प्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही

‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नही होती’ हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो असतो. मात्र याचा नेमका अर्थ काही ‘खास’ लोकांकडे पाहून कळतो. अशीच एक ‘खास’ व्यक्ती म्हणजे, देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील. नाणे खणखणीत असले की ते कुठेही असले तरी वाजल्याशिवाय राहत नाहीच, हे प्रांजल यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे. वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी पूर्णपणे गेल्यानंतरही जिद्द न सोडता, आयुष्यात काही तरी करायचे ही खूणगाठ मनाशी बांधून याच निर्धाराने त्या यशाच्या मार्गाकडे वाटचाल करत राहिल्या. त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७७३ वे स्थान मिळवले. या उत्तुंग यशानंतर देखील केवळ अंध आहेत म्हणून रेल्वेने त्यांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली. यानंतरही खचून न जाता त्यांनी २०१७ मध्ये युपीएससीच्या आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत १२४वे स्थान मिळवले व प्रशिक्षणानंतर केरळमधील एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्टर म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली.


प्रतिकुल परिस्थितीत प्रत्येक क्षणी लढाई 

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी २ टक्के लोक दिव्यांग आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार देशात सर्वाधिक अपंग व्यक्ती या उत्तर प्रदेशात असून त्यांची संख्या ७८ लाख एवढी आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात २९ लाख ६३ हजार आहेत. यात ५.७४ लाख अंध, ४.७३ लाख कर्णबधिर, ४.७२ लाख मूकबधिर, ५.४८ लाख शारीरिक अपंगत्व असलेल्या, तर २.२० लाख व्यक्ती मतिमंद व गतिमंद आहेत. अन्य दिव्यांग ५ लाख १० हजार, तर बहुदिव्यांगत्व असलेल्यांची संख्या एक लाख ६४ हजार एवढी आहे. अंध आणि कर्णबधिर व्यक्तींना समाजात मिळत असलेली वागणूक, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनात त्यांना येणार्‍या अडचणी या विषयांवर नेहमी चर्चा होते. परिस्थितीवर मात करून स्वत:ची गुणवत्ता सिध्द केल्यानंतरही त्यांच्याकडे समाजाचे दुर्लक्ष करत केवळ सहानुभूती दाखवितो. अपंग व्यक्ती समाजातील वैद्यकीय आणि सामाजिक दृष्टिकोनामुळे, तसेच आर्थिक अडचणींमुळे खचून जातो़  याला छेद देण्याचे काम केले ते अमेरिकन लेखिका हेलेन केलर यांनी १८८० साली जन्मलेल्या हेलेन केलर यांना वयाच्या दुसर्‍या वर्षी आजारपणामुळे आपली दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमवावी लागली़. मात्र असे असतानाही त्यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला व कला शाखेतून पदवी घेणार्‍या त्या पहिल्या अंध-बधिर ठरल्या. जगभरात सुमारे १८० दशलक्ष लोक दृष्टिहीन असून प्रत्येक तीन अंध व्यक्तींपैकी एक भारतात आढळतो़  तर २ दशलक्ष अंध मुलांपैकी केवळ ५ टक्के विद्यार्थ्यांंना शिक्षण मिळत़े  अंध आणि बधीर व्यक्तींना रोजच्या जीवनात संवाद साधताना अनेक अडथळे येतात़  अनेकदा ते स्वत:च्या भावना व्यक्त करू शकत नाहीत़  सामाजिक आणि आर्थिक अडचणी व मानसिक खच्चीकरण, यामुळे बहुतांश जण डगमगतात. अनेकदा दिव्यांग लोकांना चेष्टेला किंवा हतबलतेला सामोरे जावे लागते. शारिरीक कमतरतेमुळे त्यांच्याकडे सन्मानाऐवजी सहानुभूतीच्या नजरेतून पाहिले जाते. अशा प्रतिकुल परिस्थितीत काही दिव्यांग असे आहेत जे प्रत्येक क्षणी आपली लढाई लढत आहेत आणि दररोज जिंकत आहेत. यापैकीच एक आहेत प्रांजल पाटील... 

परिस्थितीवर रडत व कुढत बसणार्‍यांना प्रेरणा देणारे यश

प्रांजल पाटील या जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील रहिवासी असून, त्यांची दृष्टी जन्मापासून कमकुवत होती, पण वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतु त्या खचली नाही, आयुष्यात काहीतरी करायचे आहे, हा निश्चय करुन ती वाटचाल करत राहिल्या. प्रतिकूल स्थितीत पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत आयएएस झाल्या. त्या केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणार्‍या पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत. आपल्या पहिल्या प्रयत्नातच ३० वर्षीय प्रांजल यांनी यूपीएससी परीक्षेत ७७३ वे स्थान मिळवले होते. ७७३ व्या क्रमाकांनुसार प्रांजलला रेल्वे अकाऊंट सर्विस देण्यात आली होती. मात्र तिच्या अंधपणाचे कारण सांगत रेल्वेने त्यांना ताटकळत ठेवले. मात्र या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्राजंल यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि १२४वी रँक मिळवली. अंध असल्याचे कारण दाखवून जी व्यवस्था तिला तिच्या हक्काची पोस्ट देत नव्हती, त्यांच्या नाकावर टिच्चून तिने पुन्हा यूपीएससीत घवघवीत यश मिळवले. या रँकिंगच्याच जोरावर प्रांजल उपजिल्हाधिकारी झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती एर्नाकुलम येथे झाली असून वर्षभर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून या पदावर त्या राहतील. नंतर त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होईल. प्रांजल यांच्याप्रमाणे २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी केंप्पोहेन्नियाह यांचाही येथे उल्लेख करायलाच हवा. कारण ते देखील पाहू शकत नाहीत मात्र त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या आधी उत्तर प्रदेश येथील तथा देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी असलेले कृष्णगोपाल तिवारी यांचाही यशाचा प्रवास प्रचंड खाच खळग्यांमधून गेलेला आहे. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यातही तीन भावांना वयाच्या दहाव्या वर्षापासून दृष्टी कमी होण्याचा आजार जडला. पदवीचे शिक्षण घेत असताना पूर्णपणे दृष्टी गेली. असे असतानाही प्रचंड मेहनत केली. २००६ आणि २००७मध्ये त्यांनी यूपीएससीच्या लेखी परीक्षेत यश मिळवले. मात्र, मुलाखतीत त्यांना अपयश आले. अखेर २००८मध्ये त्यांनी मुलाखत परीक्षाही सर करत लक्ष्य गाठले. आता पूर्णपणे अंध असून, मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. या सर्वांचे हे नेत्रदीपक यश डोळस असूनही परिस्थितीवर रडत व कुढत बसणार्‍यांना प्रेरणा देणारे आहे. आज आपल्यातील अनेक तरुण छोटेसे अपयश आले म्हणून खचून जातात, यातून अगदी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग निवडतात. मात्र ज्यांच्या डोळ्यासमोर जन्मापासून किंवा लहानपणापासूनच अंधार असतो त्या ‘खास’ व्यक्ती स्वत: प्रकाश बनून इतरांचा मार्ग दाखवितात, हेच खरे युथ आयडॉल्स आहे.

Post a Comment

Designed By Blogger