गेल्या ४८ तासांपासून हवेतील गारावा वाढल्याने थंडीचा प्रभाव हळू हळू जाणवू लागला आहे. या गुलाबी थंडीत महाराष्ट्राच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे त्यातच मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे पहिल्यांदाच विरोधकांना सामोरे जात आहेत. यात त्यांच्या सरकारचे शिलेदार ठरलेले नाहीत; जेमतेम सहा शिलेदारांच्या जोरावर भाजपासारख्या तगड्या व आक्रमक विरोधकाला सामोरे जाणे ही ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षाच आहे. याची झलक उध्दव ठाकरेंना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाली. शेतकरी कर्जमाफीसह राज्यातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी त्यांच्या सरकारची गाडी सुरु होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे हिंदूत्त्ववादी अशी प्रतिमा असलेल्या शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे.
तारेवरची कसरत करावी लागेल
भाजपासोबतची गेल्या ३० वर्षांपासूनची युती तोडतांना शिवसेनेने अनेक आरोप केले. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी नवी मोट बांधतांना काही आश्वासने देखील दिले. यात सर्वात महत्त्वाचा किंबहून राजकीयदृष्ट्या लोकप्रिय म्हटले तरी चालेल, असे शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन होते. एकीकडे सरकारच्या तिजोरीत खळखळाट असताना राज्यावर चार लाख कोटींचे अर्ज झाल्याचे सांगत असताना शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन आम्ही दिलेले आहे आणि ते पूर्ण करूच, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिली; असे सांगत आर्थिक स्थितीविषयीची श्वेतपत्रिका लवकरच काढणार असल्याचे ठाकरे यांनी सूचित केले. यापार्श्वभूमीवर सातबारा कोरा कसा करणार? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. आधीच शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयक व स्वातंत्र्यविर सावरकर या विषयावरुन आडकित्यात सापडली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेने वादग्रस्त ‘नागरिकता सुधारणा विधेयका’ला लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर राज्यसभेत कोलांटउडी मारली यामुळे सेनेच्या कट्टर हिंदूत्ववादी प्रतिमेला तडा गेला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून महाआघाडी सरकार स्थापन केले असले तरी सुद्धा येत्या काळात या पक्षाला किती तारेवरची कसरत करावी लागेल याची जाणीव उध्दव ठाकरेंना झाली असेलच.
ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती
शिवसेनेचे राजकारण मुळात हिंदुत्व आणि मराठी या दोन मुद्द्यावर चालत आले आहे व हे दोन्ही मुद्दे काँग्रेसच्या विचारसरणीच्या पुर्णपणे भिन्न आहेत. खरतर मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे हा शिवसेनेच्या अजेंड्यावर असा एक महत्त्वाचा विषय. तत्कालीन युती सरकारच्या काळात गाजावाजा करून काही बांगलादेशींना पुन्हा पाठवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र याच मुद्यावरुन सेनेची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याने उध्दव ठाकरेंना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेले नाही. त्यातच काँगेेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी ‘मी पण सावरकर’ अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अधिवेशनातील रणनीतीचा भाग म्हणून, सावरकरांचा मुद्दा हा राज्यभर तापवण्याची योजना भाजपने आखली आहे. भाजप राज्यभर ‘मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर’ कँपेनला सुरुवात केली आहे. याआधी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर तडजोड नाही असे काँग्रेसला सुनावले होते. त्याचबरोबर सावरकर हे महान देशभक्त होते. आम्ही नेहरूंना, गांधी मानतो, तुम्ही सावरकरांना माना असे म्हटले होते. त्याआधी पाने उलगडल्यास २००४ मध्ये तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यपंक्ती असलेल्या शीला अंदमानातील सेल्युलर जेल मधून काढायला लावल्या आणि शिवसेना पेटून उठली. शिवसैनिकांनी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन तर केलेच पण स्वतः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला प्रतीकात्मकरित्या जोडेही मारले होते. मात्र आता राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्यानंतरही शिवसेना गप्पच असल्याने त्यांच्या हिंदूत्वाची धार बोथट झाली की काय? अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सावरकरांचे नातू रणजीत यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या सावरकरांचा अपमान करणार्यांना जोड्याने मारले पाहिजे या वक्तव्याची आठवण मात्र करून दिली आहे. काँग्रेस-शिवसेनेच्या या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. भाजपचा हा आक्रमक पवित्रा पाहता हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले, तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी आणली व देशातील सर्वात महत्वाचा मुद्दा मानला जाणारा राम मंदिराच्या निर्मितीचा मुद्दा देखील निकाली निघाला आहे. आता हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा एक मुद्दा राहिला आहे तो म्हणजे समान नागरी कायदा. ही तर शिवसेनेची जुनीच मागणी! या मुद्यावर शिवसेना आणि उद्धव ठाकरे मार्ग कसा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Post a Comment