दिल्लीत राजकारणाचे प्रदूषण

दिल्लीमध्ये प्रदुषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. आयआयटी रूरकी, अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ, ब्रिटनमधील सरे विद्यापीठ यांनी २००८ ते २०१५ अशी आठ वष्रे दिल्लीतील हवेचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते १९९१ ते २०११ या काळात दिल्लीत वाहनांमधून बाहेर पडणार्‍या विषारी वायूंचे प्रमाण तिप्पट वाढले आहे. दिल्लीतील हवेबाबत गेली अनेक वर्ष संशोधन करणार्‍या संस्थांनी तेथील हवाप्रदूषण २०२० पर्यंत १९ पटींनी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, यावर आतापासूनच उपाययोजना आखण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या संकटांनाचा सामना करावा लागू शकतो. मात्र अशा आणिबाणीच्या परिस्थितीवर देखील राजकारण सुरु झाले आहे. भाजपाच्या एका मंत्र्यांनी तर या प्रदूषणात पाकिस्तान व चीनचा हात असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत.


प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर

शुद्ध पाणी आणि हवा हा सर्व नागरिकांना मिळालेला घटनादत्त अधिकार आहे. मात्र दिल्ली ते उत्तर प्रदेश पर्यंत धूर व विषारी हवेचा कहर सुरु आहे. राजधानी दिल्लीत शाळा बंद ठेवून आरोग्य आणीबाणी लागू करण्यापर्यंत वेळ  आली आहे. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७० वर आहे, जो धोकादायक पातळी आहे. वातावरणीय प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने (ईपीसीए) विषारी हवेच्या तीव्रतेचा विचार करता सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागेल यावरून दिल्लीच्या वाईट वायूचा अंदाज येऊ शकतो. उत्तर प्रदेशातील अनेक भागात हवा विषारी बनली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पेंढा जाळला जात असल्याने मोठ्याप्रमाणात धूर निर्माण होवून त्यामुळे दिल्लीचे प्रदूषण वाढते, असा आजपर्यंत आरोप करण्यात येत होता बर्‍याच अंशी तो बरोबर देखील होता मात्र आता पंजाब आणि हरियाणामध्ये पेंढा जाळण्यावर बंदी असूनही दिल्ली-एनसीआरची हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. यामुळे हवेच्या प्रदूषणास दिल्लीकरच जबाबदार आहेत, असे म्हटल्यास ते पूर्णपणे चूकीचे ठरणार नाही. आत दिल्लीत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. गुणवत्ता तपासणी व त्यासाठी असलेली प्रत्येकाची जबाबदारी याबाबत आपण सर्वजण किती जागरुक असतो? याचे खरे उत्तर आपणा स्वत:लाच ठावूक आहे. आपणासर्वांच्या निष्काळजीपणामुळे प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती जैसे थे आहे. 

महाराष्ट्रातल्या पाच शहरांमधली हवा प्रदुषित

दिल्ली सरकारने आजपासून खासगी गाड्यांसाठी सम-विषम योजना लागू केली आहे. मात्र त्याचा कोणताही फायदा होतांना दिसत नाही. खराब प्रदुषणामुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाण करणे व उतरविणे अडचणीचे ठरत असल्याने, दिल्ली विमानतळावर ये-जा करणार्‍या विमानांवर परिणाम झाला आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा पर्यटनाला फटका बसत आहे. परदेशातून अनेक पर्यटक हे शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे देशाचे आर्थिक नुकसान तर होतच आहे मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा देखील खराब होत आहे. थंडीच्या दिवसात दिल्लीवर धुक्याची दाट चादर पसरलेली दिसते. हे वास्तवात धुके नसून धूर आणि धुके यांचे मिश्रण आहे. या मिश्रणाला धुरक किंवा स्मॉग असे म्हणतात. या स्मॉगची निर्मिती होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील हवेच्या तापमानातील तफावत. अशा प्रकारची हवा आपल्या शरीराला, आरोग्याला अधिक घातक असते. हवा प्रदूषणाच्या या गंभीर समस्येपासून बचाव करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये समोर येत असलेला पर्याय म्हणजे विजेवर चालणारी अथवा वीज आणि इंधन यांचा वापर करून चालणारी हायब्रीड वाहने हा आहे. पेट्रोल आणि डिझेल वर चालणार्‍या वाहनांच्या तुलनेत विजेवर चालणारी वाहने निश्चितच जवळपास शून्य प्रदूषके निर्माण करतात, यात शंकाच नाही आणि हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. यासाठी भविष्यात अशाच नव्या संशोधनाचा जास्तीत जास्त वापर करणे हाच प्रदूषण रोखण्याचा प्रमुख मार्ग ठरणार आहे. प्रदूषणाची समस्य केवळ दिल्लीतच आहे असे नाही. महाराष्ट्रातल्या पाच शहरांमधली हवा अतिशय प्रदुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

...अन्यथा पुढच्या पिढीला दुष्परिणाम सोसावे लागतीत

प्रदुषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अहवालात मुंबईतील तारापूर हे सर्वाधिक प्रदुषित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेल्या अभ्यासात राज्यातील ५ शहरांमध्ये प्रदूषणाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवेत असलेल्या धुलीकणांच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आलेत. हवा प्रदूषणाचा गुणवत्ता निर्दैशांक सरासरी ५० ते ६० मायक्रोग्रॅम पर क्युबीक मीटर मानला जातो. मात्र महाराष्ट्रातील ५ शहरांची आकडेवारी धोकादायक आहे. तारापूरने ९३.६९ ची पातळी गाठली आहे. त्याखालोखाल चंद्रपूर ७६.४१, औरंगाबाद ६९.८५, डोंबिवली ६९.६७ तर नाशिकमध्ये ६९.४९ मायक्रोग्रॅम पर क्युबीक मीटर एवढे प्रमाण आढळले आहे. याकरीत वायू प्रदर्शनाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संशोधकांच्या मते, २०२० पर्यंत हे प्रदूषण आणखी वाढणार आहे. अटमॉस्फेरिक एनव्हरॉन्मेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. खासगी वाहनातून म्हणजे मोटारी व दुचाकी वाहनातून कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन, कार्बन मोनॉक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड व बुटाडाईन, अ‍ॅसेटाल्डिहाइड, बेंझिन, फॉरमॅल्डीहाईड, अल्डीहाईड, पॉलि अरोमेटिक हायड्रोकार्बनचे प्रमाण २०११ ते २०१५ या काळात २०११ च्या तुलनेत २ ते १३ पट वाढले आहे. परिणामी दिल्लीतील प्रदूषण पातळी धोकादायक पातळीच्यावर आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे मूत्रिपडाचे आजार, कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, मेंदूचे आजार आदी आजारांचे प्रमाण देखील वाढत आहे. यावर आताच उपाय केले नाहीत तर आणखी हानी होईल. याकरीता प्रदूषण कमी करणे ही केवळ सरकारची जबाबदारी आहे, या मानसिकतेतून बाहरे पडून प्रत्येकाने आपआपली जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. अन्यथा पुढच्या पिढीला याचे मोठ्याप्रमाणात दुष्परिणाम सोसावे लागतीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

Post a Comment

Designed By Blogger