पाचवा स्तंभ आणि दुधारी तलवार?

विधिमंडळ, कार्यकारी नोकरशाही, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ म्हणून ओळखले जातात. यात आता पाचवा स्तंभ म्हणून सोशल मीडियाने स्वत:ची जागा निर्माण केली आहे. आधीच्या चारही स्तंभांना काही नियम, अटी, चौकटी असल्याने त्यांच्यावर काहीप्रमाणात मर्यादा येतातच. ही मर्यादा ओलांडून सर्व चौकटी तोडण्याचे कार्य केले ते पाचव्या स्तंभाने अर्थात सोशल मीडियाने. येथे कुणाविरुध्दही दाद मागता येते, संताप, राग, रोष व्यक्त करता येतो, कोणतेही काम करायचे असेल तर येथेच नियमावली तयार करुन ती व्हायरल करत आपले उद्दिष्ठ साध्य करता येते. हा एकाप्रकारे खर्‍या अर्थाने जनता दरबारच आहे. कारण येथे अनेकवेळा न्यायदेखील मिळतो. जशी प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तशी दुसरी बाजू सोशल मीडियाला देखील आहेच. याचा अतिरेक व गैरवापर प्रचंड नुकसानदायी व घातकी देखील आहे. म्हणूनच सोशल मीडियाला दुधारी तलवार म्हटले तर ते चुकिचे ठरणार नाही!


भारतात तब्बल ३० कोटी फेसबुक वापरकर्ते 

आजचे युग सोशल मीडियाचे मानले जाते. ८० च्या दशकात इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर ‘वर्डप्रेस’ २००३, ‘फेसबुक’ २००४, ‘ट्विटर’ २००६ आणि व्हॉट्स अ‍ॅप’ २००९  मध्ये जन्माला आहे. आज हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. सुरुवातीला याच उद्देश केवळ मनोरंजनात्मक माहितीची देवाण-घेवाणापुरता मर्यादित असला तरी आता सर्वांचे एकत्रित कॉम्बोपॅक असणार्‍या सोशल मीडियाने पारंपारिक मीडियाची संकल्पनाच बदलवून टाकली आहे. पुर्वी आपण जगभरातील घटना, राजकीय घडामोडी, नवनवीन शोध आणि बातम्या यासाठी छापील माध्यमांवर अवलंबून रहावे लागत असे. त्यानंतर आकाशवाणी व दूरदर्शनने आघाडी घेतली. वाचण्यापेक्षा दृश्य माध्यम जास्त प्रभावी ठरले. ९० च्या दशकानंतर आलेल्या २४ तास वाहिन्यांनी तर लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र त्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम केले ते सोशल मीडियाने! आजकाल सोशल मीडियामध्ये व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, ट्विटर आदी माध्यमांचा प्रामुख्याने समावेश होतो. आजघडीला फेसबुक ही जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुकच्या मार्च २०१९च्या आकडेवारीनुसार, जगभरातून १६ कोटी लोक फेसबुकचा दररोज वापर करतात. एकट्या भारतात आज तब्बल ३० कोटी भारतीय फेसबुक वापरतात. 

सोशल मीडियावर बंधणे आणण्याची मागणी 

फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाऊन विद्यापीठात बोलतांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक लोकशाहीचा पाचवा खांब असल्याचे म्हटले आहे. लोकांनी सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात प्रभावाशाली माध्यम आहे. आज सोशल मीडिया समाजाचा पाचवा स्तंभ म्हणून खंबीरपणे उभा आहे. आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी ठरले आहेत. लोकांना विचार मांडण्यासाठी अन्य कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही. फेसबुकमधून आपले विचार थेट मांडू शकतात, असे झुकेरबर्ग यांनी नमुद केल्यानंतर या विषयावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आज फेसबुकसारख्या सोशल मीडिया माध्यमाचा पाचवा स्तंभ म्हणून उल्लेख केला जावू लागला कारण, हे कोणत्याही भावना व्यक्त करणारे खुले व्यासपीठ आहे. मात्र येथे जितक्या चांगल्या बाबी मांडल्या जातात त्यापेक्षा अर्थहिन व चुकीची माहिती पसरवली जाते. एखादी तरुण जो बी.कॉम.ची परीक्षा जेमतेम पास झालेला आहे, तो पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांनी काय करायला हवे? यावर भाष्य करतो. चुकीची माहिती पसरवून लोकांच्या भावना भडकवतो व यावर कोणी काही बोलले तर अभिव्यक्ती स्वांतत्र्याची गळचेपी होत असल्याची बांग ठोकली जाते. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे अफवांचे चांगलेच वाढले आहे. कुठलीही घटना घडली की सोशल मीडियावर तात्काळ ती येते. यात फेसबुक, व व्हाट्सअप यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एखादी घटना घडली की व्हाट्सअपवर टाकली जाते. तसेच त्याला रंजक रूप देण्यात येते. काही दिवसांपूर्वी एका मेसेजमुळे जमावाने धुळे येथे ५ जणांची दगडाने ठेचून हत्या केली होती. तसेच राज्यभरात अशा अनेक घटना घडल्या होत्या. यामुळे सोशल मीडियावर बंधणे आणण्याची मागणी पुढे आली. यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. 

पाचव्या खांबाचा पाया हा परदेशी शक्तीच्या हातात

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाने म्हणजेच एमईआयने सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापात्र दाखल केले. यानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त (हेट स्पीच) भाषण पसरविणाविरुद्ध भारत सरकार मोठी कारवाई करणार आहे. १५ जानेवारी, २०२० पासून नवीन नियम लागू होतील. तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुसरीकडे, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर सेन्सॉरशिप असणे आवश्यक आहे. यात सर्वात मोठी बाब म्हणजे सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांची मालकी परदेशी आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने ज्याच्याकडे जास्त माहिती असेल तोच सर्वशक्तीशाली असेल, असे म्हटले जाते. भविष्यात कोणत्या देशांमध्ये युध्द जरी झाले तरी त्या माहिती हेच मोठे शस्त्र ठरेल. आपण विविध प्रकारचे अ‍ॅप्स वापरत आहोत, व्हॉट्सअप व फेसबुकतर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडींपासून इत्यंभूत माहिती परदेशी कंपन्यांकडे पाठवित आहोत, याकडे आपले सोईस्कररित्या दुर्लक्ष होते. जर झुकेरबर्ग यांच्या मतानुसार फेसबुक हा लोकशाहीचा पाचवा खांब झाला आहे तर ही चिंतेची व चिंतनाची देखील बाब आहे. कारण या पाचव्या खांबाचा पाया हा परदेशी शक्तीच्या हातात आहे, यामुळे याचा वापर ते कसा करु शकतात? याचाही गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger