दत्तक ‘दिवा’ नको ‘पणती’ हवी

आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असला तरी जेंव्हा जेंव्हा मानवजाती किंवा भूतलावर कोणतेही संकट आले तेंव्हा तेंव्हा दृष्टप्रवृत्तींचा वध करण्यासाठी देवांनी देखील नारीशक्तीच्या रुपात अवतार घेतल्या असंख्य दाखले धार्मिक ग्रथांमध्ये आढळतात. अशाच नरीशक्तीचा प्रतिक मानल्या जाणारा नवरात्रोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. या नवरात्रोत्सवात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आपण स्त्रीभृण हत्यांबाबत चर्चा करत असतांना महाराष्ट्रात मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत आहे. बालकांना दत्तक देण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाद्वारे पार पाडली जाते. या संस्थेने देशभराची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली असून, या काळात ९,८६० बालकांना दत्तक देण्यात आले. त्यात ५,७८७ मुली आणि ४,०७३ मुलगे आहेत. याच काळात मध्य प्रदेशात ५५० बालकांना दत्तक देण्यात आले. त्यात ३२० मुली आणि २३० मुलगे होते, असे ही आकडेवारी सांगते. टक्क्यांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास, मुलींची टक्केवारी ५९ तर मुलांची ४१ आहे. बालकांना दत्तक घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून, त्यातही मुली दत्तक घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाठोपाठ कर्नाटक, तिसर्‍या क्रमांकावर ओडिशा आणि मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर असल्याचेही या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.


 स्त्रीभृण हत्येचा कलंक पुसला गेला नाही पण... 

‘मुलगा वंशाचा दिवा’ या मानसिकतेमुळे राज्यात व देशात स्त्रीभृणहत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले होते. अवघ्या काही वर्षात या समस्येला राष्ट्रीय समस्येचे स्वरुप प्राप्त झाल्याने केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढओ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. परिणामी मुलींच्या जन्मदरात थोडीपार वाढ झाली. हा विषय सरकारी नियम, कायदे यांच्या चौकटीपुरता मर्यादित नसून सामाजिक मानसिकतेशी जुळलेला आहे. स्त्रीभृण हत्येचा कलंक अजून पुर्णपणे पुसण्यात आपण यशस्वी झालो नसलो तरी आता मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलत आहे, ही एक अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल. मुलांऐवजी मुलींना दत्तक घेण्यास प्राधान्य दिले जात आहे, हे याचेच प्रतिक मानावे लागेल. दत्तक घेण्याचा प्रकार शेकडो वर्षांंपासून सुरू आहे. यात प्रामुख्याने मुलांचाच समावेश अधिक राहायचा. संपत्ती आहे, परंतु वारस नाही. त्यामुळे आपला वारसा चालत राहावा, हा यामागे हेतू होता. यासाठी नाते संबधातून किंवा अनाथालयातून मुलं दत्तक घेण्यात येतात. गरिबी किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ सोडून देण्यात येतात. अशी बेवारस मुले बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. नंतर कायदेशिर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर अशा बालकांना दत्तक दिले जाते. दत्तक घेणार्‍या दाम्पत्याला मान्यताप्राप्त संस्थेत नोंदणी करावी लागते. शिवाय, मालमत्ता, नातेवाईक व इतर माहिती द्यावी लागते, तसेच बाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी असल्याचे पत्र व इतर अटी पूर्ण कराव्या लागतात. 

मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले 

आजकाल सेलिब्रिटींकडून मुलं दत्तक घेतली जाण्याची बरीच चर्चा होत राहते. अभिनेत्री सनी लिओनीने मुलगी दत्तक घेतल्यानंतर तिची जोरदार चर्चा सुरू झाली. त्याआधी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने अनाथ मुलीला दत्तक घेतले होते.  सामान्य व्यक्तींनी मुलं दत्तक घेण्याची फारशी चर्चा होत नसते किंवा पुढे त्या मुलांचं काय होते, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. मात्र, सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या मुलांकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते. मात्र आता गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य मुलं दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातही मुली दत्तक घेणार्‍यांची संख्या जास्त आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात मुली करत असलेली प्रगती, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर, मुलींची हौस अशा अनेक कारणांमुळे दत्तक घेण्यासाठी मुलींना पसंती मिळत आहे. मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याची अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीकडे आपल्याकडील बदलत्या कुटुंबव्यवस्थेचे निदर्शक म्हणून पाहता येईल. देशात मुल दत्तक देणार्‍या अधिकृत २० संस्था असून याची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. यांच्या माध्यमातून भारतात २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण ३३७४ मुलं दत्तक घेण्यात आली यात १९७७ मुली व १३९७ मुलांचा समावेश आहे. या संस्थांमुळे मूल दत्तक घेण्याबाबत जागरूकता वाढते, त्यांमध्ये दाखल होणार्‍या मुलांची संख्याही वाढते आणि त्यामुळे मूल दत्तक जाण्याचे प्रमाणही वाढते. 

सुरक्षिततेची काळजी ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी ....

मुलांपेक्षा मुलींना वाढविणे सोपे असते, असा समज असल्याने मुली अधिक प्रमाणात दत्तक जात असाव्यात, असा निष्कर्ष सीएआरएने काढला आहे. तो अगदीच चुकीचा नाही. त्याचबरोबर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा कल पुन्हा एकदा चौकोनी कुटुंबाकडे झुकतो आहे. पहिला मुलगा असेल, तर दुसरे मूल होऊ देण्यापेक्षा एखादी मुलगी दत्तक घ्यावी, असा विचार या वर्गांतील जोडपे करीत असल्याचे निरीक्षण आहे. यामुळे मुलीला वाढविण्याचा आनंद मिळतो आणि एखाद्या अनाथ मुलीचे जीवन फुलविल्याचे समाधानही मिळते. शिवाय, मुलीला शिक्षण देऊन, स्थिरस्थावर करून लग्न केल्यास तिच्या जबाबदारीतून मुक्तही होता येते. यामुळे बहुतेक जोडपे मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करीत असतात. पुरोगामी राज्यात मुलगी नको, मुलगाच हवा अशा हट्टाहासातून मुलींना वार्‍यावर सोडली जात असल्याची प्रकरणे समोर येत असताना मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल; परंतु याचा अर्थ राज्यात अनाथाश्रमात येणार्‍या मुलींची संख्या अधिक असणार आहे. तसे असेल तर मुलगी जन्माला आली म्हणून तिला सोडून देण्याची मानसिकता अजूनही कायमच आहे. ती बदलण्याचे आव्हान कायम असल्याची जाणीव दत्तक मुलांबाबतच्या नव्या निष्कर्षाच्या निमित्ताने व्हायला हवी. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी मुलांची केवळ बरोबरीच केली नाही तर अनेक क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करत आघाडी देखील घेतली आहे. अंतरिक्षातील मंगळयानपासून चांद्रयान मोहिमेमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे ती म्हणजे, सुरक्षिततेची! घरातून निघतांना सुरक्षिततेची काळजी ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी मुलगा व मुलींमध्ये उरलेला थोडाफार भेदभाव देखील संपेल, यात तीळमात्र शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger