यशाच्या शिखरावरुन जॅक मा यांची निवृत्ती

नोकरीतून निवृत्त होण्याचे वय ५८ वर्ष आहे. राजकारणी किंवा व्यापारी, उद्योगपती यांच्या सेवानिवृत्तीचे असे कोणतेही वय भारतात तरी नाही. अलीकडच्या काळात राजकारणातून निवृत्त होण्याचे वय असावे का? या विषयावर चर्चा रंगते मात्र, यासाठी नियम वगैरे असे काहीच नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला चिकटून राहणारे अनेक नेते सर्वच पक्षांमध्ये आढळून येतात. उद्योगपतींमध्ये तर निवृत्ती असे काहीच नसते, एकानंतर कुटुंंबातील दुसरा सदस्य प्रमुखपदाच्या खुर्चीवर बसतो व देशात घराणेशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहे यावर भाषण करतो. मात्र, या परंपरेला छेद देणारी काही उदाहरणे गेल्या दोन-तीन वर्षात घडली. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, टाटा उद्योग समुहाचे रतन टाटा, विप्रोचे अझीम प्रेमजी, इन्फोसिसचे एन. आर. नारायणमूर्ती यांची नावे घेता येतील. एखाद्या उद्योगपतीची निवृत्ती हा काही देशव्यापी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय नाही; परंतु ही मंडळी यास अपवाद ठरली. याच पंगक्तीत अजून एक नाव समाविष्ट झाले आहे ते अलिबाबा कंपनीचे संस्थापक 
जॅक मा यांचे...


रतन टाटा, अझीम प्रेमजींची वाटचाल

भारतातील सगळ्यात मोठ्या उद्योगसमुहाचे अध्यक्ष व जगातील एक प्रमुख उद्योगपती रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर त्यांचे प्रचंड कौतुक झाले. एरव्ही सर्व क्षेत्रांतील मोठी कर्तबगार मंडळी कधी पायउतार होणार हा आम्हाला प्रश्न पडतो. पण या रत्नपारखी उद्योजकाने तशी वेळच येऊ दिली नाही. अझीम प्रेमजींची वाटचाल याच मार्गावरुन गेली. खाद्यतेल तयार करणार्‍या वडिलोपार्जित व्यवसायाची सूत्रे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी घेतली आणि त्याला काळानुरूप नवी दिशा देत माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अग्रगण्य ब्रँड म्हणून उभे केले. दूरदृष्टी, सचोटी आणि शुद्ध व्यावसायिक नीतिमत्ता या गुणांच्या जोरावर त्यांनी ‘विप्रो’ला भारतीय औद्योगिक महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनविले व कंपनी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घेतली. सरंजामी मानसिकता, संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन, सहकार्‍यांकडे आश्रित म्हणून पाहण्याची दृष्टी ही भारतीय उद्योगपतींची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्या सर्वांना छेद देणारे वर्तन या दोन्ही उद्योगपतींचे होते. आता अशा महान उद्योगपतींबद्दल चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे, जॅक मा यांची निवृत्ती. 

