भारताच्या सुरक्षिततेला ‘हनी ट्रॅप’चा धोका

दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताच्या शेजारील पाकिस्तानातून भारतात छुप्या मार्गाने दहशतवादी घुसविणे नवीन राहीले नाही. गेल्या काही दशकांपासून पाकिस्तानच्या या कुरापती सातत्याने सुरुच आहेत. याला भारताने सर्जिकल स्ट्राईक व एअरस्टाईकच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिल्यानंतरही पकिस्तातनचे शेपूट वाकडेच आहे. भारताला थेट भिडण्याची पाकिस्तानची हिम्मत आणि औकात दोन्हीही नसल्याने पाकिस्तानी लष्कर व त्यांची गुप्तचर संघटना आयएसआय काही ना काही मार्गांनी कुरापती काढत असतात. अलीकडच्या काही वर्षात सीमापार घुसखोरी करणे अवघड बनले आहे. त्यामुळेच पाकिस्तान ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून नव्या प्रकारे छुप्या कारवाया करणे सुरु केले आहे. साधारणत: २०१४ नंतर ‘हनी ट्रॅप’ची प्रकरणे मोठ्याप्रमाणात उघड झाली आहेत. पाकिस्तानने छेडलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’चाच हा एक भाग आहे.


फेसबुकवर अकाऊंट सुरु करुन अश्‍लिल चॅटिंग

भारतीय लष्करासंबधीची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जातात. काही वरिष्ठ अधिकार्‍यांचे फोन क्रमांक, कोणत्या ठिकाणी लष्कराचा सराव होणार आहे, अधिकार्‍यांच्या नियुक्त्या, सैन्य हालचाली, शस्त्रसाठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी गोपनिय माहितीबाबत किंवा अन्य संवेदनशील माहिती घेण्याचा प्रयत्न हेरांच्या माध्यमातून केला जातो. यासाठी अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कराच्या जवानांना टार्गेट करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासाठी ‘हनी ट्रॅप’वापर हा मोठ्याप्रमाणात करण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. ‘आयएसआय’कडून अशा प्रकारचे ‘हनी ट्रॅप’ लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक मुख्य हत्यार बनला आहे. ‘हनी ट्रॅप’ मध्ये सुंदर मुलीच्या किंवा महिलेच्या नावाने सोशल मीडियावर प्रामुख्याने फेसबुकवर अकाऊंट सुरु करुन लष्करी अधिकारी किंवा जवानांशी चॅटिंग केली जाते. सुरुवातील मैत्री करत नंतर अश्‍लिल व्हिडीओ, फोटोग्राफ, चॅटिंगच्या माध्यमातून जवानांना जाळ्यात ओढले जाते. काहीवेळा पैशाचे अमिष देखील दाखविण्यात येतात. या ट्रॅपमध्ये अधिकारी एकदा अडकला की त्याला ब्लॅकमेलिंग करुन गोपनिय माहिती काढण्यात येते. 

‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय संघटनेशी लागेबांधे 

गेल्यावर्षी ब्राह्मोस मिसाईल सेंटर आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या नागपूरमधील एका प्रकल्पामध्ये कार्यरत असणार्‍या निशांत अग्रवाल नावाच्या भारतीय शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली होती. हा शास्त्रज्ञ ‘आयएसआय’च्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे समोर आले होते. या जाळ्यात अडकून अग्रवालने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या संदर्भातील हायटेक माहिती ‘आयएसआय’ला दिल्याची माहिती उघड झाली होती. उत्तर प्रदेशातील अँटी टेररिझम सक्वाड आणि लष्कराचे मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती. त्याआधी उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अच्युत प्रधान नावाचा बीएसएफ जवानही अशाच स्वरूपाच्या ऑपरेशनमध्ये पकडला गेला होता. फेसबुकवरून तो ज्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होता, त्या मैत्रिणीच्या फेसबुकच्या अकाउंटमध्ये ९० भारतीयांचा समावेश होता. त्यापैकी काही लष्करातील जवान किंवा अधिकारी होते. राजस्थानमधील अलवारमध्ये १९ वर्षांचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये पकडला गेला होता. त्यापुर्वी अरुण मारवाह नामक हवाई दलाचा एक अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघड झाले होते. त्याने अनेक महत्त्वाचे फोटोग्राफ आयएसआयला दिल्याचे कबूल केले. २०१७ मध्ये कल्याणमधून आरिफ माजिदी या तरुणाला पकडण्यात आले होते. ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय संघटनेशी त्याचे लागेबांधे असल्याचे, त्याचा संबंध असल्याचे उघडकीला आले होते. तोदेखील ‘हनी ट्रॅप’मध्येच अडकला असल्याचे समोर आले होते. काही वर्षांपूर्वी इस्लामाबादेत असणार्‍या भारतीय दूतावासातील भाषा विभागातील कनिष्ठ दर्जाच्या तीन अधिकार्‍याना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवल्याचे निदर्शनास आले होते. 

‘हनी ट्रॅप’च्या जागी ‘बाबा ट्रॅप’

आतातर ‘हनी ट्रॅप’च्या जागी ‘बाबा ट्रॅप’चा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. यात अध्यात्मिक गुरूंच्या बनावट प्रोफाईल तयार करून जवानांना लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत १५० बनावट प्रोफाईल समोर आल्या आहेत. टिक-टॉक, स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुकचा त्यांच्याकडून वापर करण्यात येत आहे. राजस्थान पोलिसांनी लान्स नाईक रवी वर्मा आणि शिपाई विचित्रा बेहरा या दोन लष्कराच्या जवानांना नुकतीच अटक केली आहे. या घटना वारंवार घडताहेत. ‘हनी ट्रॅप’ लावणे आणि त्यात संरक्षण क्षेत्रातील जवानांना, तरुणांना, अधिकार्‍यांना, शास्त्रज्ञांना गुंतवणे या संपूर्ण प्रक्रियेतील मोडस ऑपरेंडी पाहिल्यास त्यात साम्य दिसून येते. अलीकडील काळात हे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडिया व स्मार्टफोनचा वाढलेला वापर! याच माध्यमातून दहशतवादी संघटना, गुप्तहेर संघटना यांच्याकडून जास्त प्रमाणात वापर होतो. भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे या दहशतवादी संघटना व शत्रुराष्ट्रांनी यालाच आपले प्रमुख हत्यार बनविले आहे. ‘हनी ट्रॅप’ लावताना ज्या व्यक्तींना जाळ्यात ओढायचे आहे त्यांच्या इंटरनेट वापरण्याच्या सवयी जाणून घेतल्या जातात. त्यांची सायबर सायकॉलॉजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या व्यक्ती सातत्याने पॉर्न साईट व्हिजिट करतात, त्यांच्य गरजा ओळखून त्यानंतर फेसबुक किंवा अन्य सोशल माध्यमांतून संपर्क साधला जातो. यासाठी महिला व मुलींच्या नावाने डमी अकाऊंट तयार करुन मादक, अश्‍लील फोटोग्राफ पाठवून भुलवले जाते. केवळ पाकिस्तानच ‘हनी ट्रॅप’ लावतो असे नाही, तर चीनदेखील ‘हनी ट्रॅप’ लावतो आहे. अन्य आंतरराष्ट्रीय संघटनाही या मार्गाचा अवलंब करत असतात. याकरीता भारतिय गुप्तचर संघटना व सैन्य दलाने अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या गुन्हेगारांवर ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टच्या अंतर्गत कारवाई न करता त्यांना देशद्रोहाच्या कलमांतर्गत कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. जेणेकरून कोणतीही व्यक्ती संरक्षणसंबंधित माहिती शत्रुराष्ट्राला पुरवण्याचे दुःसाहस करणार नाही. 

Post a Comment

Designed By Blogger