दूरदर्शनची ‘साठी’

‘भारतीय लोक सेवा प्रसारण’ अर्थात ज्या वाहिनीला आपण गेले कित्येक वर्ष ‘दूरदर्शन’ म्हणून ओळखतो. त्या वाहिनीला ६० वर्षे पुर्ण झाली. दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरला आहे. दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक जाळे आहे. रामायण व महाभारत या दोन महाकाव्यांवर आधारित महामालिकांचे जनमानसावर गारुड निर्माण केले होते. रविवारी सकाळी या मालिकांवेळी देशभर जणू ‘कर्फ्यू’ लागणारी परिस्थिती समकालीन लोक आजही विसरलेले नाहीत विशेषत: ८०-९० च्या दशकातील पिढी मुळीच विसरु शकत नाही. दूरदर्शनवर त्या काळी प्रसिध्द होणार्‍या वॉशिंग पावडर निरमा, रसना, बुलंद भारत की बुलंद तसबीर हमारा बजाज, लिरील या जाहिरातीही आजही त्या पिढीच्या तोंडपाठ आहेत. मात्र खाजगी वाहिन्यांच्या जंजाळामधे दूरदर्शन आज स्वत:चे अस्तित्व हरवत तर नाही ना? असा प्रश्‍न दुरदर्शन प्रेमींना सतावत आहे.
हमलोग पहिली मालिका 

दुरदर्शनचा मराठी माणसाशी एक मोठा संबंध जुळून येतो तो म्हणजे, राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, त्यांनीच हे नाव सुचवले. याचा प्रवास खूप वेगळा राहीला. साईट अर्थात सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलीव्हेजन एक्स्परिमेंट हा विक्रम साराभाईंच्या पुढाकाराने अमेरिकेच्या नासा आणि भारत सरकार यांच्यात एका करारान्वये नासाच्या उपग्रह संचार प्रणाली वापराचा एक प्रयोग करण्यात आला. यामधे नासाची उपग्रह संचार प्रणाली दररोज काही ठराविक तासांकरिता भारतीय उपखंडातील दूरचित्रवाणी प्रसारणाकरिता वापरण्यात येणार होती. या प्रयोगामधून असे लक्षात आले की, विकासात्मक संवादासाठी दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. या प्रयोगानंतर ट्रान्समीटर्सच्या मदतीने भूस्तरीय कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येऊ लागले. येथूनच दूरदर्शनला स्वतंत्र अस्तित्व मिळाले. हमलोग ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते. त्यानंतर हिंदीतल्या बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. ‘रामायण’, ‘महाभारत’ यासारख्या मालिकांनी दूरदर्शनच्या लोकप्रियतेवर कळस चढला. यह जो है जिंदगी खानदान, नुक्कड या मालिकांनी दूरदर्शन माध्यमाला भारतीयांच्या मनात स्थान देण्यास सुरूवात केली. जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित भारत एक खोज सारखा आगळा प्रयोग अथवा जगातील सर्वश्रेष्ठ लघुकथांवर आधारित दर्पण यासारख्या मालिकांनी अभिरूचिसंपन्न कार्यक्रम प्रेक्षकांना घरबसल्या मिळू लागले. 

मराठीला मिळाला ‘मुंग्या-मुंग्या’ हा नवा शब्द 

१९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या एशियाड या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागले हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्ताने रंगीत झालेल्या टीव्हीचे प्रेम मात्र झपाट्याने वाढत गेले हे नक्की! या काळात उंच अँटेना डजेस्ट करीत ‘मुंग्या-मुंग्या’ हा नवा शब्द मराठीला मिळाला. दूरदर्शनवरील जाहिरातीही एके काळी लोकप्रिय व तोंडपाठ होत्या. वॉशिंग पावडर निरमा, रसना, बुलंद भारत की बुलंद तसबीर हमारा बजाज, लिरील ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे. दूरदर्शनच्या सुरू होण्यामागील एक प्रमुख उद्दीष्ट होते शिक्षणप्रसार. शिक्षणक्षेत्रामधे धडाडीने कितीही बदल होत असले तरी भारतासारख्या खंडप्राय देशामधे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही. तरूण पिढीला अधिकाधिक सुजाण बनवण्यासाठी २६ जानेवारी २००२ दूरदर्शनमार्फत ज्ञानदर्शन ही स्वतंत्र चोवीस तास चालणारी शैक्षणिक वाहिनी सुरू केली. हा प्रवास इथेच न थांबता, आपल्या देशामधे संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येक नागरिकाला संसदेमधे नक्की काय घडत आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन वाहिन्या प्रसारित केल्या जातात. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या लाईव्ह प्रसारणाव्यतिरीक्त या वाहिन्यांवरून विविध खात्यांशी संबंधित मंत्र्यांच्या मुलाखती, खासदारांची ओळख वगैरे राजकीय तसेच इतर सामाजिक कार्यक्रम दाखवण्यात येतात.

दूरदर्शनने अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख होणे गरजेचे

दूरदर्शनवरील अगदी सुरूवातीच्या काळापासून चालत आलेला आणि आजही तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे कृषीदर्शन. या कार्यक्रमाद्वारे भारतातील सर्व शेतकर्यांना शेतीविषयक, फळ्बाग, फुलबाग , कुक्कुटपालन अशा संबंधित विषयांवर गरजेनुसार माहिती दिली जात असे, या कार्यक्रमाने देखील लोकप्रियतेचे शिखर गाठले होेते. मात्र, इतक्या नवीन वाहिन्या व नवनवीन कार्यक्रम सुरु करूनदेखील दूरदर्शनच्या यशाचा आलेख ९०च्या दशकानंतर मात्र खाली येत गेलेला दिसतो. १९९१ नंतर भारतात चालू झालेल्या खाजगी वाहिन्या आणि उत्पन्नासाठी दूरदर्शनने जाहिरातींवर अवलंबून राहणे ही प्रमुख कारणे आहेत. भारतामधे खाजगी दूरचित्रवाणीचा प्रसार सुरू झाल्यानंतर दूरदर्शनने त्या वाहिन्यांशी स्पर्धा करण्याचे धोरण स्विकारले. दुरदर्शने वयाची ‘साठी’ गाठली असली तरी खाजगी वाहिन्यांच्या जंजाळामधे दूरदर्शन स्वत:चे अस्तित्व हरवून बसत आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. वास्तविक लोकांपर्यंत पोचण्याचे, त्यामधून सकारात्मक कार्य घडवून आणण्याची प्रचंड मोठे सामर्थ दूरदर्शनकडे आहे. मात्र, सरकारी लाल फितीतल्या कारभाराने, योग्य दिशा आणि दृष्टी नसल्याने सध्या दूरदर्शन निव्वळ एक करमणूक प्रधान वाहिनी बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. दूरदर्शनने अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख होणे गरजेचे आहे, त्यासाठी केवळ लोकांना रूचतील असेच कार्यक्रम प्रसारित न करता त्यांच्या विचारांना चालना देणारे, त्यांच्या जीवनामधे बदल घडवून आणणारे, त्यांना सुजाण बनवणारे कार्यक्रम लोकांना देणे आवश्यक ठरेल, ही अपेक्षा.

Post a Comment

Designed By Blogger