 जॅक मा यांचे जीवन प्रचंड अपयशांनी भरलेले

अलिबाबा या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी वर्षभरापूर्वी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करत ते नुकतेच निवृत्त झाले. अलिबाबा ही कंपनी आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत आहे. अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशापेक्षा चीनमधील कम्युनिस्ट राजवटीची व्यवस्था आणि त्यांच्या पारंपरिक उत्पादनक्षम बाजारपेठेचा पगडा या पार्श्वभूमीवर जॅक मा यांनी अलिबाबाच्या रूपाने उभे केलेले साम्राज्य विलक्षण वेगळे ठरते. एक शिक्षक असणार्‍या जॅक मा यांनी शुन्यातून अलिबाबाची सुरुवात करत केवळ दोन दशकात कंपनीचा व्याप चारशे अब्ज डॉलरपर्यंत नेला. कंपनीचा व्यापही बहुतेक सर्व देशांत पोहोचला आहे. त्यामुळे, चीनमधील सर्वांत लोकप्रिय ‘व्हीआयपीं’मध्ये त्यांची गणना होते. या यशाच्या टप्प्यावर असतानाच त्यांनी कंपनीतून ‘एक्झिट’ जाहीर केली. ‘तुम्ही तुमच्या विशीतील आयुष्य शिकण्यासाठी घालवा, तिशी-चाळीशीमध्ये धोके स्वीकारा आणि पन्नाशीनंतर ज्या गोष्टी उत्तम साधतात, त्या गोष्टींसाठी जगा,’ हा सल्ला ते नेहमी द्यायचे. तोच कित्ता गिरवत ते आता पुन्हा शिक्षणक्षेत्राकडे वळत आहेत. आज ते यशाच्या सर्वाच्च शिखरावर दिसत असले तरी त्यांचे जीवन प्रचंड अपयशांनी भरलेले आहे. जॅक मा यांनी आपला जीवनस्तर उंचावण्यासाठी कित्येक ठिकाणी नोकरीचा शोध घेतला, परंतु निराशाच हाती लागली. त्यांनी केएफसीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले. तिथे जे २४ लोक इंटरव्ह्यूसाठी गेले होते त्यापैकी इतर २३ जणांची निवड झाली आणि जॅक मा यांना नकार मिळाला. त्यांनी एकदा पोलिसाच्या नोकरीसाठी देखील प्रयत्न केला पण त्यांच्या कमकुवत शरीरामुळे त्यांना नकारच मिळाला. असंख्य नकार पचवलेल्या या तरुणाला इंग्रजीचा शिक्षक म्हणून हाँगझोयू टिचर्स कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी ईकॉमर्सची संधी देणारी अलिबाबा नावाची कंपनी सुरु केली. अशा प्रकारचे ते पहिलेच व्यासपीठ होते. कॉर्पोरेट क्षेत्रात अर्थात बिझनेस टू बिझनेस व्यवहारांचे माध्यम म्हणून ही वेबसाईट आकारास आली होती. अलीबाबा आणि चाळीस चोर ही इसापनीती, पंचतंत्र धर्तीवरच्या गोष्टीतल्या पात्राचे नाव कंपनीला देण्याची कहाणीही सुरस आहे. 

नव्या पिढीचे रोल मॉडेल

जेफ बेजोस यांनी १९९४ मध्ये अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी सुरू केली. अ‍ॅमेझॉनने आपला व्यवसाय चीनमध्येही विस्तारित केला. परंतु, चीनमध्ये जॅक मा यांच्या अलिबाबाचा असा दबदबा निर्माण झाला होता की, त्यासमोर अ‍ॅमेझॉनचा टिकाव लागला नाही. अ‍ॅमेझॉनने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. अलिबाबा ग्रुप जगातील २४० देशांत ई-कॉमर्स सेवा देतो. यावरुन अलिबाबाचा जागतिक पसारा आपणास लक्षात येतो. जॅक मा यांच्या गगनभरारीचे रहस्य त्यांच्या विचारप्रक्रियेत आहे. इंटरनेट या माध्यमाची ताकद त्यांनी इतरांआधी ओळखली. स्वत: तंत्रज्ञान किंवा व्यापाराचे जाणकार नसतानाही त्यांनी खरेदी आणि विक्री करणार्‍यांना इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणले. कंपनीच्या कक्षा रुंदावताना अनेक छोट्या कंपन्यांना हाताशी घेतले. केवळ एका वस्तू किंवा सेवेपुरते मर्यादित न राहता बहुढंगी होण्याचा जॅक यांचा विचार पूर्ण विचाराअंती झाला होता. ५४ वयाचे जॅक मा म्हणतात, जग फार मोठे आहे आणि मी अजूनही तरुण आहे. म्हणून मला नवीन काही करायची इच्छा आहे. बिल गेट्स यांचा दाखला देत, मी सर्वांत श्रीमंत होऊ शकत नाही पण मी लवकर निवृत्त होऊ शकतो. शिक्षण हे क्षेत्र असे आहे जिथे मी सीईओपेक्षाही जास्त चांगले काम करू शकतो. निवृत्ती म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आज चीनला आपण आपला शत्रू मानतो, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी चळवळ उभे करतो मात्र याच चीनमधील जॅक मा हे जगातील तरुणांचे हिरो आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणारे आणि मार्गदर्शन करणारे मा हे नव्या पिढीचे रोल मॉडेल आहेत.

Post a Comment

Designed By Blogger