पर्यावरणपुरक रस्ता

प्लॅस्टिकबंदीचा विषय सध्या देशभरात चर्चेत आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे किती व कसे नुकसान होते याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसी) प्लॅस्टिकपासून चक्क रस्ता तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केल्याचे समोर आले आहे. कॅरी बॅग किंवा पॅकेजिंग फिल्म कचर्‍याचा वापर करून हरयाणा राज्यातील फरीदाबादमध्ये आयओसीच्या रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट फॅसिलिटीच्या बाहेर हा तयार करण्यात आला आहे. देशात व राज्यात टाकावू प्लॅस्टिकपासून प्रायोगिक तत्वावर रस्ता तयार करण्याचा प्रयोग आधी सुध्दा करण्यात आले असले तरी याला अद्यापही व्यावहारिक स्वरुप प्राप्त झालेले नाही. मात्र आयओसीचा हा प्रयोग यशस्वी झाला तर या संदर्भात एक नवे धोरण तयार करण्याची गळ मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवेजकडे घालता येईल. सिंगापूर या छोट्याशा देशाने टाकावू प्लॅस्टिकपासून चक्क वीज निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. आता पुढचा प्रयोग करण्याची संधी भारताला मिळाली आहे.


प्लास्टिक कचरानिर्मितीमध्ये मुंबई, पुणे आघाडीवर  

कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिकचा भस्मासुर कसा बोकाळत आहे हे आपण गेली अनेक वर्षे पाहतो आहोत. १९७०पर्यंत प्लास्टिकचा वापर एवढा कमी होता की निरुपयोगी प्लास्टिकची समस्याच नव्हती. त्यानंतर मात्र प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढत गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार देशात दररोज २५ हजार ९४० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्यामुळे एवढ्या प्रचंड कचर्‍याचे करायचे काय, ही समस्या निर्माण झाली. प्लास्टिक कचरानिर्मितीमध्ये मुंबई आणि पुण्याचा देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० टक्के कचरा उचलला जात नाही. सध्या शहरांमध्ये, गावांमध्ये तयार होणार्‍या प्लास्टिक कचर्‍यातील केवळ ६० टक्के कचरा उचलला जात असून, ४० टक्के कचरा रस्त्यावर, नदी, तलाव, सागरी किनार्‍यांवर किंवा ड्रेनेज लाइनमध्ये फेकला जातो आहे. यामुळे मृदा आणि जलप्रदूषण वाढले असून, हा कचरा थेट भटक्या जनावरांच्या पोटात जातो. दरवर्षी सुमारे दोन कोटी देवमासे, डॉल्फिन्स, सील्स, सी लायन, इतर जलचर तसेच इतर पशू-पक्षी यांचा या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे मृत्यू होत असल्याचेही एका अहवालातून समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी किंवा विटा बनवण्यासाठी वापर

मातीत फेकलेल्या प्लास्टिकचा किमान १००० वर्ष नाश होत नाही. त्यामुळे मातीचा कस कमी होतो परिणामी अन्नधान्याचा तुटवडा होण्याची भीती ही पण एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरत आहे. अमेरिकेतल्या लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या डॉ.पीटर क्रिस्टेनसेन यांनी काही महिन्यांपुर्वी ‘नेचर केमिस्ट्री’ या शोधनियतकालिकात पुनर्वापर करता येण्याजोगे प्लास्टिक तयार करण्यासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. पॉली डायकेटोनामाईनपासून बनवलेले प्लास्टिक तीव्र आम्लाच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवले तर रेणूंच्या साखळ्यांमधले घटकरेणू अलग होऊन त्यांच्यातला एकेक रेणू वेगवेगळा होतो. या प्रक्रियेत प्लास्टिकला विशिष्ट गुणधर्म देण्यासाठी मिसळलेले अन्य घटकही साखळीतून अलग होतात. यानंतर गाळण्यासारख्या नेहमीच्या विविध प्रक्रियांमधून हे अन्य घटक दूर करून पॉली डायकेटोनामाईन हा मूळ रेणू शुद्ध स्वरूपात उपलब्ध होतो. हव्या त्या गुणधर्माचे प्लास्टिक नव्याने बनवायला त्याचा पुनर्वापर करता येतो. परंतू हा प्रयोग अजून प्रयोगशाळेबाहेर निघालेला नाही. म्हणून प्लॅस्टिकपासून रस्ता तयार करण्याचा एकमेव मार्ग सध्यातरी आपल्या हातात आहे. काही प्रकारचे प्लास्टिक हे पुन्हा वापरता येते मात्र प्लास्टिकच्या वस्तू कचर्‍यात जाताना त्यांची प्लास्टिकच्या प्रकारांप्रमाणे वर्गवारी केली जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्लास्टिकचे मिश्रण तयार झाले की ते तर केवळ रस्ता दुरुस्तीसाठी किंवा विटा बनवण्यासाठी वापरता येते. म्हणूनच सध्या ७० टक्के प्लास्टिक फेकून दिले जाते. 

प्लॅस्टिकपासून रस्ते तयार करण्याचे प्रयोग, प्रयोगापुरताच मर्यादीत

मध्यंतरी केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या धोरणामध्ये रस्ते बांधणीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे सूचित केले होते. राज्य सरकारनेही सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्तेनिर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार काही ठिकाणी प्लॅस्टिकपासून रस्ते तयार करण्याचे प्रयोग करण्यात आले मात्र ते केवळ प्रयोगापुरताच मर्यादीत राहीले. त्यांना व्यावसायिक स्वरुप मिळू शकले नाही. कर्नाटकातील बंगलोर मध्ये केके प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे अहमद खान यांनी ४३० कि.मी.चा रस्ता तयार केला. कणेगरी येथे बंगळुरू विद्यापीठाच्या बाहेर जो ट्रॅक रोड बांधलेला आहे, तो देशात या तंत्रज्ञानाने बांधलेला पहिला रस्ता आहे. या व्यतिरीक्त अमेरिकेतील उद्योजिका व वैज्ञानिक प्रियांका बकाया हिने प्लास्टिकपासून वीज तयार करण्याचा प्रयोग केला आहे त्याच बरोबर अमेरिकेत प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडियन ऑइलने डांबर, काँक्रीटमध्ये १.६ कोटी टन सिंगल यूज प्लास्टिक कचर्‍याचा वापर करत रस्ता तयार केला आहे. हा प्लास्टिकचा रस्ता ८५० मीटर इतका लांब आहे. इंडियन ऑइलने सिंगल यूज प्लास्टिकच्या कचर्‍यापासून तयार केलेल्या मालाला कुठून आणि किती मागणी येऊ शकते याची चाचपणी करायलाही सुरुवात केली आहे. प्लास्टिकचा वापर असलेला हा रस्त्यात किती क्षमता आहे, तसेच तो किती टिकाऊ आहे याची चाचपणीही कंपनीला करावी लागणार आहे. प्रीमियम दर्जाच्या डांबराच्या तुलनेत ३ टक्के प्लास्टिक कचर्‍याचा वापर केल्याने एक किलोमीटरचा रस्ता बनवताना सुमारे २ लाख रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. यामुळे या नव्या प्रयोगाचे कौतूक करायलाच हवे.

Post a Comment

Designed By Blogger