नव्या वाटा शोधण्यासाठी चला सीमोल्लंघन करुया

आज विजयादशमी, म्हणजे दसरा. या दिवसाचे अनेक संदर्भ आहेत. कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करण्यासाठी विजयादशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. या दिवसाचे रामायण आणि महाभारत काळातील संदर्भ आढळून येतात. श्रीरामाने आजच्याच दिवशी रावणाचा वध केला आणि म्हणून आज रावण दहन होते. विजयादशमीच्या दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्ध सज्ज झाले. म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. आज एकविसाव्या शतकात ही सीमोल्लंघनाची परंपरा परत पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. बदलत्या काळात भारतीय सण, समारंभ आणि उत्सव यांचा नवा अर्थ शोेधला पाहिजे. समाजशास्त्रीय दृष्टीने विचार करता, असे दिसते की, उत्सवांना एक पारंपरिक अर्थ असतो. लोक त्यामागील परंपरा व इतिहास विसरतात आणि केवळ प्रतीकात्मक दृष्टीने उत्सव साजरे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर विजयादशमीच्या नव्या पर्वकाळात नवे सीमोल्लंघन करणे आवश्यक आहे. आजच्या काळात दहशतवाद, भ्रष्टाचार, अस्वच्छता, व्यसन, गरीबी यासारखे अनेक शत्रू समोर उभे ठाकले आहे. त्यांच्याविरुध्द निर्णायक लढाईची वेळ आली आहे. यासाठी आजपेक्षा दुसरा कोणताच चांगला शुभ मुहूर्त सापडणार नाही.


श्रीकृष्ण बनुन मदतीचा हात द्या

संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ अशी कल्पना मांडली. मात्र ही व्यापक संपल्पना आपण विसरत चाललो आहोत. आज आपले जीवन केवळ स्वार्थाभोवती गुरफटत चालले आहे. ‘मी’पणाचा अहंकार वाढत आहे. ‘मी माझ्यापुरताच पाहीन’ अशी संकुचितपणाची वृत्ती वाढू लागली आहे. परिणामी आपली विचारसरणी संकुचित होत आहे. संकटकाळी एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करणारे आपण सोशल मीडियावर उपदेशाचे डोस पाजण्यात मात्र सर्वांच्या पुढे आहोत, अशा सर्व वाईट प्रवृत्तींचा नाश करुन वेगळे सीमोल्लंघन करायचे आहे. दसरा हा सण निव्वळ धार्मिक नाहीत तर तो पुरुषार्थाशी जोडलेला आहेत. त्यामुळेच ‘सीमोल्लंघन’ ही संकल्पना याच दिवशी निर्माण झाली. सीमोल्लंघन करायचे म्हणजे काय करायचे? तर वाईट प्रवृत्तींवर मात करुन विजय मिळवायचा असतो. यात रावणचा वध किंवा आज आपण करत असलेले रावण दहन हे सांकेतिक आहे. सीमोल्लंघन केवळ पांडवांनी केलेले नाही. तुमच्या आमच्या जीवनात रोज सीमोल्लंघन आहे. कष्टाला सामोरे जाऊन जीवन जगणारे या देशातले ८० टक्के लोक आहेत. ते या देशात त्यांची लढाई रोज कुरुक्षेत्रावरच लढत आहेत. काही हरत आहेत, काही जिंकत आहेत. प्रत्येकाची लढाई वेगवेगळ्या रावणाशी आहे, कुणाचा रावण भुकेच्या स्वरुपात आहे तर कुणाचा लाचारीच्या! यासाठी या कुरुक्षेत्रात श्रीकृष्ण बनुन त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे.

