थॉमस कुकच्या अपयशातून शोधा स्वतःच्या यशाचा मार्ग

जागतिक मंदीवर जगभरात चर्चा सुरु असतांना तब्बल १७८ वर्ष जुन्या आणि आयकॉनिक ब्रिटिश ट्रॅव्हल ब्रँड्सपैकी एक थॉमस कुकने नुकताच आपला व्यवसाय गुंडाळल्याचे वृत्त येवून धडकले. यास अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जागतिक मंदीचे देता येईल. मात्र इतकी मोठी कंपनी किंवा उद्योगसमूह पहिल्यांदाच बंद पडला, असे नाही. एकेकाळी मोबाईल क्षेत्रात प्रचंड मक्तेदारी असणारी नोकिया, फोटोग्राफीचे रोल तयार करणारी कोड्याक, एचएमटी घड्याळ असे आपापल्या क्षेत्रात टायटॅनिक म्हणून ओळखले जाणारे अनेक उद्योग कुठल्यातरी हिमनगाची धडक बसल्यामुळे बुडाले आहेत. प्रत्येकवेळी जागतिक मंदी नव्हती, मात्र कालानुरुप बदल न स्वीकारणे ही चूक प्रत्येकाने निश्‍चितपणे केलेली आहे. व्यवसाय, उद्योग कितीही मोठा असला तरी कालानुरुप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास नकार दिला तर त्याची जागा घेण्यासाठी दुसरा कोणी तरी तय्यार बसलेलाच असतो.


...अन्यथा त्याचा टायटॅनिक होतो

आज परिवारासोबत वर्षातून किमान एकदातरी फिरायला जायला हवे किंवा विकएंड एन्जॉय या संकल्पना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाल्या असल्यातरी पारिवारिक पर्यटन ही संकल्पना १८४१ साली स्थापन झालेल्या ‘थॉमस कुक’ने अंमलात आणली. औद्योगिक आणि आर्थिक विकासासोबत पारिवारिक पर्यटनाचा व्यवसाय वाढवण्यात ‘थॉमस कुक’चा मोठा हात आहे. १७८ वर्ष जुन्या या ब्रिटीश कंपनीचा व्यवसाय १६ देशांमध्ये पसरला होता. कंपनीची हॉटेल्सपासून विमानसेवाही होती. जी जगभरात ८२ ठिकाणांसाठी सेवा पुरवत होती. ही कंपनी ग्राहकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेवा देण्याबाबत प्रसिद्ध होती. मग ते उड्डाण असो, हॉटेल असो, स्थानिक परिवहन असो की जेवण. या कंपनीत तब्बल २२ हजार कर्मचारी कार्यरत होते. गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत असलेली ही कंपनी अखेर बंद झाली. थॉमस कुकची प्रगती आणि पतन यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. वेळेनुसार बदलणे आवश्यक असते हा बदल ज्याने स्वीकारला तोच स्पर्धेत टिकून राहतो. अन्यथा त्याचा टायटॅनिक होतो. 

