गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगवर जगभरात गांभीर्याने चर्चा सुरु आहे. सध्या राज्यात व देशातील नैर्सगित स्थिती पाहता कुठे पुर तर कुठे दुष्काळ असे चित्र दिसून येते. निर्सगाचे चक्र बिघडण्यास अनेक कारणे आहेत यातील प्रमुख कारण म्हणजे अवैध वृक्षतोड! आता याची जाणीव सरकारला देखील झाल्याने म्हणा का राजकीय व शासकीस सोपास्कार म्हणून का होईल, सरकारने एक कोटी वृक्ष लागवडीचा मोठा गाजावाजा करत सध्याचे सरकार निसर्गाची किती काळजी घेते हे दाखविण्याचा केविलावाणा प्रयत्न केला. भाजप सरकारच्या या ढोंगी प्रेमाचा बुरखा फाटला तो आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणामुळे. मेट्रोसाठी आरेतील निसर्गसंपत्तेवर टाच देत सरकारने एका रात्रीत तब्बल दोन हजारांच्यावर झाडांची कत्तल केली. विकासकामांसाठी ही कुर्बानी आवश्यक असल्याची भूमिका सत्ताधार्यांकडून मांडण्यात येत आहे. भारतात कोणताही विकास प्रकल्प उभा राहू लागला की, पर्यावरणाची हानी, वृक्षतोड किंवा निसर्गाची हानी या मुद्यांवर आंदोलने होतच असतात. यात सरकार चुकीचे का आंदोलनकर्ते? याचे उत्तर कधी न सापडणारे असते.
...म्हणून पर्यावरणप्रेमी संतापले
एमएमआरडीए मुंबई व परिसरात मेट्रोचे १४ प्रकल्प राबवत आहेत. हे मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरेत २२ मजल्यांचे मेट्रो भवन बांधले जाणार आहे. यासाठी आरे जंगलातील हजारे झाडांच्या कत्तलीचा विषय गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. आरे कॉलनी हा संरक्षित जंगलाचा एक भाग आहे आणि तेथील कारशेडसाठीची तीन हजार वृक्षांची तोड ही अपरिमित हानी आहे आणि त्यामुळे ही प्रस्तावित कारशेड इथे होऊच नये, अशी भूमिका घेत पर्यावरणवादी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मेट्रोच्या कारशेडला आव्हान देणार्या काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या नंतर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी त्या सर्व फेटाळून लावल्या. वृक्ष प्राधिकरण व न्यायालयाकडून मेट्रोच्या कारशेडप्रकरणी हिरवा कंदील मिळाल्यानंतर एका रात्रीत तब्बल दोन हजाराच्यावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी संतापले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री दिया मिर्झा, विशाल दादलानी, स्वरा भास्कर, अशोक पंडित अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचे समर्थन करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन यांच्यावर नेटकर्यांनी निशाणा साधला आहे. आता हा वाद केवळ पर्यावरणवाद्यांपुरता मर्यादित राहिला नसून यात भाजपा समर्थक व भाजपा विरोधक असे दोन गट पडले आहेत.
सरोगेट लॉबिंग
राज्यात व केंद्रात सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेने स्वत:ची राजकीय पोळी शेकत येणार्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुर्हाड चालवणार्यांना बघू असा इशारा दिला आहे. या सर्व गोंधळात पर्यावरणाचा मुळ मुद्दा बाजूला फेकला गेला आहे. राज्यात युतीचे सरकार असल्याने भाजप आणि शिवसेना यांची याबाबतची भूमिका समान असायला हवी होती. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे कालपरवापर्यंत या कारशेडला विरोध करीत होते. त्याहूनही आश्चर्य म्हणजे, मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनीही ‘आमचा मेट्रोला विरोध नाही, मात्र वृक्षतोड म्हणजे निसर्गाची हानी आणि आदिवासींच्या चरितार्थावर पाय’ असा दावा करीत उच्च न्यायालयात याचिका केली होती. आरेवरुन पेटलेल्या वादावर चर्चा करतांना तामिलनाडूतील कुडानकुलम अणूप्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे, यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सरोगेट लॉबिंगची शंका उपस्थित करत भारतातील विकास कामांना विरोध हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कटाचा भाग असल्याचे म्हटले होते. वनसंपदा, वन्यजीव आणि मूळ रहिवासी यांच्यावरी संकट, अशा प्रकारचा युक्तिवाद करीत राहून वेगवेगळ्या प्रकल्पांना विविध पातळीवर सतत विरोध करीत राहायचा, हे तंत्र गेल्या काही दशकांत चांगलेच विकसित झाले आहे. भारतासारखा झपाट्याने विकास करू पाहणारा देश अशा मोहिमांचा अनेकदा शिकार बनला आहे. अनेकदा अशी कारस्थाने जागतिक पातळीवर शिजतात आणि त्यांची अंमलबजावणी मात्र मोठ्या गोंडस रूपात, स्थानिकांची माथी फिरवून केली जाते, याचा अनुभव आपण आधीही घेतला आहेच.
केवळ विरोधाला विरोध करुन चालणार नाही
आपल्याकडे आरेतील वृक्षतोडीमुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे मात्र हा केवळ एकट्या मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विषय नाही. वृक्षतोडीची समस्या ही जागतिक समस्या बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. मनुष्याकडून होणारा पर्यावरणाचा र्हास आता पराकोटीला पोचला असून अमेरिकेतील शहरांत तर दरवर्षी तब्बल ३६ दशलक्ष वृक्ष तोडले जात असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. हे असे सुरू राहिल्यास पर्यावरणाच्या हानीसह आपणा सर्वांनाच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आरेतील वृक्षतोडीवरील चिंता व संताप हा पुर्णपणे चुकीचाही नाही. वृक्षतोड झाल्यानंतर सर्वात मोठा फटका म्हणजे स्वतःसाठी कमी ऑक्सिजन निर्माण होण्याचा असतो. म्हणजे स्वतःच स्वतःला संपवण्याचे काम आपण करतोय. दूसरे मुद्दे म्हणजे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. कुठे अति पाऊस तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाचे त्रास सुरू झाले, ऋतुबदल झाले, आजार वाढले हे आपल्याच बेफिकीरपणाची वृत्ती निसर्गाप्रती दाखवल्यामुळेच. याकरीता वृक्षतोडीला विरोध झालच पाहिजे, यात कोणतेही दुमत नाही. मात्र यासाठी केवळ विरोधाला विरोध करुन चालणार नाही. मेट्रोमुळे होणारे फायदे व पर्यायाने होणार्या विकासाचाही तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. मुंबईत आज लक्षावधी वाहने ओकत असलेला धूर व पर्यायाने कार्बन फूटप्रिंट मेट्रोमुळे कमी होणार आहे. तसेच लोकलमधील जीवघेणी लटकंती कमी होण्यास निश्चितच मदत होवू शकते, याचाही सारासार विचार करत, विकास आणि निसर्गरक्षण या दोन्हींचा समतोल ठवण्याचे आव्हान स्विकारावे लागेल.
Post a Comment