दुतोंडी वृत्तीचे दहन करा

स्वत:च्या मनाचा, आयुष्याचा विस्तार करणे म्हणजे सीमोल्लंघन असते. या निमित्ताने आयुष्याची नवी पायरी आपण ओलांडली पाहिजे. फेसबुकवर पाच हजार मित्र असले तरी जीवाभावाची पाच माणसेही जवळ नसतील तर आपले नेमके काय चुकत आहे? याचाही विचार करायचा आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने आयुष्याला मांगल्याचं तोरण लागावं, असा उद्देश असतो. आज एकीकडे सर्वच सीमा हरवत चालल्या आहेत आणि नवीन सीमा तयार झाल्या आहेत. या संकुचितपणाच्या सीमा आपण स्वत:भोवती घालून घेतल्या. त्या मोडण्याचे सीमोल्लंघन करावयाचे आहे. आज समाजात स्त्री-भू्रणहत्त्येचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक काळात स्त्री-पुरूष समानता सांगावी लागते हेच खरे दुर्दैव म्हणावे लागेल. घरातील स्त्रीला कमी लेखायचे आणि दुसरीकडे देवीची पूजा करायची अशी वृत्तीचे दहन करायचे आहे. अशा पध्दतीने दसर्‍याच्या निमित्ताने होणारे हे सामाजिक जाणिवांचे सीमोल्लंघन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. 

युध्द अजून संपलेले नाही

२१व्या शतकात आपण वेगवेगळ्या प्रकारे सीमाल्लंघन केलेच आहे, याच दुमत नाही; यात प्रामुख्याने, भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने याच वर्षी एकाचवेळी १००पेक्षा जास्त उपग्रह अंतराळामध्ये सोडले. भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानी अतिरेक्यांचा पराभव करण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईक करून अनेक दहशतवादी केंद्रे नष्ट केली आहेत. तसेच उत्तर ध्रुवावर जाऊन भारतीय वैज्ञानिकांनी तिथे भारताचे स्थानक उभे केले आहे. भारताची दुसरी चांद्रयान मोहीम १०० टक्के यशस्वी झाली नसली तरी भारताचा ऑर्बिटर चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. भारताचा अविभाज्य घटक असलेल्या काश्मीरला लागलेली दहशतवादाची किड काढून फेकण्यासाठी कलम ३७० रद्द करण्याचे धाडस दाखविले आहे. मात्र आपले युध्द अजून संपलेले नाही. भारताच्या पश्‍चिम आणि उत्तर या दोन्ही सीमांवर असणारे देश आपल्यासमोर अडचणी उभ्याच करत आहेत. यांच्यावर मात करण्यासाठी सीमाल्लंघन करावे लागले तरी आता मागे हटायचे नाही. केवळ आपल्याला पाहिजे म्हणून शांतता मिळत नसते. त्यासाठी शत्रूसुद्धा शांतीप्रिय असला पाहिजे. तसे असेल तरच हे शक्य आहे. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. यासाठी तय्यार रहायचे आहे. शत्रू सरहद्द ओलांडून पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत वाट पाहण्याच्या प्रवृत्तीने आपल्या देशाचे मोठे नुकसान केलेे. सीमोल्लंघन म्हणजे आक्रमण करून युद्धशत्रूच्या देशात पोहोचणे. सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकच्या निमित्ताने एकविसाव्या शतकात ही सीमोल्लंघनाची परंपरा परत पुनरुज्जीवित करण्याचे धाडस भारतीय सैन्याने दाखविले आहेच. तरीही सर्वच समस्या सुटलेल्या नाहीत. या विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्या आव्हांनाविरोधात युध्द पुकारण्याची तयारी करायची आहे. आता समाजातील उपेक्षित दुर्बल व वंचित घटकांना प्रगतीच्या मुख्य धारेत आणले तर भारतामध्येे नवनिर्माणाचे नवयुग उदयास येईल. हे नवे आव्हान पेलून आपणास ज्ञान-विज्ञानाच्या आधारे नवेच सीमोल्लंघन करायचे आहे. कृषी, उद्योग आणि मनुष्य विकास या तीनही क्षेत्रांत नवे विक्रम प्रस्थापित करायचे आहेत. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीच्या नव्या वाटा शोधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाच्या आधारे नवे सीमोल्लंघन करू या. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger