गेल्या काही वर्षात वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. परिणामी ग्लोबल वॉर्मिंगवर गांभीर्याने चर्चा सुरु झाली आहे. प्रदूषण ही सर्वच देशांची एक महत्त्वाची समस्या बनली आहे. याला करणीभूत आपणच आहोत कारण, आपण जी जीवनशैली अवलंबली आहे तीच निसर्गाला मारक ठरत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा निर्माण होऊन मानवाचे आयुष्य वाढले, लोकसंख्या प्रचंड वाढली, त्यामुळे जंगले आणि नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येऊन ते नष्ट होऊ लागले. शेवटी या सर्वांचा परिणाम भविष्यात मानवावरच होणार असून, मानवाचे पृथ्वीवर राहणे कठीण होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे संकट दूर करायचे असेल व त्यावर मात करायची असेल तर सध्या करत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत, यामुळे आता फक्त चर्चा करून चालणार नाही, तर कृती करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या अमेरिकेत सुरु आहे. यात एका १६ वर्षीय स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने संताप व्यक्त करत चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह जगभरातील नेत्यांवर धारेवर धरले असून, ‘तुम्ही माझे बालपण हिरावून घेतले आहे’ असा थेट आरोप केला आहे.
कर्बवायू उत्सर्जनात चीन, अमेरिका, भारत आणि रशिया जगात अव्वल
प्रदूषणामुळे हवामानात कमालीचे बदल घडत आहेत. म्हणूनच हवामान बदलाचे आव्हान मानवजातीपुढील आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही समस्या सर्व जगाला भेडसावत आहे. यांत्रिक प्रगतीमुळे वने आपण तोडायला सुरवात केली, औद्योगिक क्रांतीच्या नावावर प्रदूषण वाढले, शहरीकरण झाले, लोकसंख्या वाढू लागली आणि ज्या आधारावर सृष्टीची रचना झाली तो आधारच आपण हळूहळू काढून टाकायला सुरवात केली. आता त्याचेच परिणाम तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाने आपण पाहत आणि अनुभवत आहोत. थर्मल पॉवर स्टेशन्स, सिमेंट उद्योग, कागद उद्योग आणि विविध कारखान्यांमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे ओझोन थर विरळ होणे, ध्रुवावरील बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती अशी ही मालिका निर्माण झाली आहे. त्यात कोळसा ऊर्जा प्रकल्प हे जगातील सर्वात जास्त वायू प्रदूषण करणारे उद्योग ठरले. त्यातून जागतिक तापमान वाढविणारा कार्बन डाय ऑक्साइड आणि सोबत सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, मिथेन इ. घातक वायू उत्सर्जित होतात तर सिमेंट उद्योग, कागद उद्योग, रसायन उद्योग इत्यादीतून मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होत आहेत. चीन, अमेरिका, भारत आणि रशिया जगात सर्वात जास्त कर्बवायू उत्सर्जन करीत आहेत.
...म्हणून ग्रेटाने सर्वांना धारेवर धरले
उद्योगातून निघणारे हरितगृह वायू (ग्रीन हाउस गॅसेस) कमी करण्यासाठी डिसेंबर १९९७ मध्ये अनेक देशांनी एकत्र येऊन क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्याचे ठरविले, परंतु तो खर्या अर्थाने अस्तित्त्वात आला फेब्रुवारी २००५ मध्ये. त्यात २०२० पर्यंत कर्ब वायूसहित इतर हरित वायू उत्सर्जनावर संपूर्ण नियंत्रण आणावयाचे ठरले, परंतु अजूनही भारतासहित अनेक देश त्यांच्या ऊर्जा समस्येवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरत आहेत. २०१५ मध्ये पॅरिस करार करण्यात आला. त्या करारावर १९७ देशांनी सह्या केल्या असून, या शतकात सरासरी तापमान २.०० डिग्रीच्या आत ठेवण्याचा निर्धार केला आहे. शक्यतो तापमान १.५ पर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी कर्ब वायूचे प्रमाण ४५ टक्के कमी करून तापमान वाढ २०३० पर्यंत पूर्ण नियंत्रित करण्याचे ठरले आहे. कारण या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोन थर नष्ट होतांना दिसत आहे. सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरणे येतात त्यापासून ओझोन थर आपले संरक्षण करत असतो मात्र कारखाने, वाहन वाढल्याने दिवसेंदिवस हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याने हा ओझोन थर कमी होत चालला आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान अधिकाधिक उष्ण होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा थेट परिणाम मानवजातीवर होत आहे. यासाठीच ग्रेटाने सर्वांना धारेवर धरले आहे.
.....तर ग्रेटाची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही
ग्रेटा ही ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल थांबवण्यासाठी प्रयत्नात असणारी स्विडिश कार्यकर्ती आहे. हवामानातील बदल थांबवण्यासाठी तिने स्विडिश संसदेबाहेर संप सुरू केला होता. त्याचबरोबर तिने या विषयासंदर्भात शाळेतही संप केला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये तिने टेडेक्सटॉकहोममध्ये भाषण दिले होते, जे प्रतिष्ठेचे समजले जाते. यावर्षीप्रमाणे तिने गेल्या वर्षीही ‘युएन हवा कृती परिषद २०१८’मध्ये संबोधित केले होते. यंदा या परिषदेत बोलताना ग्रेटा म्हणाली, ‘सध्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे इथेच थांबायला हवे. मी इथे थांबायला नकोय, समुद्रापलीकडच्या शाळेत मी निघून जायला हवे. तुम्ही आम्हा तरूणांकडे आशेच्या दृष्टीने कसे बघू शकता? जैवसंस्था नाश पावताहेत, लोक मरण पावताहेत. विज्ञान गेले २० वर्ष स्पष्ट संदेश देत आहे तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. हिंमत कशी होते तुमची अशी वागायची? तुमच्या पोकळ आणि खोट्या शब्दांमुळे माझी स्वप्न व बालपण हिरावले गेले आहे’. असा आरोप तिने केला. युनोच्या व्यासपीठावरून जगभरातील नेत्यांना १६ वर्षांच्या तरुणीने हा सवाल केल्याने या विषयाकडे आतातरी गांभीर्यांने पाहिले पाहिजे. आता पृथ्वीचे आणि प्रादेशिक वाढते तापमान कमी करायचे असेल, तर सर्वात उत्तम आणि मोठा उपाय म्हणजे युद्ध पातळीवर वृक्ष लागवड आणि वनीकरण हे होय. तापमान वाढविणारा दुसरा घटक म्हणजे कर्ब वायू. त्याचे उत्सर्जन पूर्ण कमी करणे गरजेचे आहे. कोळसा आधारित सर्व वीज आणि इतर प्रदूषण करणारे उद्योग त्वरित बंद करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवले पाहिजेत. आपली उद्योग आधारित अर्थव्यवस्था बदलून वन, वृक्ष, शेती आणि निसर्ग आधारित चिरंतन अर्थव्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे. नाही तर ग्रेटाची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही!
Post a Comment