सूर्य पाहिलेला ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या बळावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. देवाला रिटायर्ड करा, असे म्हणणारे डॉ. लागू हे खर्‍या अर्थाने विवेकवादी विचारांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेकांना विवेकवादाची प्रेरणा दिली होती. म्हणून त्यांचे वर्णन सूर्य पाहिलेला माणूस, असे केले जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर त्यांचे योगदान ४५ वर्षांहून अधिक होते. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाने त्यांना ओळख दिली. रंगभूमीवर एक काळ गाजविलेल्या परंतु वृद्धावस्थेत फरफट झालेल्या अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली होती. अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारत ‘नटसम्राट’ हे नाटक त्यांनी अजरामर केले होते. यामुळे मराठी रंगभूमीवरील नटसम्राट असाच त्यांचा परिचय झाला. शैलीबद्ध अभिनयाचा पगडा असणार्‍या काळामध्ये डॉ. लागू यांनी वास्तववादी अभिनयाने नवी वाट निर्माण केली.


स्पष्ट विचारांनी वेगळी ओळख

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात भावे हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुण्यात बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, येथे झाले होते. १९५० मध्ये त्यांनी कान-नाक-घसा उपचाराचे विशेष प्रशिक्षण घेतले आणि प्रथम पुण्यात काही वर्षे काम करून नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील शिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुण्यात आणि आफ्रिकेत टाबोरा, टांझानिया येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. नंतर ते १९६९ मध्ये पुण्यात परतले आणि त्यांनी पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करण्याचे निश्चित केले. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांच्याबरोबर नाट्य संस्था सुरू केली. १९६९ मध्ये ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाद्वारे ते पूर्ण वेळ नट म्हणून काम करू लागले. त्यांनी अभिनय केलेले ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ हे चित्रपट प्रचंड गाजले. तसेच, ‘गिधाडे’, ‘नटसम्राट’, सूर्य पाहिलेला माणूस’ ही त्यांची नाटके विशेष गाजली. पिंजरा या व्ही शांताराम यांच्या चित्रपटातील भूमिका त्यांना खूप यश मिळवून देणारी ठरली. तर सिंहासन, झाकोळ, मुक्ता हे चित्रपट त्यांचा अभिनय सर्वदूर पोहोचविणारे होते. ‘हेराफेरी’, ‘चलते चलते’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘गांधी’ आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. चित्रपट आणि नाट्यक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही डॉ. लागू यांनी आपल्या स्पष्ट विचारांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. 

सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठविला

‘देवाला रिटायर करा’, असे सांगणार्‍या डॉ. लागू यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपला आवाज उठविला होता. त्यांचे ‘लमाण’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांना ‘कालिदास’ सन्मान, ‘पुण्यभूषण’ यासह फिल्मफेअर पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कारांनी डॉ. लागू यांना गौरवण्यात आले आहे. अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. त्यांची वैचारिक स्पष्टता खूप होती. अनेक पातळ्यांवर लढतांनाही त्यांनी रंगभूमीची शिस्त खूप बाळगली. डॉ. लागू नाटक किंवा कोणत्याही चित्रपटात काम करत असतील, तर दिग्दर्शक आणि अन्य कलाकारांना ती शिस्त पाळावी लागत असे. प्रचंड ऊर्जा असलेले हे व्यक्तीमत्व होते. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. विवेकवादी विचारांचे डॉ. लागू महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीशी जोडलेले होते. सामाजिक कामाचा संस्कार डॉक्टरांना घरातूनच मिळाला होता. निळू फुले यांच्याशी त्यांचे मैत्र त्यातूनच जुळले होते. सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झाल्यानंतर समाजासाठी काही करण्याची निकड भासू लागली. आपल्याला मिळालेला पैसा ते विविध सामाजिक कामांसाठी उपलब्ध करून देतच होते. मात्र, तो पुरेसा नव्हता. हा पैसा इतर कुणाकडून मागण्यापेक्षा तो स्वत: उभा करण्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांना घेऊन त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग बसवला. त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. त्यातून काही कोटी रुपये जमा झाले. त्याचा ट्रस्ट करण्यात आला. त्या रकमेच्या व्याजातून आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत राहून तळागाळातील लोकांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली जाते.

सर्वच क्षेत्रात नवे मापदंड 

समाजाप्रती अशी तळमळ हे डॉक्टरांचे फार मोठे वैशिष्ट्ये आहे. समाजासाठी जसे जमेल, तसे काही तरी करावे. कलावंतांवर त्याची जबाबदारी जास्त आहे, असे डॉ.लागू नेहमीच म्हणयाचे. मराठी रंगभूमी, प्रायोगिक रंभभूमी, मराठी व हिंदी चित्रपटांसह विविध सामाजिक चळवळींमध्ये हिरहिरीने भाग घेत त्यांनी सर्वच क्षेत्रात नवे मापदंड तयार केले आहेत. त्यांचे वाचन अफाट आणि विश्लेषण करण्याची क्षमता विलक्षण होती. जे वाटते ते बोलण्याचे आणि प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय त्यांनी दाखवले. त्यांचे वागण्या- बोलण्यातील आणि विचारांमधील वेगळेपण कायम अधोरेखित व्हायचे. यश, अथवा लोकप्रियता कलाकाराला मिळतेच. मात्र, त्यांना यशाबरोबरच प्रतिष्ठाही मिळाली. असे नट अगदी विरळच. परिपक्व, टोकदार आणि खरा अभिनय काय असू शकतो, याचा वस्तुपाठ दाखविला आणि या क्षेत्राला वेगळी दिशाही दिली.  डॉ. लागू यांच्या निधनामुळे अभिनयाचे एक पर्व संपले असून रंगभूमी आज पोरकी झाली आहे. त्यांच्यामागे पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम आणि मुलगा आनंद असा परिवार आहे. या दुख:तून सावरण्याची परमेश्‍वर त्यांना शक्ती देवो, हीच प्रार्थना!

Post a Comment

Designed By Blogger