अपाचे हेलिकॉप्टरने वाढवले हवाई सामर्थ्य


काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांचे अनेक मंत्री अणुयुध्दाच्या पोकळ धमक्या देत आहेत. सीमेवरील हा युद्धज्वर पाहता तिन्ही दल अलर्ट आहेत. भारताशी युद्ध करणे पाकिस्तानला परवडणार नाही याची जाणीव इम्रान खानसह पाक लष्कराच्या सर्वच अधिकार्‍यांना आहे. आधीच भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकने पाक सैन्याचे मनोबल आधीच खचले आहे. आता तर भारतीय हवाई दलात जगातील सर्वात शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. यामुळे पाकिस्तान व चीनला भारताकडे डोळे वटारून पाहण्याआधी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. सर्वात शक्तिशाली आणि अचूक मारा करण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये असून अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी याच अपाचे हेलिकॉप्टरचा वापर केला होता. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढणार आहे.


‘ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स’

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यावर भारताच्या हितसंबंधांचा विस्तारही जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेला आहे. भारत आज जगातील सहावी सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे. एकीकडे ही घोडदौड सुरु असताना शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तान व चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारत चिंताग्रस्त झाला आहे. या सर्व परिस्थितीत भारतासमोरील आव्हाने परतवून आपल्या राष्ट्रहिताचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी हवाई दलाची ‘व्यूहात्मक’ पोच वाढणे आवश्यक आहे. ‘ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स’, असे म्हणतात. त्यासाठी सक्षम हवाई दल हा सर्वोत्तम पर्याय आहे. तत्परता, चपळता, लवचिकता आणि अनपेक्षित हल्ला करण्याची क्षमता ही हवाईदलाची अंगभूत वैशिष्ट्ये. भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता भारताने हवाई दलाची ताकद वाढविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आधी चुणूक नंतर आता आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत.

जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना

अपाचे एएच-६४ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरते. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टीरोल कॉम्बॅट तसेच शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. जवळपास २८० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारे हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही. जवळपास पावणेतीन तासांपर्यंत हवेत राहू शकणार्‍या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचे तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणे शक्य आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. परिणामी भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढणार आहे. अमेरिकेशिवाय नेदरलँड्स, इजिप्त, इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे आहेत. इस्त्रायलने लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. 

हवाई दल पुरेसे सक्षम होणे अत्यावश्यक 

सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय ३५ हेलिकॉप्टर्सचा वापरत आहे. भारतीय वायुसेनेकडे सध्या असलेले हेलिकॉप्टर्स हे तीन दशकांपेक्षाही अधिक जुने आहेत. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताकडून युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणार्‍या २२ अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी अमेरिकेसोबत सप्टेंबर २०१५ मध्ये करार करण्यात आला होता. कोट्यवधी डॉलर्सचा हा व्यवहार आहे. यातील पहिल्या चार अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा २७ जुलै रोजी बोईंगतर्फे हवाई दलाला करण्यात आला होता. हा करार झाल्यानंतर अपाचेची पहिली तुकडी प्राप्त करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. आपल्या सशस्त्र दलाकरिता या हेलिकॉप्टर्सची खरेदी करणारा भारत हा जगातील १४ देश ठरला आहे. भारताची हवाई ताकद वाढणे ही शेजारच्या पाकिस्तान व चीनची डोकेदुखी आहे. कारण, भारतावर मात करणे हीच पाकिस्तानची एकमेव महत्त्वाकांक्षा आहे. आपल्या देशातील अंतर्गत समस्या कितीही मोठ्या असल्या तरी भारताविरोधात लढण्यासाठी स्वत:ला सक्षम बनविण्याकडे पाकिस्तानचा कल असतो. पाकिस्तानला चीनकडून सातत्याने मदत केली जाते. आधुनिक विमाने व अन्य शस्त्रास्त्रेही पुरवली जातात. अन्य काही देशांकडूनही पाकिस्तानला आर्थिक मदत मिळते. दुसरीकडे लढाऊ विमानांच्या संख्येबाबतीत चीन भारतापेक्षा आघाडीवर आहे. यासाठी आपले हवाई दल पुरेसे सक्षम होणे अत्यावश्यक आहे. मुळातच आपल्याकडे विमानांची संख्या अत्यंत कमी असताना नव्या विमानांची खरेदी करण्यासाठी जितका उशीर होईल तितके आपले स्वत:चेच नुकसान होणार आहे. मध्यंतरी राफेल विमान खरेदीवरुन बराच धुराळा उडाला होता. तो आता कुठेतरी खाली बसला आहे. 

पाकिस्तान, चीनसह सर्वांच्या उरात धडकी 

हवाई दलाकडे किती लढाऊ विमाने असली पाहिजेत, यावर अनेकदा चर्चा होते. चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी आपल्याकडे ५५ स्क्वॉड्रन्स असल्या पाहिजेत, असा अहवाल टाटा समितीने दिला होता. नंतर तो कमी होऊन ४४ व त्यानंतर ३९ पर्यंत खाली आला. सध्या तर आपल्याकडे लढाऊ विमानाच्या स्क्वाड्रन्स त्याहीपेक्षा कमी आहेत. ही आपल्या हवाईदलाची सर्वात मोठी समस्या म्हणता येईल. सध्या सुखोई विमानांचा मोठा ताफा आपल्याकडे आहे. जॅग्वार विमानांचा वापर सध्या फक्त भारतातच सुरू आहे. अन्य काही विमाने आता कालबाह्य होत असल्याने लवकरच ती हवाई दलाच्या ताफ्यातून निवृत्त होतील. या लढावू विमानांच्या मदतीला आता अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्सची जोड मिळाली आहे. हवाई दलाने आपल्या कमतरता पुढे येऊ न देता वेळोवेळी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. पाकिस्तान व चीन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची वेळ आली, तर हवाई दलाने लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्ससह अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा अशी भक्कम तटबंदी उभी केली आहे. सध्या आपल्याकडे काही कमतरता असल्या तरी हवाई दल लवकरच पाकिस्तान, चीनसह सर्वांच्या उरात धडकी भरवेल, यात शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger