कोण होणार मुख्यमंत्री?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून, आमच्या पुढे विरोधकच नाही, ही निवडणूक एकतर्फीच होणार अशा वल्गना करत भाजपाने निर्माण केलेल्या प्रचंड हवेमुळे विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपाच्या तंबूत दाखल झाले. कुस्तीसाठी तुल्यबळ पैलवानच नाही, असा समज झालेल्या मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या आत्म(अति)विश्‍वासाने ‘मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार’ अशा जोशात शड्डू ठोकला. मात्र महाआघाडीने विशेषत: राजकारणातील तेल लावलेले पैलवान व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. भाजपाचे स्वबळावर १४५ व युतीत २२० च्यावर जागा मिळविण्याचे दिवास्वप्न पार धुळीस मिळाले. भाजपाच्या सुसाट गाडीला १००च्या आसपास ब्रेक लागल्याने ५६ जागा जिंकणार्‍या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर निश्‍चितच वाढली आहे. निकालानंतर घडलेला अजून एक योगायोग म्हणजे २०१४ मध्ये भाजपाने राष्ट्रवादीच्या बाहेरुन मिळालेल्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बसविला. नंतर काही महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? हा यक्षप्रश्‍न होवून बसला आहे.


भाजपाची एकाधिकारशाही संपुष्टात

२०१४ च्या विधानसभेत स्वबळावर लढून आलेल्या १२२ जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार शिवसेनेला सोबत घेऊन पाच वर्षे तारून नेले. यंदा भाजपने १००च्या आसपास जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेशिवाय १४५चा बहुमताचा आकडा भाजपला गाठता येणार नाही. त्यामुळे यावेळच्या सरकारमध्ये शिवसेनेला कमालीचे महत्त्व आले असून येत्या पाच वर्षात शिवसेनेच्या अटी व शर्तीवर सरकार चालविण्याची वेळ भाजपावर आली आहे. गत पंचवार्षिकला निवडणुकीआधी भाजप शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या होत्या. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला न मागताच बाहेरुन पाठिंबा दिला आणि शिवसेनेने विरोधी पक्षात बसायचा निर्णय घेतला. पुढे शिवसेनेतील अस्वस्थता वाढायला लागली, एखादा गट फुटून भाजपला सत्तेत सहभागी होऊन पाठिंबा देईल, अशीही चर्चा सुरु झाली आणि नंतर काही महिन्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. यंदा भाजप शिवसेना यांनी युती करुन निवडणूक लढवली. युतीला स्पष्ट कौल देखील मिळाला आहे. मात्र गत पाच वर्षात भाजपाने सेनेला प्रत्येकवेळी झुलवले, अगदी जागा वाटपावेळीही लहान भावाची परवड केली. एकट्याच्या जोरावर १४५ प्लस जागा निवडणून आणण्याचे प्लॅनिंग फसल्यानंतर भाजपचे घोडे शंभर पर्यंत अडल्याने आता भाजपाची एकाधिकारशाही संपुष्टात येईल, याची जाणीव खुद्द फडणविसांना देखील आहे. आगामी काळात शिवसेनेच्या दबावाला तोंड देत सरकार चालविणे हाच मुख्य अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर असेल. 

भाजप-सेनेत रस्सीखेच

अशा दोलायमान परिस्थितीत सर्वात मोठा धोका हा पक्षांतर्गत विरोधकांकडून येवू शकतो कारण गेल्या पाच वर्षात फडणविसांनी स्वपक्षातील विरोधकांना खड्यासारखे बाजूला केले. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, विनोद तावडे व आता पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. ही मंडळी पलटवार करण्याची संधी सोडणार नाही, याचीही जाणीव फडणविसांना असली तरी केंद्रीय नेतृत्व त्यांच्या पाठिशी किती भक्कमपणे उभे राहते, हे महत्त्वाचे ठरणारे आहे. दुसरीकडे २०१४ च्या विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी या विरोधकांची संख्या ८३ होती. परंतु आता काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह घटकपक्षांसह विरोधकांचा आकडा ११० च्या आसपास पोचला आहे. या विरोधकांची ताकद वाढली आहे. तसेच भाजप शिवसेना महायुतीला टक्कर देवून या जागा निवडून आल्यामुळे ते यावेळी अधिक आक्रमक असतील. राजकारणाच्या या पटावर विरोधकांकडून पहिली चाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चालली आहे. शिवसेनेने भाजपासोबत राहून उपमुख्यमंत्रिपद घ्यायचे का आमच्या सोबत येऊन मुख्यमंत्रिपद घ्यायचे हे आता शिवसेनेनेच ठरवावे, अशी गुगली त्यांनी टाकली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री कोणाचा? यावर भाजप-सेनेत चाललेली रस्सीखेच उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षे वाटून घेणे हाच एक पर्याय

निकलानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या आधी युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जागावाटपात निम्म्या जागा आणि सत्तेचे समान वाटप असेच सूत्र ठरले होते. पण निम्म्या जागा देण्यात भाजपपुढे अडचणी असल्याने तडजोड करण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण आता मी भाजपच्या अडचणींचा प्रत्येक वेळी विचार करू शकत नाही. माझ्या पक्षाच्या वाढीकडे पाहिले पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट करीत मुख्यमंत्रिपदाचेही समसमान वाटप व्हावे, असेच संकेत दिले. भाजपचे घोडे शंभर पर्यंत अडल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधकही त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गात अडथळे आणू शकतात. गेल्या वेळी जितक्या जागा निवडून आल्या तेवढ्याही राखता आल्या नाहीत, हा मुद्दा लावून धरुन त्याचे खापर कोणावर तरी फोडले जाईल. आणि ते खापर साहजिकच फडणवीस यांच्यावर फोडण्यासाठी भाजपमधील फडणवीस विरोधक कसून प्रयत्न करतील. ठाकरे घराण्यातील आदित्य हा निवडणूक लढविणारा पहिला ठाकरे असून तो निवडूनही आला आहे. सुरुवातीपासूनच आदित्य मुख्यमंत्री होणार, अशा प्रकारे त्याला महत्व देण्यात आले. त्यामुळे भाजप बरोबर जायचे असेल आणि नसेल तरीही सत्तेच्या चाव्या आता शिवसेनेच्या हातात आहेत. एकतर आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या किंवा मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे अशी मागणी शिवसेनेकडून केली जाणार. मग मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षे वाटून घेणे हाच एक पर्याय भाजपसमोर राहतो. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, दोन्ही काँग्रेस, अपक्ष एकत्र येण्याची शक्यताही राजकीय पंडीतांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र हे तितके सोपे नाही. कारण सेना केंद्रातही सहभागी आहे. शिवाय  भाजप शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावू शकते. यामुळे उध्दव ठाकरे संयमाचीच भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Designed By Blogger