कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय)मुळे संपूर्ण जग बदलत चालले आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा पर्याय पुढे येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक अथवा मानवी बुद्धिमत्तेचे प्रथम गणिती आणि नंतर कॉम्प्युटर कोडमध्ये रूपांतर करून एखाद्या सिस्टिमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे होय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगातील सर्वांत आव्हानात्मक सामाजिक समस्या सोडविण्याची क्षमता आहे. एआयचा अचूक व प्रभावीपणे वापर करुन व्यापक प्रमाणात सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो. एआय कडे भविष्यातील सर्वात शक्तीशाली तंत्रज्ञान म्हणून पाहिले जात आहे. या तंत्रज्ञानामध्ये जो पारंगत होवून महारथ प्राप्त करेल तोच उद्या संपूर्ण जगावर सत्ता गाजवेल! काळाची पाऊले ओळखत व भव्यिष्याचा अचूक वेध घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र अमिरात अर्थात यूएईमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारचे हे जगातील पहिले विद्यापीठ मानले जात आहे.
भविष्यातील वाटचाल सुरु
यूएईमधील शेख हे घरात वाघ-सिंह पाळणे, सोन्याच्या गाड्या वापरणे यासह महागडे व जगावेगळे शौक पाळण्यासाठी ओळखले जातात मात्र याचवेळी ते मोठमोठ्या इमारती बांधण्यासह नवनवीन प्रयोग करण्यातही पुढे असतात. युएईने नुकताच केलेला प्रयोग सध्या जगभरात चर्चेत आला आहे. त्यांनी चक्क कृत्रिम बुध्दिमत्तेचे विद्यापीठ सुरु केले आहे. एआय मोहम्मद बिन जायाद विद्यापीठ (एमबीझेडयूआयए)चे शैक्षणिक वर्ष पुढच्या वर्षी २० सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहे. या विद्यापीठाकडून पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबर पदव्युत्तर व पीएच. डी. अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मानवी मनाच्या अमर्याद कल्पनाशक्तीचा पूर्णपणे वेध घेतला तर आपल्याला बरेच काही साध्य करता येईल. एआय विद्यापीठाच्या माध्यमातून हे काम केले जाईल, असे यूएईचे राज्यमंत्री सुलतान अहमद अल जाबेर असे स्पष्ट करत भविष्यातील वाटचाल सुरु केली आहे. एआय म्हणजे, विशिष्ट कामासाठी तयार करण्यात आलेली यंत्रे, सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीशी जुळून घेतात आणि काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योग्य कृती करतात. अशा प्रकारे तयार केलेल्या यंत्रांमध्ये निर्माण होणार्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे, त्याची कारणे, माहिती, ज्ञान, नियोजन, अभ्यास, संवादप्रक्रिया, परिणाम आणि नियंत्रण करण्याची क्षमता अशा प्रकारच्या विविध घटकांवर आधारित हे तंत्रज्ञान विकसित केले जाते. उपलब्ध माहितीआधारे (डाटाबेस) इंटरनेट आणि सॉफ्टवेअरला ‘स्मार्ट डीसीजन सपोर्ट सिस्टीम’ म्हणून विविध क्षेत्रांत याचा उपयोग केला जाऊ शकतो.
एआय हे उद्याचे भविष्य
देशभरातील सामान्य जनतेसमोर असलेले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तंत्रज्ञानाने थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करून ’कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापराचे प्रमाणही वाढत आहे. जगभरात विविध ठिकाणी यासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणूक गेल्या वर्षभरात ६४० दशलक्ष डॉलरवरून २०२५ पर्यंत ३७ अब्जांपर्यंत वाढलेली असेल आणि मानवानेही हे नवे तंत्रज्ञान स्वीकारलेले असेल. भारतातही एआयच्या अभ्यासासाठी मुंबईत राज्य सरकार, मुंबई विद्यापीठ, आणि वाधवानी इन्स्टिट्यूट या तिघांच्या सहकार्यातून केंद्र उभारणी करण्यात आली आहे. ‘वाधवानी इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ सोशल गुड्स’ असे या केंद्राचे नाव आहे. एआय हे उद्याचे भविष्य आहे. याची झलक नुकत्याच समोर आलेल्या दोन घटनांमुळे जगासमोर आली. यातील पहिली म्हणजे, चीनने नुकतीच हुबेहुब मानवासारख्या दिसणार्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. आघाडीची वृत्तसंस्था क्षिनुआ आणि चिनी सर्च इंजिन कंपनी सोगोऊ यां च्या विद्यमाने जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या वृत्तनिवेदकाची निर्मिती करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या वृत्तनिवेदकाचे नाव झँग असे ठेवण्यात आले असून झँग इंग्रजी आणि मँडेरिन भाषेत बातम्या वाचू शकतो. दुसरी घटना म्हणजे, मिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे. हे व्हर्चुअल पात्र सात वर्षाच्या बडबड्या मुलासारखे वाटते. ‘शिबुया मिरई’ नावाचे हे बालक शारीरिकदृष्ट्या अस्तित्वात नाही, परंतु ‘लाईन’ या मेसेजिंग अॅपवर तो लोकांशी बोलू शकतो. तो संदेशांचे उत्तरही देऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तो तयार केला आहे. शिबुया मिरई हा जपानमधील पहिला आणि जगातील कदाचित पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पात्र बनले आहे. मध्य टोकीओ प्रांतात ‘शिबुया मिरई’ याला शहराचा अधिकृत नागरिक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
भारताला स्पष्ट धोरण आखावे लागेल
अनेक पाश्चात्य देशात पोलीस यंत्रणा व विमानतळासह गर्दीच्या ठिकाणी चेहरा ओळखणार्या तंत्रज्ञानाचा वापर सरु करण्यात आला आहे. भारतातही फेब्रुवारी २०१८ मध्ये संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्स फॉर स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड डिफेन्सचा अहवाल जून २०१९ मध्ये मंत्रालयाला देण्यात आला. त्यांनी केलेल्या शिफारशींनुसार संरक्षण मंत्रालयाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संरचना, कार्यसूची, धोरणपूर्ती आणि संवर्धन याबद्दलचे आपले धोरण निश्चित केले. त्याच महिन्यात मंत्रालयाने संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौन्सिलची नियुक्त केली आहे. अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स व युरोपियन युनियनमधील प्रगत देशांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास, त्यातील संशोधन आणि संभाव्य धोके यावर त्यांची व्हिजन डॉक्युमेंटस् असतात. त्याच अनुषंगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास करून ते प्रभावीरीत्या राबवण्यासाठी भारताला स्पष्ट धोरण आखावे लागेल. भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रतिभेचा तुटवडा आदी गोष्टींमुळे त्याच्या वापरावर मर्यादा असल्या तरी आयआयटी, आयआयएससी, एनआयटी, आयआयएसईआरमध्ये संगणक व इंजिनिअरिंग क्षेत्रातील दिग्गज तयार होतात, हे विसरुन चालणार नाही. युएईमधील एआय विद्यापीठाच्या धर्तीवर प्रयोग केल्यास त्याचा भारताला निश्चितच फायदा होईल, यात तिळमात्र शंका नाही.
Post a Comment