एक शापित राजहंस

महाभारतात कर्ण व शिवकाळात संभाजी महाराज यांना शापित राजहंस ही उपमा दिली जाते. राष्ट्रीय राजकारणाचा विचार केल्यास लालकृष्ण अडवाणी याच पंगक्तीत बसतात. त्यांच्यापाठोपाठ राज्याच्या राजकारणात याच वाटेवरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसेंची वाटचाल सुरु आहे. भाजपाच्या देशपातळीवरील राजकीय प्रवासात अडवाणी यांचे मोलाचे योगदान आहे. पक्षात पूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवाणींचे स्थान होते. लोकसभेत दोन खासदारांवरुन थेट केंद्रात सत्तास्थापन करण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास प्रचंड खाचखळग्यांनी भरला आहे. पंतप्रधानपदानंतर राष्ट्रपती पदाचीही इच्छा पूर्ण न झाल्यानंतर  त्यांना खासदारकीचे तिकीटही नाकारत भाजपात अडवाणी युग संपविण्यात आले. तसेच राज्यात भाजपाचे एका छोट्या रोपट्यापासून वटवृक्षात रुपांतर करण्यात खडसेंचे प्रचंड मोठे योगदान राहिले आहे. मात्र पक्षाला सुगीचे दिवस आल्यानंतर आता ‘खडसेपर्व’ संपविण्याचा कुटील डाव २०१६ पासून मांडण्यात आला आहे. यात केवळ पक्षच चुकत आहे असे नाही खडसेंचेही काही ठिकाणी चुकले आहेच, हे नाकारता येणार नाही मात्र त्यासाठी थेट त्यांचे राजकीय अस्तित्व संपवून टाकायलाच ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणतात का? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.


खडसेंचे योगदान विसरता येण्यासारखे नाही

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह यांना स्थान मिळाले होते मात्र १९९८ पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे भिष्मपितामह लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐवजी अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली. आता याची आठवण येण्याचे कारण म्हणजे, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव नाही. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या वाटेतील सात जागांपैकी सहा जागेवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले. ज्यांना खडसेंनी पक्षात आणले, मोठे केले किंवा नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांची उमेदवारी जाहीर करत खडसेंना डिचवून भाजपाने काय साध्य केले? असा प्रश्‍न खान्देशवासियांना पडला आहे. खडसेंनी आपल्या जीवनाची ४० पेक्षा जास्त वर्षे भाजपाला वाढविण्यासाठी खर्ची घातली आहेत. ज्याकाळी जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तेंव्हा भाजपाची बिजे रोवली व केंद्रात आणि राज्यात सरकार नसतांना जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार सातत्याने निवडून आणले. ग्रामपंचायतींपासून ते नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचा झेंडा फडकवला. हे खडसेंचे योगदान विसरता येण्यासारखे नाही. 

आरोपांवर निर्दोषत्व मिळून देखील खडसेंना मंत्रिमंडळात स्थान नाही

एखादी व्यक्ती घर बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घालते, त्याच व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी त्या घरातून बाहेर व्हावे लागते. घराच्या दारात बसून तो उरलेल्या आयुष्यभर वाट पाहतो की आतून कधीतरी कुणी आवाज देईल, याची वेदना काय असते? हे सध्या खडसेंपेक्षा जास्त कुणी जाणणार नाही. खडसे यांचे नेमके काय चुकले? ज्याची त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली. पडतीच्या काळत ज्या पक्षासाठी रात्रंदिवस झटून काम केले, त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर त्यांना वाळीत टाकले. नुसते वाळीत टाकले नाही तर त्यांच्यामागून इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊन खडसेंना डिवचले आता तर त्यांना तिकीट मिळविण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे, यापेक्षा मोठे दुर्दव्य कोणते? २०१४ मध्ये सत्तास्थापनेवेळी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, ही बाब पक्षातील काहींना खटकली. मुख्यमंत्रीपद तर दूरच राहिले पण मुख्यमंत्रीपदाची मनीषा बाळगल्याने खडसेंना मोठी किंमत मोजावी लागली. भोसरीतील जमीन गैरव्यवहार, दाऊदच्या पत्नीशी फोनवरून झालेले कथित संभाषण तसेच स्वीय सहायकाचे लाचप्रकरण अशा एक ना अनेक आरोपांमुळे खडसेंना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह तब्बल १२ महत्त्वपूर्ण खात्यांच्या मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. जून २०१६ पासून ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. कालांतराने आरोपांवर निर्दोषत्व मिळून देखील खडसेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. 

मास लीडरचे राजकीय खच्चीकरण

योग्य वेळ आल्यावर खडसेंचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगत पक्षनेतृत्त्वाने त्यांना झुलवत ठेवले. शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवून आगामी काळात महाजन हेच जळगाव जिल्ह्याचे सर्वेसर्वा राहणार असल्याचे पक्षनेतृत्त्वाने सूचित केले होते. यामुळे व्यथित झालेल्या खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद वेळोवेळी बोलून दाखवली. सध्या पक्षात नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावे असे चित्र असल्याचा खोचक टोला लगावतानाच भाजपमध्ये सध्या माझी अवस्था भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखी झाली आहे, असेही ते एकदा म्हणाले होते. एकनाथ खडसे आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय प्रवासात बरेच साम्य आहे. दोघांनीही भाजपला मुख्य प्रवाहात आणून सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. भाजपमध्ये एकेकाळी केंद्रात आणि राज्यात दोघांनीही निर्विवाद वर्चस्व गाचवणारे दोघेही आज नव्या-जुन्या नेत्यांच्या गर्दीत कुठे उभे असतात, ते कळतही नाही. योगायोग म्हणजे दोघांना स्वपक्षीयांपेक्षा विरोधकांच्या आणि जनमानसात नजरेत आजही मानाचे स्थान आहे. विधानसभेची पहिली यादी जाहीर करतांना भाजपाने त्यांना डावलले यामुळे ते महाराष्ट्राचे ‘अडवाणी’ ठरल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. गेली ४० वर्षे पक्षाच्या राजकीय पटलावर आघाडीवर राहणार्‍या नेत्यास नावासाठी दुसर्‍या यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात खडसे यांच्या सारखा अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही. त्यांना तिकीट नाकारणे म्हणजे खडसेंसारख्या मास लीडरचे राजकीय खच्चीकरण नाही तर दुसरे काय?

Post a Comment

Designed By Blogger