शरद पवारच तेल लावलेले पैलवान

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गुरुवारी खर्‍या अर्थाने संपली. भाजपाला लोकसभेत मिळालेले एकतर्फी यश, पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, ट्रिपल तलाक यासारखे अस्त्र-शस्त्र घेवून रणांगणात उतरलेल्या भाजपामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आणि भाजप-शिवसेना युतीचे सराकार सत्तेवर येणार, असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्‍वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हातात कमळाचे फुल घेतले. यामुळे आधीच गलितगात्र झालेल्या काँग्रेसने केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक लढवली, असे म्हणणे पुर्णपणे चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत भाजपासमोर कडवे आव्हान निर्माण केले. परिणामी ‘अब की बार २२० पार’ असा नारा देणार्‍या भाजपाला १०० जागांवर ब्रेक लागला.


ठराविक नेत्यांभोवती सत्ताकेंद्र

विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला पार पडल्या. यानंतर लगेचच समोर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ५० ते ६० जागा मिळतील व भाजपा, शिवसेना युती २२०च्या पुढे मजल मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ‘२२० पार’ला जनतेने स्वीकारले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी सभा घेऊनही भाजप-शिवसेनेच्या सहा मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे आणि शिवसेनेचे नेते, मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का आहे. भाजपात झालेली मेगाभरती व भाजपा नेत्यांकडून होत असलेला सत्तेचा उन्मात मतदारांना खटकल्याने भाजपाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. यावर शरद पवारांनी केलेले भाष्य खूप मार्मिक ठरते, सत्ता येते आणि जाते, पण जमिनीवर पाय ठेवावे लागतात, असे ते म्हणाले. ते तितकेच खरे आहे. एका पाठोपाठ मिळत असलेल्या यशामुळे (भाजपला नव्हे तर नरेंद्र मोदींना) राज्यातील भाजप नेत्यांना केवळ दोन बोट स्वर्ग उरला होता. त्यातही ठराविक नेत्यांभोवती सत्ताकेंद्र फिरु लागल्याने पक्षात कटशहाचे राजकारण पहायला मिळाले. 

लढवय्ये नेते म्हणून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

निकाल लागल्यानंतर एक बाब कटाक्षाने लक्षात येते की मुख्यमंत्र्यांना अडसर ठरणार्‍या काही नेत्यांचे तिकीट आधीच कापण्यात आले तर ज्यांना तिकीट मिळाले ते मोठे नेते पराभूत झाले, याला योगायोग म्हणा का, दुसरे काही मात्र हे निकालानंतर आत स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणी आणणार्‍या एकनाथराव खडसेंचे तिकीट आधीच कापण्यात आले व एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरातून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पराभूत झाल्या. तिकडे महिला मुख्यमंत्री पदाची मनिषा बाळगणार्‍या पंकजा मुंढे देखील पराभूत झाल्या. या निवडणुकीत लढवय्ये नेते म्हणून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले ते ८० वर्षांचे तरुण नेते शरद पवार यांच्यावर!शरद पवार, अजित पवारांसह विरोधी पक्षातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात भाजपाची खेळी सपशेल अपयशी ठरली. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयाचा विडा उचलला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत भाजपासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. शरद पवारांनी आक्रमक्र पवित्रा घेतल्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील त्यांना मोठी साथ दिली. २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला होता. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या धक्क्यांच्या सामना करावा लागला होता. अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना भाजपामध्ये प्रवेश केला. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर झंझावाती दौरे केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसनं तितका प्रचार केला नाही. तर उलटपक्षी शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि त्यांच्या प्रचाराला मोठे यशही मिळताना दिसून येत आहे. 

भाजपाला धडा नक्किच शिकवला

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या आधी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकणारे उदयनराजे भोसले विक्रमी मतांनी पराभूत झाले. याचेही श्रेय शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारालाच जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या ‘कमबॅक’ मुळे राज्यातील सत्तेची गणितं बदलतात की काय? यावर चर्चा सुरु आहे. भाजपाने या निवडणुकीत मित्रपक्षांसमवेत एकूण १६४ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने १२४ जागांवर आपले नशीब आजमावले होते. भाजपाचे नेतेमंडळी स्वबळावर १४५ ची मॅजिक गाठण्याचा दावा करत होते. कारण १९८५ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युती किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली. यंदा भाजपचे १४५चा जादुई आकडा गाठण्याचे ठरविले होते मात्र ते अपुर्णच राहिले. अंतिम आकडेवारी नंतर राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळाला, तर आदित्य ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे. ही चर्चा सुरु होण्याचे कारण म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असे ट्विट केलेे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, याचे चित्र येत्या दोन दिवसा स्पष्ट होईलच मात्र या निकालाने भाजपाला एक धडा मात्र नक्किच शिकवला आहे.

Post a Comment

Designed By Blogger