भाजपाच्या मेगाभरतीमुळे युतीचे भवितव्य धोक्यात!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, हा कळीचा प्रश्न बनला आहे. येत्या दोन-तिन दिवसात निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना अजूनही युतीचा तिढा कायम आहे. २०१४ मध्ये एकूण २८८ जागांसाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढले होते. भाजपने तेव्हा १२२ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा वगळून मित्र पक्षांना १८ जागा सोडत उर्वरीत जागांवर फिफ्टी-फिफ्टीचा फॉम्यूला सेनेने रेटून धरला आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या भाजपातील मेगाभरतीमुळे हे गणित बिघडले आहे. भाजपाने शिवसेनेपुढे १०६ जागांचा प्रस्ताव ठेवल्याने दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होवून युतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. भाजपचे आमदार जास्त असल्याने, जादा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका भाजपाची आहे. मात्र, शिवसेनेकडून थेट आक्रमक मांडणी सध्यातरी केली जात नसून अमित शहा, फडणवीस आणि माझ्यामध्ये पूर्वी झालेल्या चर्चेनुसारच युतीचे जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. असे असले तरी गेल्या निवडणुकीत शिवसेना बेसावध होती. भाजपने ज्या प्रमाणे सर्व मतदारसंघांत तयारी केली आहे, तशीच तयारी शिवसेनेनेही आता केली आहे.


युतीचे गणित किचकट 

२०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान युती होईल-होईल म्हणत दोघांनी एकमेकांपासून घटस्पोट घेतला. (सत्तेसाठी नंतर दोन्ही एकत्र आले, हा भाग वेगळा) यंदा काहीसे हेच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर भाजपाचा आत्मविश्‍वास प्रचंड वाढला आहे तर विरोधपक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. लोकसभेची पुनर्रावृत्ती विधानसभेतही करण्यासाठी भाजपाने विरोधी पक्षांची तोडफोड करत अनेक मातब्बर नेत्यांना भाजपात आणले. सध्या राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय वार्‍यांची ही दिशा ओळखून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सातत्याने युतीचे भाषा बोलत आहे. अगदी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेत उध्दव ठाकरेंनी युतीची घोषणाही करुन टाकली. याबाबत भाजपाचे दिल्लीश्‍वर काही बोलत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील युती होईलच, असे प्रत्येक भाषणात ठासून सांगत आहेत मात्र दुसरीकडे भाजपात जोरदार इनकमिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत मेगाभरती झाल्याने दोन्ही पक्षांत इच्छूकांची मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळेच युतीचे गणित किचकट बनले आहे. 

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था

दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडण्यासाठी डावपेच खेळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युती झाल्यास, अनेक मतदारसंघांत बंडखोरी व नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढल्यास, तिरंगी लढतीत विरोधी पक्षांना काही जागा आंदण दिल्यासारखे होईल. अशा पेचात अडकलेले दोन्ही पक्षांचे नेते युतीचे जागा वाटप हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीतच जाहीर होण्याची शक्यता आहे. युती झाल्यास, दोन्ही पक्षांतील इच्छुकांची नाराजी उफाळून येईल, याची जाणीव नेत्यांना आहे. दुसरीकडे आयारामांच्या विरोधात दोन्ही पक्षांतील निष्ठावंत नाराजी जाहीरपणे व्यक्त करीत आहेत, ही देखील मोठी डोकंदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा करताना, विधानसभेला युती राहील व दोन्ही पक्षांना समान जागा दिल्या जातील, हे ठाकरे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून वदवून घेतले होते. त्यामुळे मित्र पक्षांच्या १८ जागा वगळल्या तरी, भाजप व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी १३५ जागा येतात. मात्र हीच मोठी अडचण आहे. समान जागा वाटप म्हणजे दोन्ही पक्षांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडून आणि मित्र पक्षांना द्यायच्या १८ जागा सोडून उरलेल्या जागांचे समान वाटप आहे. या फॉम्यूल्याचा विचार केल्यास भाजपाचे सध्या असलेले १२२ आमदार, शिवसेनेचे ६३ आमदार आणि मित्रपक्षांच्या १८ जागा याची बेरीज २०३ होते, एकूण २८८ जागांमधून २०३ वजा केले तर उरतात ८५ जागा. या ८५ जागांचे निम्मे केले तर ४३ जागा होतात. आता यातील भाजपाच्या वाट्याला १२२ आणि ४३ म्हणजेच १६५ आणि शिवसेनेच्या ६३ आणि ४३ अशा १०६ जागा होतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणार्‍या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरणार, त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत साशंकता वाटते. 

शिवसेना किती पडती भूमिका घेणार?

युतीत आणखीही छोटे घटक पक्ष आहेत. त्यात विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला ४ जागा सोडण्यात येणार आहेत. शिवाय रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षासोबत चर्चा सुरू आहे. मात्र या तिन्ही पक्षांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्यास नकार दिला आहे. यामुळे जागा वाटप निश्‍चित होत नाही, तोपर्यंत तिढा सुटणार नाही. दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत अद्याप तरी सकारात्मक भाष्य करत असले तरी जी परिस्थिती निर्माण होतेय ते वेगळचे सांगत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात युतीचे सरकार असतानाही भाजपच्या विरोधात शिवसेना आक्रमक होती. कधी न दिलेले राजीमाने खिशात घेवून फिरत स्वतंत्र लढण्याची भाषा सेना नेत्यांकडून बोलली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेचा आवाज बसला आहे. गेल्या वेळी शिवसेनेने भाजपला जागा वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने २५ वर्षांची युती तोडली. आता निम्म्या जागाही शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेना किती पडती भूमिका घेणार, यावरच युती टिकणे अवलंबून राहील.

Post a Comment

Designed By Blogger