७५ वर्षाच्या महानायकाची बॉलिवूडमधील ५० वर्षे

भारतीय चित्रपट किंवा बॉलिवूडचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख होतो तेंव्हा अमिताभ बच्चन यांचे नाव अग्रस्थानी असते. सुपरस्टार ऑफ दि मिलेनियम म्हणजेच शतकाचा महानायक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. ७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती मिळवणार्‍या बच्चन यांनी गेल्या पाच दशकात जवळजवळ २०० चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका सकारत केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिने रसिकांच्या मनात घर केले आहे. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. नुकतीच वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला ७ नोव्हेंबर म्हणजे ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. 


जंजीरमुळे अँग्री यंगमॅन ओळख 

अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होत. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. त्यांचा आवाज चांगला नसल्याचे कारण देत आकाशवाणीने त्यांना नाकारले होते, त्याच आवाजाने आज संपूर्ण देशाला मोहिनी घातली आहे. बच्चन यांना प्रवास प्रचंड खाचखळग्यांनी भरलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतले अनेक चढ- उतार, यश अपयशाचे बच्चन हे साक्षीदार आहेत. फेब्रुवारी १९६९मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पहिला चित्रपट साइन केला होता, तो म्हणजे ‘सात हिंदुस्थानी.’ या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्याच्या करिअरमधील दुसरा सिनेमा आनंद. या सिनेमातील भूमिकेसाठी अमिताभ यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. जंजीर चित्रपटाच्या यशानंतर वेगाने दौडू लागलेली त्यांची कारकीर्द अजूनही सुरू आहे. जंजीरमुळे त्यांची अँग्री यंगमॅन अशी ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर दीवार, मर्द, शोले, डॉन, कुली, सिलसिला, अग्निपथ या काही चित्रपटांमधून अमिताभ यांनी अभियनाची वेगळीच छाप सोडली. कुली चित्रपटाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून बच्चन परत आले, त्यानंतर तब्येतीची अनेक दुखणी असतानाही ती बाजूला ठेवून आपले आयुष्य त्यांनी चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांच्या सेवेला झोकून दिले. आजही त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि त्यांची चिकाटी तोंडात बोटे घालण्यास भाग पाडते. 

संकटातूनही सावरून ते उभे राहिले

नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली. तरी आजचा त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारच आहे. त्यांनी तब्बल पाच दशके रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या कालावधीत प्रेक्षकांच्या दोन पिढ्या आल्या आणि गेल्या; पण अमिताभ नावाची जादू कायम आहे. या कालावधीत कितीतरी सुपरस्टार आले आणि गेले; पण अमिताभ यांची जादू तसूभरही कमी झाली नाही. उत्तम उंची आणि चांगला आवाज असलेले अनेक अभिनेते आज आहेत पूर्वीही होते; पण त्याला समंजस अभिनयाची जोड मिळाली तरच यशस्वी होता येते हे अमिताभ यांनी दाखवून दिले. संयत अभिनय असो किंवा आक्रमक अभिनय असो अमिताभ यांनी नेहमीच आपली छाप सोडली. वयोमानाप्रमाणे नंतरच्या काळात अमिताभ यांनी आपल्या भूमिका बदलल्या. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचल्यानंतर त्यांच्या जीवनात बॅडपॅच देखील आला. साधारणतः २०००च्या आसपास त्यांनी अपयशाची नीचांकी पातळी पाहिली. यावेळी बच्चनपर्व संपले असे मानले जावू लागले. याकाळात त्यांचे सर्व चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत असल्याने त्यांना काम देखील मिळेनासे झाले होते. शिवाय डोक्यावर कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत होते. अशा संकटातूनही सावरून ते उभे राहिले. 

पूर्वीच्याच उत्साहाने चित्रपटसृष्टीत कार्यरत

खरे पाहता अमिताभ यांना आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातच जास्त चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्यांच्या अभिनयाचे खरे दर्शन होऊ शकले. या वाईट काळात त्यांना साथ मिळाली ती छोट्या पडद्यावरील कोन बनेगा करोडपती या शोची! केबीसीची सुरवात ३ जुलै, २००० मध्ये झाली. तेव्हा पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. त्यानंतर आजपर्यंत ते हा कार्यक्रम करत आहेत. त्यांच्या आवाजाच्या एका विशेष शैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन हे घराघरात पोहचले. या कार्यक्रमात त्यांची नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ कौन बनेगा करोडपतीसे, या संवादफेकीने सर्वांना वेडं लावले होते. त्यांच्या काळात सुपरहिट चित्रपट देण्याचा विक्रम बिग बींनी केला होता. अमिताभ यांना समकालीन असलेल्या जितेंद्र एका कार्यक्रमात म्हणाले होते की, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले दहा नंबर काढायचे झाल्यास पहिल्या १० नंबरवर अमिताभ बच्चन आहेत आणि आमचा नंबर त्यानंतर सुरू होतो. कोणी कल्पनाही केली नसेल एवढे प्रचंड यश अमिताभ यांना लाभले होते. नंतरच्या पिढीतील काळात ब्लॅक, बागबान, आँखे, पा, वजीर, पिंक, पिकू, बदला, कभी खूशी कभी गम अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची रेंज दाखवून दिली. सत्तरच्या दशकात तत्कालीन युवा पिढीला वेड लावणारा हा अभिनेता आता त्या पिढीच्या पुढील पिढीच्याही मनात घर करून बसला आहे. गेली सुमारे ५० वर्षे हिंदी चित्रपट रसिकांना आनंद देणारे अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही पूर्वीच्याच उत्साहाने चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अशा या महानायकाला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger