‘राऊडी’ मोदी


दहशतवाद ही कुण्या एका देशाची समस्या राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर या समस्येने अक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाने भारताला गेल्या ७० वर्षांपासून ग्रासले असल्याने काश्मीरचा प्रश्‍न गंभीर झाला. याची झळ अन्य देशांना फारशी बसत नसल्याने आधी भारताच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी अन्य स्वत:हून कधी पुढे आले नाही मात्र जेव्हा अमेरिकेवर ९/११चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवादाची समस्या किती गंभीर झाली आहे? याची जाणीव अमेरिकेसह संपूर्ण जगाला झाली. यानंतर दहशतवादाविरोधात एकत्रित लढा लढण्याची भाषा आतंरराष्ट्रीय पातळीवर बोलली जावू लागली आहे. या लढाईत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात भारत कसा लढत आहे, याची जाणीव वेळोवेळी अन्य देशांना करुन दिली आहे. आता अमेरिकेच्या ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात मोदींनी पाकिस्तनाचे नाव न घेता ‘९/११ किंवा २६/११ चे सूत्रधार कोठे सापडतात’, असे विधान केल्याने पाकिस्तानचा सभ्यपणाचा बुरखा फाडला आहे.


भारताची दहशतवादाबाबतची मागणी जगाला पटली


गेल्या काही वर्षांमध्ये विविध संघटनांकडून जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हिंसाचार आणि हिंसा वाढत आहे. त्यामुळे एकंदरीतच असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. आज जगामध्ये १९३ देश आहेत. यापैकी १०० हून अधिक देशांना दहशतवादाचा धोका आहे. हा दहशतवाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरचा आहे. जगभरात फार कमी राष्ट्रे आहेत, ज्यांना या दहशतवादाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झळ बसलेली नाही. साधारणतः १९९० ते २००० पर्यंत दहशतवादी घटना या आशिया आणि आफ्रिका खंडापर्यंत मर्यादित होत्या. २००० नंतर अमेरिका आणि युरोप हे दहशतवाद्यांचे लक्ष्य बनण्यास सुरुवात झाली. २००१ मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला आणि अशा प्रकारचे हल्ले घडण्यास सुरुवात झाली. सध्या युरोप हे दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असल्याचे दिसत आहे. दहशतवादाचा सामना करणे हे एका राष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आता बहुराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणे अपरिहार्य बनले आहे. भारताला दहशतवादाची समस्या १९८० च्या दशकापासून भेडसावत आहे. यामध्ये लाखो जणांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. भारतातील दहशतवादाकडे राष्ट्रीय पातळीवरील दहशतवाद म्हणून पाहिले गेले. परंतु आज भारताची दहशतवादाबाबतची जी मागणी होती ती जगाला पटलेली आहे. 


पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगासमोर


आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मागणीची दखल घेतली गेली आहे. आता याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरून कडक पावले उचलली जाण्यास सुरुवात झाली आहे. ज्या तालिबानमुळे अमेरिकेला दहशतवादाची झळ बसली त्याचा निर्माता म्हणून अमेरिकेचाच उल्लेख होतो. ऐंशीच्या दशकात जग अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यातील शीतयुद्धात विभागलेले असताना साम्यवादविरोधी लढ्यात अमेरिकेने तालिबानचा वापर केला. त्यास व्यापारी हितसंबंधांचीही किनार होती. ताजिकिस्तान तसेच अफगाणिस्तानातून जाणार्‍या तेलवाहिन्यांत दोन बलाढ्य अमेरिकी कंपन्या गुंतलेल्या होत्या. या दोन्ही कंपन्यांकडून तालिबान्यांना भरभक्कम खंडणी दिली जात होती हा इतिहास आहे. आज दहशतवादाला प्रामुख्याने धार्मिक रंग दिला गेला आहे. याची सुरुवात हस्तक्षेप आणि हस्तक्षेपाला होणारा विरोध या पार्श्वभूमीवर झालेली आहे. मात्र आता हा दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या जन्मदात्यांवरदेखील उलटला आहे. याचे दुख: पाकिस्तानपेक्षा अन्य कोणताही देश समजू शकत नाही असे असतांना पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतच आहे. भारतामध्ये घातपात घडवून निष्पापांचे असेच बळी घेणार्‍या दहशतवाद्यांची एकीकडे पाठराखण करायची आणि दुसरीकडे अमेरिकेच्या अब्जावधी डॉलरच्या मदतीकडे डोळा ठेवून स्वतःला आव्हान निर्माण करणार्‍या पाक-अफगाण सीमेवरील तालिबान्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा अवलंबवायचा हा दुटप्पीपणा पाकिस्तान सदैव दाखवित आला आहे. सरकारे बदलली, तरी पाकिस्तानची ही नीती काही बदललेली नाही. भारतामध्ये दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले होत असताना त्याकडे पाकिस्तानने केवळ अलिप्तपणे पाहिले असे नव्हे, तर उलट त्याने भारतविरोधी शक्तींची पाठराखण केली. लष्कर ए तोयबा, जमात उद दावा अशा नवनव्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या आयएसआयने पोसल्या, पाकिस्तानी लष्कराने ही विषवल्ली आपल्या पंखांखाली वाढवली. पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगासमोर आणून पाकिस्तानाला उघडे-नाकडे करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीच कसर सोडत नाहीत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाडसी भूमिका कौतुकस्पद


गेल्या काही महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या दौर्‍याच्या मोदींनी युएईचे अनभिषिक्त युवराज मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. संपूर्ण जगभर पसरत असलेल्या दहशतवादाची कडक शब्दात निंदा करण्यात आली. जे देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत, जे धर्माचा वापर करून दुसर्‍या देशात दहशतवादी कारवाया करत आहेत, अशा सर्व देशांचा या निवेदनात निषेध करण्यात आला. यावेळी दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहन मोदींनी केले. आता ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासन देत ९/११ किंवा २६/११ चे सूत्रधार कोठे सापडतात? असा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी पाकिस्तानला दिला. आतातरी पाकिस्तानने सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण दहशतवाद हा शेवटी दहशतवाद असतो. दहशतवादी हा कधीही कुणाचा मित्र असू शकत नाही. तो माणुसकीचा शत्रूच असतो. याची जाणीव होणे गरजेचे आहे. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या बनल्यामुळे आता गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे किंवा त्याबाबत सामूहिक प्रयत्न करणे, यासाठी राष्ट्रे तयार होऊ लागली आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकमताने आणि कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाडसी भूमिका कौतुकस्पद आहे. यामुळे त्यांना ‘राऊडी’ मोदी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger