्यावर निर्णय घ्यायला २०१९ हे वर्ष उजाडावे लागले. आता सीडीएसमुळे संरक्षण दलातील सुसज्जता अजूनच वाढणार आहे. यामुळे नरवणे यांना भूदलातील अंतर्गत बाबी व त्रृटींवर प्रभावीपणे काम करता येईल. 

नव्या लष्करप्रमुखांसमोर मोठी आव्हाने

आधीच काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यापासून खोरे धगधगत आहे. आतंकवादी हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. यामुळे नव्या लष्करप्रमुखांसमोर ही मोठी आव्हाने आहेत. आज भारताचे लष्कर प्रचंड सामर्थ्यशाली म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी ग्लोबल फायरपॉवर या संस्थेने जगातील विविध देशांच्या लष्करी क्षमतेचे सर्वेक्षण करून, कुठल्या देशाच्या सैन्याचा कितवा क्रमांक लागतो त्याची एक जागतिक यादी प्रसिद्ध केली होती. एकूण १३३ देशांच्या सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. भारताचा शेजारी पाकिस्तान या ग्लोबल फायरपॉवरच्या यादीत १३ व्या स्थानावर आहे. जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार, भारताकडे ४२ लाख ७ हजार २४० सशस्त्र सैनिक आहेत. तेच चीनकडे ३७ लाख १२ हजार ५०० सशस्त्र सैनिक आहेत; पण चीनचे २२ लाख ६० हजार सैन्य सक्रिय आहे, तर भारताकडे १३ लाख ६२ हजार ५०० सैनिक सक्रिय आहेत. भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे यांच्या समोर असलेल्या आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशाला संरक्षण दलाच्या बजेटसाठी नेहमीची निधीची कमतरता भासते. यासाठी संरक्षण मंत्रालयाशी योग्य समन्वय साधून हा बजेट कसा वाढवता येईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. संरक्षण दलाला जे बजेट मिळते त्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल. पर्यायाने देशाच्या सुरक्षेसमोर असलेली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षिततेची आव्हाने यशस्वीपणे पेलण्याचे काम नक्कीच करता येईल.

Post a Comment

Designed By Blogger