इंटरनेट बुकिंगमुळे थॉमस कुकला ताळे

आजचे युग हे इंटरनेटचे युग मानले जाते प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने कोणतेही काम एका क्लिकवर कसे होईल याला प्रचंड महत्व आहे. स्वस्त इंटरनेट व स्मार्टफोनमुळे जगात ट्रॅव्हल बुकिंग व्यवसाय पूर्णपणे ऑनलाइन झाला आहे. मात्र, थॉमस कुक अजूनही दुकानांवर व दूरध्वनीच्या साहाय्यावर अवलंबून होते. इंटरनेटचा वापर करून जे उद्योग जन्माला आलेत त्यात विमानांचे आणि हॉटेलचे बुकिंग ‘थॉमस कुक’च्या मुळावर आले.  गेल्या दशकात एक्सपीडियासारख्या वेबसाइट्सने आपल्या सर्च क्षमतेच्या बळावर बाजारावर प्रभाव टाकला आहे. असे असले तरी थॉमस कुकने त्या दिशेने न जाता टूर ऑपरेटर बनणे पसंत केले. कंपनीची सर्वात मोठी स्पर्धक होती जर्मनीची टूर कंपनी टीयूआय ग्रुप. दोन्ही कंपन्या एअरलाइन्स चालवायच्या. जेव्हा इंटरनेटचा मारा टूर ऑपरेटर्सवर झाला तेव्हा टीयूआय ग्रुपने जहाज व हॉटेल चालवणे सुरू केले. आज टीयूआची ७० टक्के कमाई जहाजे व हॉटेल्सपासून होते तर थॉमस कुकने वेळेनुसार बदल स्वीकारला नाही. इंटरनेट बुकिंगमुळे लोकांना जगात कुठेही जाण्यासाठी आणि मुक्कामासाठी कुठूनही कुठलेही विमानाचे तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग करणे सहज शक्य झाले; शिवाय कार्यक्रमात बदल झाला तर नव्याने बुकिंगची सोय झाली. ‘थॉमस कुक’च्या पर्यटन आणि वाहतूक व्यवसायाला याचा मोठा फटका बसला. थॉमस कुकवर सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारभार सुरू ठेवण्यासाठी १७६६ कोटी रुपयांची तत्काळ गरज होती. मात्र ही रक्कम उभारण्यात अपयश आल्याने कंपनीला ताळे लागले. चिनी फोसुन कंपनीकडे थॉमस कुकचे सर्वात जास्त शेअर्स होते. कंपनीने गेल्या महिन्यात थॉमस कुकला ३९६६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीला उभारी देण्यासाठी देण्यात येणार्‍या ७९३३ कोटी रुपयांच्या पॅकेजमधील हा पहिला हप्ता होता. या बदल्यात फोसुनला थॉमस कुकमध्ये भागीदारी मिळाली होती. मात्र कर्जाच्या डोंगराखाली ही रक्कम गडप झाली. 

एक व्यवस्थापनाचा धडा म्हणून पाहणे गरजेचे 

भारताबाबत उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास, सध्या भारतात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन कंपन्यांनी सर्वांना मोहिनी घातली आहे. ऑनलाइन विक्री आता अन्य किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम करायला लागली आहे. मॉल्सचा जमाना आला त्यावेळी किती तरी किरकोळ व्यापार्‍यांना आता आपले काही खरे नाही, असे वाटले होते. मॉल्स येण्याअगोदरच काही व्यापार्‍यांनी मॉल्सपेक्षाही चांगली सेवा द्यायला सुरुवात केली होती. परिणामी मॉल्सची संकल्पना तितकीशी यशस्वी झाली नाही. मोजक्या मॉल्सनीच आपले अस्तित्व टिकवले आहे. मॉल्स मोठमोठ्या शहरात यशस्वी झाले असले तरी छोट्या शहरातील काही साखळी मॉल्स बंद पडत आहेत. मात्र याचवेळी किरकोळ व्यापारी व विक्रेत्यांसमोर ऑनलाईन कंपन्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या काही वर्षात याचा विस्तार किती झपाट्याने झाला आहे, याचा खुलासा देशातील किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेने नाईट फ्रँक नावाच्या संस्थेच्या मदतीने तयार केलेल्या अहवालातून स्पष्ट होतो. या अहवालानुसार, २०१४ मध्ये ई-व्यापाराचे प्रमाण दोन टक्के होते. आणखी चार वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये ई-व्यापाराचे प्रमाण ११ टक्के राहील. ऑनलाइन विक्री करणार्‍या कंपन्यांचे लक्ष पूर्वी शहरांकडेच होते. आता मोठ्या शहरातील झोपडपट्ट्या तसेच छोट्या शहरांमध्येही वितरण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. पूर्वी शहरी भागात ऑनलाइन खरेदीचे फॅड होते. आता ते ग्रामीण भागातही पोहचले आहे. हे बदल हेरुन स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांनी बदलणे गरजेचे आहेत. अन्यथा त्यांच्यावरही वाईट वेळ येण्यास फारसा वेळ लागणार नाही. ज्या चुका थॉमस कुक सारख्या मोठ्या कंपन्यांनी केल्या आहेत त्यांच्याकडे एक व्यवस्थापनाचा धडा म्हणून पाहणे गरजेचे आहे. या कंपन्यांचा प्रवास व शेवटही खूप काही शिकवून जाणारा असतो.

Post a Comment

Designed By Blogger