‘नोबेल’ संशोधन हवे

संशोधन हे कोणत्याही देशाच्या यशाची व प्रगतीची गुरुकिल्ली असते. संशोधन हे आयुष्याच्या नवीन संधीचा पाया घालण्याचे काम करते. ज्या देशात संशोधनावर भर दिला जातो तो देश जागतिक स्तरावर आपला निर्विवाद ठसा उमटवेल आणि अगदी कठीण प्रसंगी येणार्‍या अडचणीवर मात करेल यात शंकाच नाही. अनेक क्षेत्रात भारताची प्रगतीकडे घोडदौड सुरु असली तरी काही पातळ्यांवर जागतिक स्तरावर मागे पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे संशोधन आणि नावीन्याचा अभाव होय. अजूनही आपल्यात संशोधन वृत्ती आणि अभिनवता रुजली नाही, हे सत्य नाकारुन चालणार नाही. जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली. यातील विजेत्या शास्त्रज्ञ, संशोधकांचे कार्य पाहून त्यांच्या कार्याला सॅल्यूट देखील ठोकला मात्र याचवेळी आपण भारतीय या स्पर्धेत दरवेळी मागे का पडतो? याची खंत देखील वाटली. 


भारतीयांना हे पुरस्कार का मिळत नाही?

महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्यग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा, ऑस्ट्रियाचे कादंबरीकार व नाटककार पीटर हँडकी यांना साहित्याचा, विज्ञान क्षेत्रात आयन बॅटरीच्या संशोधनासाठी अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन बी. गुडइनफ, ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो तसेच शरीरातील ऑक्सिजन मात्रेतील बदल ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते, हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षय, हृदयविकार यांसह अनेक असाध्य आजारांवर उपचार करण्याचा नवा मार्ग दाखवणार्‍या डॉ. केलीन ज्युनियर, सर रॅटक्लिफ आणि ग्रेग सेमेन्झा या तिन शास्त्रज्ञांना विभागून वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले. डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. दरवर्षी हे पुरस्कार झाल्यानंतर भारतीयांना हे पुरस्कार का मिळत नाही? यावर चर्चा रंगते. 

आतपर्यंत केवळ नऊ भारतीयांना ‘नोबेल’

१९०१ पासून २०१८ पर्यंत ५०९ वेळा ९३५ व्यक्ती व संस्थांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात आतपर्यंत केवळ नऊ भारतीयांना ‘नोबेल’ मिळाले. त्यातील तिन जण मूळ भारतीय वंशाचे, परंतु अन्य देशांमध्ये राहणारे होते. यात सर्वप्रथम १९१३ मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर(साहित्य), १९३० मध्ये प्रकाश या विषयावर संशोधन करुन आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते, यावरील संशोधनासाठी सर चंद्रशेखर व्यंकटरमण (विज्ञान), १९६८ मध्ये जनुकीय क्षेत्र आणि ‘आनुवंशिक कोडे’ यावरील संशोधनासाठी हरगोविंद खुराणा (शरीरशास्त्र/औषधी विज्ञान), १९७९ मध्ये अनाथ, आजारी, दीन-दुबळ्यांची भारतात सेवा केल्याबद्दल मदर टेरेसा(शांतता), १९८३ मध्ये तार्‍यांची रचना, कृष्णविवर, सापेक्षता यावरील संशोधनासाठी चंद्रशेखर सुब्रह्मण्यम (विज्ञान), सन १९९८मध्ये अर्थशास्त्राबद्दल अमर्त्य सेन, सन २००१मध्ये देशाच्या सांस्कृतिक चालीरीतींवर लेखन केल्याबद्दल व्ही.एस.नायपॉल (साहित्य) २००९ मध्ये ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’मध्ये संशोधन केल्याबद्दल व्यंकटरमण रामकृष्णन (रसायन), सन २०१४ मध्ये बालहक्क आणि बालमजुरी उच्चाटन यासाठी मोठे काम केल्याबद्दल कैलाश सत्यार्थी (शांतता) यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महात्मा गांधीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी दोनदा विचार झाला; पण तो देण्यात आला नाही. डॉ. जगदीशचंद्र बोस यांचेही ‘नोबेल’ हुकले. होमी भाभांचे नाव चार वेळा सुचवण्यात आले; पण त्याचा स्वीकार झाला नाही. 

संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात मागे

जागतिक पातळीवर नोबेल पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कारामध्ये नोबेल पारितोषिकाचे नाव घेतले जाते. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. नोबेल हे स्वत: रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे एकूण ३५५ पेटंट्स होती. डायनामाइटचा (सुरुंग) शोध त्यांनीच लावला. आतापर्यंत तब्बल ९३५ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी केवळ ९ भारतियांच्या वाटेलाच हा सन्मान आला आहे. आज अनेक क्षेत्रात भारताची घोडदौड सुरु असली तरी संशोधन क्षेत्रात आपण का मागे पडत आहोत, यावरच संशोधन करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरामध्ये भारताच्या एकही विद्यापीठाचे नाव नव्हते. भारतात आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था असतांना आपण संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात फारच मागे पडलो आहोत. जागतिक क्रमवारीत जी विद्यापीठे आहेत. त्यात २५ टक्के वाटा नोबेल पारितोषिक विजेत्याचा असतो तर ७५ टक्के वाटा संशोधनाचा असतो. भारतीय वंशाच्या व्यक्तीस नोबेल पारितोषिके मिळतात. पण आपल्या देशातील संशोधकास, विचारवंतास नोबेल का मिळत नाही? याचे मंथन करणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक धोरणे बदलण्याची गरज 

भारतात विविध क्षेत्रा केल्या जाणार्‍या विशेषत: शैक्षणिक पातळीवरील संशोधनाचा दर्जा खालवत असल्याची सातत्याने टीका होते. संशोधनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम विविध क्षेत्रावर व संशोधनाशी संबंधित घडामोडींवर होत असलेला दिसून येतो. आपल्याकडे संशोधन म्हणचे पीएच.डी. (तेही केवळ नोकरीसाठी किंवा प्रमोशनसाठी) ऐवढेच समीकरण झाले आहे. मात्र त्यातही कला, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या ज्ञानशाखांतर्गत पीएच.डी. पदवीसाठी होणार्‍या संशोधनाच्या दर्जाबाबत सतत एक निराशेचा सूर जनमानसात उमटताना दिसतो. पीएच.डी.साठी केल्या जाणार्‍या संशोधनाचा दर्जा काय? या संशोधनाचा समाजाला कितपत उपयोग होतो? मुळात या संशोधनाच्या प्रेरणा कोणत्या? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे असतात मात्र त्यांची उत्तरेच मिळत नाहीत. परिणामी या पदवीची प्रतिष्ठा लयाला गेली. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात संशोधन हे केवळ २० गुणांच्या ‘प्रयोगां’पुरताच मर्यादीत आहेत. आपल्याकडे बुद्धी नाही असे नाही फक्त योग्य ती दिशा, मार्गदर्शन, सोयी सुविधा, शैक्षणिक धोरणे यांची गरज आहे. या दोन्हीमध्ये आपण फारच मागे आहोत त्यासाठी संशोधनास प्राधान्य देऊन त्याच्या दर्जाचे परीक्षण केले, तरच आपण आपली पत वाढवू शकतो. संशोधन आणि चांगले शिक्षण मिळू लागले तर दरवर्षी जाहीर होणार्‍या नोबेल पुरस्कारांवर भारत आपला ठसा नक्कीच उमटवेल यात शंकाच नाही.

Post a Comment

Designed By Blogger