अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य देशांमधील व्यापार युध्दामुळे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असल्याने भारतातही मंदीचे मळभ दाटले आहेत. याचा पहिला फटका बांधकाम क्षेत्र व वाहन उद्योगाला बसला. अनेक उद्योगसमूह, कंपन्यांनी मंदीचे कारण पुढे करत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. परिणामी बेरोजगारीचेही संकट गडद झाले. या मंदीतून सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थमंत्रालयापेक्षा पत्रकार परिषदांमध्ये जास्त दिसू लागल्या तरीही मंदीचे सावट कमी होण्यास तयार नसल्याचे विरोधीपक्षासह व्यापारी व उद्योजकांचे म्हणणे आहे. मंदीमुळे बाजारपेठेतील मालाला उठाव नाही, धंदा मंदा आहे, अशी वाक्ये सतत कानावर पडत असतांना ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून सुरु असलेल्या फेस्टीव्ह सीझनमध्ये वनप्लस या कंपनीने दोन दिवसात तब्बल ५०० कोटींची कमाई केल्याचे वाचण्यात आले. दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये देखील अलिबाबा नावाच्या एका ऑनलाइन कंपनीने चक्क १० तासात ५०० अरब रुपयांच्या वस्तू विकल्याचा दावा केला होता. याला चमत्कार म्हणायचा का खरेदीची बदललेली समीकरणे?
‘मंदीसदृश्य’ परिस्थिती खरंच आहे का ?
भारतीय अर्थव्यवस्था ‘मंदीसदृश्य’ परिस्थितीकडे जात आहे. सरकार हे मान्य करायला तयार नसले तरी नीती आयोगासह अनेक अर्थतज्ज्ञांनी याची कबुली देवून टाकली आहे. अशा परिस्थितीत देशातील आर्थिक परिस्थितीला जागतिक मंदी कारणीभूत आहे आणि भारताचा आर्थिक विकासदर अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत घसघशीतच आहे, हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा युक्तिवाद हास्यास्पद आहे. खरेतर भारतीय अर्थव्यवस्था अन्य अर्थव्यवस्थांशी किती जोडली गेली आहे आणि जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा किती? या अनुषंगाने विचार केला तर जागतिक मंदीसदृश्य परिस्थितीमुळे आपली वाताहात होत आहे, हे पूर्णपणे खरे नाही. आज ज्या आर्थिक आरिष्टाला आपण तोंड देतो आहोत ते संकट आपण आपल्या आर्थिक धोरणातून, खोलवर रुजलेल्या रचनात्मक त्रुटी आणि ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेतून ओढावून घेतले आहे. स्थानिक बाजारपेठेत आलेल्या मरगळीला जागतिक किंवा देशातील मंदी नव्हे तर बहुतांशी आपणच कारणीभूत आहोत. आज एकीकडे सणासुदीला बाजारपेठेत म्हणजेच दुकानांवर फारशी गर्दी नसल्याची ओरड होते मात्र त्याचवेळी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या फेस्टीव्ह सीझनने धम्माल चालवली आहे.
ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेतून पाहतांना
बाजारपेठेत जाऊन होणार्या दिवाळीच्या खरेदीची समीकरणे ऑनलाइन शॉपिंगमुळे बदलत चालली आहेत हे आता मान्य करायलाच हवे. आजकालची तरुण पिढी मोबाईलचा त्यातही स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करते. मोबाईलमधील सर्व ऑनलाइन शॉपिंग अॅप्स वापरकर्त्याची आवड-निवड, त्यांची ‘सर्च हिस्टरी’ वापरून, क्यू रिक्टिवली- म्हणजे तुमच्या सर्च हिस्टरीनुसार जाहिरात ‘पॉपअप’ या तंत्राचा वापर करून, त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे चित्र वस्तू रुपातून सातत्याने त्याच्यासमोर आणते. यातून अनेक जण ऑनलाईन शॉपिंगकडे वळतात. हे फॅड आता केवळ मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नसून ग्रामीण भागात कानाकोपर्यापर्यंत ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे डिलेव्हरी बॉईज पोहचले आहेत. यामुळे आता दिवाळी-दसरा सारख्या सणासुदीला पूर्वीसारखीच पारंपरिक पध्दतीने दुकानात जावून शॉपिंग करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाइनच्या माध्यमातून ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करण्यास पसंतील दिली जाते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइल, कपडे, शूज, गॅजेट्ससह टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसघशीत सुट मिळत असल्याने या वस्तू मोठ्या प्रमाणात ऑनलाईनच खरेदी केल्या जातात. अॅमेझॉनच्या अहवालानुसार महाराष्ट्रात मुंबई खरेदीच्या बाबतीत आघाडीवर आहे. तसेच होम अॅण्ड किचन वर्गवारीतील उत्पादनांना महाराष्ट्रातून असलेल्या एकूण मागणीमध्ये मुंबईतून असलेल्या मागणीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. मुंबई शहरातून किचन स्टोअरेज, कन्टेनर्स, किचन टूल्स, बेडिंग अॅण्ड लिनेन आणि स्मॉल किचन अप्लायन्सेस या उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाल्याचे चित्र दिसते. यामुळे फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, ईबेसारख्या अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांची चलती आहे. या कंपन्या विविध सेल सुरु करुन त्याच्या प्रसिध्दीवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद देखील तितकाच मोठा असतो.
किरकोळ वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करा
गेल्या दोन वर्षांमध्ये वाढलेली मोबाइल कनेक्टिविटी, स्मार्टफोनची चलती यामुळे भारतातील दुर्गम गावांमध्ये इंटरनेट पोहोचले ते संगणकावर मात करीत थेट मोबाइलच्या माध्यमातून. त्याचाच थेट परिणाम यंदाच्या ऑनलाइन शॉपिंगच्या गावा-शहरांतील वाढलेल्या प्रमाणामध्ये दिसतो आहे. याचा विपरित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होतो. यामुळेच मंदीची तीव्रता वाढते. याचे ताजे उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास, सध्या अॅमेझॉन इंडियावर सुरु असलेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये प्रिमीयम स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लसने दोन दिवसात तब्बल ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीला चक्क १०० टक्के अधिक फायदा मिळाला आहे. कंपनीच्या वनप्लस फोनने देखील विक्रीचा उंच्चाक गाठला आहे. जर भारतात खरोखरच मंदी असती तर कोट्यवधींची उलाढाल झाली असती का? याचा प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक मंदीच्या कारणामुळे अनेकांच्या नोकर्यांवर गंडातर आलेले असताना अॅमेझॉन इंडियाने फेस्टिव्ह सीझनमध्ये काम करण्यासाठी तब्बल ९० हजार लोकांना तात्पुरता रोजगार दिला आहे. ही सगळी आकडेवारी थोडीशी गोंधळात टाकणारी असली तरी आपणदेखील मंदीला कारणीभूत असलेल्या विविध घटकांपैकी एक आहोत, हे आता मान्य करायलाच हवे. यासाठी मोठ्या वस्तू जरी ऑनलाईन खरेदी करत असलो तरी किरकोळ वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी केल्या तर स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, कुणाची तरी दिवाळी आनंदात जावू शकते याचाही विचार करायला हवा.
Post a Comment