बाप्पा, सद्बुध्दी दे...!


महाराष्ट्राचे आराध्य दैवत, गणरायाचे मंगलमय वातावरणात सोमवारी सर्वत्र आगमन झाले. गणराया हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण त्याचा वापर फक्त लोककल्याणासाठी करतो. आजपासून दहा दिवस लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरु राहणार असल्याने विघ्नहर्त्या बाप्पाकडे भरभरुन मागायचे आहे. त्याच्या कृपेमुळे जे जे मिळेल ते ते पदरात पाडून घ्यायचे आहे. मराठमोळा गणेशोत्सव आता केवळ देशव्यापीच नव्हे तर ग्लोबल झाला आहे. यामुळे बाप्पाकडे काही मागायचे असेल तर केवळ घरापुरता नव्हे तर राज्य, देश व संपुर्ण भुतलासाठी मागितले तरी गणराया नाही म्हणणार नाही! देवा तुच बनविलेल्या या पृथ्वीवर काय सुरु आहे, हे तुला दिसत असेलच, देवा आज संकटे चहुबाजूने आली असल्यासारखे भासत आहे. सर्वसामान्य कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी सत्ताधार्‍यांच्या मनमानीमुळे भरडला जात आहे. बाप्पा सर्वांना आता तुच बुध्दी दे.....


प्रत्येकजण गोंधळलेला 

राज्यातील गणेशोत्सवाला ओल्या व कोरड्या दुष्काळाची किनार आहे. पाण्याखाली बुडालेले सांगली व कोल्हापूर आता कुठेतरी सावरत आहे मात्र तिकडे मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. परिणामी दोन्ही ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. बाजारपेठांचे कंबरडे मोडून पडले आहे. यातून सावरण्याचा प्रयत्न करताना देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याच्या बातम्या एकामागून एक धडकत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एकाच आठवड्यात दोन-दोन वेळा पत्रकार परिषदा घेवून लोकप्रिय घोषणांची मलमपट्टी करावी लागत आहे. तिकडे केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या ताब्यातील अब्जावधी रुपयांची गंगाजळी स्वत:च्या ताब्यात घेत आहे, याला काय म्हणावे? विघ्नहर्त्या हे जर राजकीय रडगाणे असेल तर निवडणुकांनंतर आम्ही आमचे आमचे पाहून घेवू तुला जास्त त्रास देणार नाही मात्र देवा हे जर खरे असेल तर तुच वाचव रे, आज येथे प्रत्येकजण गोंधळलेला वाटत आहे. त्यांना योग्य मार्ग दाखव. 

राजकारण्यांना सुबुद्धी देशील का विनायका?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २०२० मध्ये भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताची अर्थव्यवर्स्था पाच ट्रिलियन करण्याचे स्वप्न दाखवित आहेत. देवा आज भारताने पृथ्वीवरुन थेट चंद्र व मंगळावर उडी मारली आहे. अवकाश तंत्रज्ञानाबाबतीत भारताला आज अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशांच्या पंक्तीत बसण्याची संधी मिळाली आहे. मात्र देशापुढील अनेक आव्हाने आजही कायम आहेत. लोकसंख्या, गरिबी, स्वच्छता, भ्रष्टाचार, स्त्रियांंवरील अत्याचार अशा अनेक समस्या आजही तशाच आहेत. बाप्पा आता तुला नुसतीच गार्‍हाणी सांगून उपयोग नाही. तू म्हणशील मी आलो नाही तर यांनी आपली गार्‍हाणी सुरू केली पण बाप्पा संकटमोचक म्हणून आम्ही तुझा धावा नाही करायचा तर कुणाचा करायचा? वाढत्या महागाईसह गरिबी आणि बेरोजगारी हे असेच काही प्रश्न आहेत. सरकारे येतात आणि जातात, प्रश्न मात्र तिथेच राहतात. राजकारण मात्र सर्रास सुरू राहते. त्यात मरतो तो गरीब! या राजकारण्यांना सुबुद्धी देशील का विनायका? 

देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष

सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याच्या खोलात शिरलास तर देवा तुझेही डोके ठणकायला लागेल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर तुझे आगमन होत आहे. लोकसभेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातात तर भाजपवाल्यांनी कहरच लावला आहे. भाजपात अन्य पक्षातील इतके नेते प्रवेश घेत आहेत की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष, विरोधी नेते राहतील का हा प्रश्न आहे. यावर प्रश्‍न विचारायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार पत्रकारांच्या प्रश्नावर संतापत आहेत. राष्ट्रवादीची स्थापना अशाच फोडाफोडीतूनच झाली आहे याचा त्यांना सोईस्कर विसर पडतांना दिसत आहे. पवारांनी जे पेरले ते उगवले असेही म्हटले जाते आहे. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हा जसा आरोप आहे तसा राजकारणात त्यांनी कुणाच्या चाब्या कुठे फिरवल्या हे त्यांनाच माहित आहे, मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची झालेली वाताहत यामुळे सारेच कठीण होऊन बसले आहे. देवा ओला व कोरडा दुष्काळ ठीक होता मात्र आता महाराष्ट्रात वैचारिक दुष्काळ पाहायला मिळतोय. राजकारणात नकारात्मकता वाढीस लागली आहे. भाजपा-शिवसेना युती होणार, असे वातावरण आहे. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा एकत्र बसले की, विषय संपला असे एकीकडे सांगितले जाते आहे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, शिवसेनेला १४४ जागा अशा घोषणा सुरू आहेत. सत्ताधारी व विराधी पक्षांच्या यात्रा सुरु आहेत. टीका-टिप्पणी, अपेक्षा, आरोप आणि चाली सुरू आहेत. मात्र देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे आजही दुर्लक्ष होत आहेत किंबहुना करण्यात येत आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. 

सद्विचाराने अवघा समाज समरस होऊ

गरिबांचे पोट भरणे, अशिक्षितांच्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देणे अशा पायाभूत सुविधांकडे कुणाचे लक्ष जात नाही. महिलांवरील अत्याचारांनी तर कळस गाठला आहे. स्त्रियांवरील अत्याचार, दलितांवरचे अत्याचार हे रोखायला हवेत. देशातील आर्थिक संकट व विषमता विषमता संपवण्यासाठी काही तरी ठोस करण्याची बुद्धी लाभावी हीच इच्छा! काळ्या पैशाने कधीही चांगली कामे होऊ शकत नाहीत, हे त्या लोकांना कुणी तरी सांगायला हवे. तिकडे शेजारच्या पाकलाही थोडी बुद्धी दे, ज्या देशाने चंद्रापर्यंत मजल मारली, त्या देशाला पाकच्या विरोधात युद्ध करणे मोठी गोष्ट नाही मात्र युद्धाने पाकमधील गरिबी संपेल का? पाकमधील रक्तरंजितपणा संपेल का? यासाठी त्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश टाक. निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय घडते हे देवा तुलाच ठावूक आहे. तूर्त गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला आहे. मोरया, मोरयाचा गजर सुरू झाला आहे. ढोल-झांज-लेझीम पथके नाद करू लागली आहेत. बाप्पा आता तू चागला १० दिवस मुक्काम करणार आहेस आणि तू बुध्दीचा देवता आहेस. हा सण धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक बंध मजबूत करणारा आहे. देवा सर्वांना सुबुद्धी दे. सौख्य, समाधान दे आणि राष्ट्रीय भावनेने, सद्विचाराने अवघा समाज समरस होऊ दे हीच एक अपेक्षा आहे.


Post a Comment

Designed By Blogger