टेनिस, ग्रँडस्लॅम आणि विल्यम्स भगिनी हे एक समीकरण मानले जाते. यातील सेरेना विल्यम्सने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २४ ग्रँडस्लॅम पटकविले आहे. अशा सेरेनाला कुणी नवखा खेळाडू पराभूत करु शकतो याची कल्पनाही करवत नाही. मात्र, कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू या नव्या युवराज्ञीने हा भीमपराक्रम करुन दाखविला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीच्या सामन्यात बियांकाने सेरेनाला धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. याच स्पर्धेत पुरुष एकेरीत गेल्या आठवड्यात भारताच्या सुमित नागल याने दमदार खेळ करून स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. यात सुमितचा पराभव झाला मात्र, हिंदी भाषेत एक प्रसिध्द डायलॉग आहे, ‘तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है बाजारमें’ यानुसार सर्वत्र सुमितच्या खेळाचे कौतुक झाले. अगदी खुद्द फेडररने सुमिला उज्ज्वल भवितव्य असल्याचे नमूद केले. बियांका, सुमित हे नाव फारसे कुणाला माहित नाही मात्र आता टेनिसचे नवे बादशहा म्हणून त्यांनी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.
टेनिस भारतीय जातकुळीचा खेळच नाही
टेनिस म्हटले म्हणजे स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रास, मार्टिना हिंगिस, मारिया शारापॉव्ह, स्वेत्लाना कुझेन्सॉव, ऑण्डी रॉकडीक , मार्टिना नवराल्टीवा, जिमी कॉनर्स, विनस विल्यम्स, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, सेरेना विल्यम्स यांची नावे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. भारतात लिएंडर पेस, महेश भूपति, सानिया मिर्जा, सोमदेव देव वर्मन या खेळाला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत टेनिस हा आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी, असे अलिखित समीकरणच झाले होते. या खेळासाठी लागणारी प्रचंड ताकद, अमर्याद दमसास ही कामे करावी परदेशातल्या अरदांड खेळाडूंनी करावीत आपण आपले क्रिकेट खेळावे. टेनिस, फुटबॉल, अॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसे जाऊ नये, असे चित्र अनेक वर्षे कायम होते. पेस व भुपति यांनी सिंगल्समधील तगडी स्पर्धा पाहून आपली मोर्चा डबल्सकडे वळविला. सानियाने एकाकी खिंड लढवली. सानिया नंतर कोण? यावर अनेकवेळा चर्चा झाली. गेल्या आठवड्यात याचे उत्तर मिळाले.
बियांका आंद्रेस्कू आणि सुमित नागल
ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यू.एस. ओपन या चार स्पर्धांना ग्रँडस्लॅम म्हणतात. यापैकी यू.एस. ओपन स्पर्धेतून भारताच्या सुमित नागलने पदार्पण केले. पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि समोर रॉजर फेडरर असूनही या पठ्ठ्याने दमदार खेळी केली. पहिल्याच स्पर्धेत रॉजर फेडररसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळायला मिळणे हे नशिब असते. यात सुमितने २० वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या फेडररला तगडी झुंज दिली. सुमित नागलचे वय अवघे २२ वर्ष आहे. ग्रँड स्लॅम सिंगल स्पर्धेत खेळणारा तो पाचवा भारतीय आहे. जागतिक दर्जावर तो १९० व्या क्रमांकावर येतो. यामुळे तो पराभूत झाल्यानंतरही टेनिस जगतात त्याची दखल घेतली गेली. फेडररने २००१ मध्ये अमेरिकेचा महान टेनिसपटू पीट सॅम्प्रासवर मात केली आणि टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्या वेळी फेडरर १९ वर्षांचा होता. विशेष म्हणजे विंबल्डनमध्ये सलग ३१ सामने जिंकणार्या सॅम्प्रासचे आव्हान त्याने मोडीत काढले होते. त्यानंतर फेडररने मागे वळून पाहिले नाही. त्याने एकामागून एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. २१व्या वर्षी त्याने विंबल्डन स्पर्धा जिंकली. आता हाच फेडरर सुमितमध्ये स्वत:ला बघत असेल. सुमितसारखीच सर्वाधिक चर्चेत असलेली अजून एक खेळाडू म्हणजे बियंका. प्रतिस्पर्धी खेळाडूला घरच्या चाहत्यांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा, कारकीर्दीतील पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी आणि समोर सेरेना विल्यम्ससारखी अनुभवी प्रतिद्वंद्वी असतानाही कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका डगमगली नाही. उलट यातून प्रेरणा घेत तिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवघ्या १९व्या वर्षी कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी बियंका (१९ वर्षे, ८४ दिवस) ही सर्वात युवा टेनिसपटू ठरली आहे. यापूर्वी मारिया शारापोव्हाने (१९ वर्षे, १३२ दिवस) २००६ मध्ये अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. बियांका हिला दोन आठवड्यांपूर्वी कोणीही फारसे ओळखत नव्हते. गतवर्षी अमेरिकन टेनिस स्पर्धेस पात्रही न ठरलेली १९ वर्षीय बियांका विजेती होईल असे कोणास वाटले नव्हते, पण तिने सेरेना विल्यम्सला अगदी सहज हरवून अमेरिकन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
नव्या पिढीचा बादशहा
टेनिसमधील सर्वोच्च समजल्या जाणार्या ग्रँडस्लॅम स्पर्धांना बियांका चांगलीच नवीन आहे. तिला विजेतेपदाच्या करंडकाची कोणती बाजू समोर असावी हेही माहिती नव्हते. विजेतेपदाचा स्वीकार केल्यावर या कॅनडाच्या नव्या स्टारला स्पर्धा पदाधिकार्यांनी करंडक कसा धरून उंचावला जातो, हे दाखवले. अर्थात गतवर्षी स्पर्धेस पात्र न ठरलेल्या यापूर्वी कधीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी न खेळलेल्या मुलीकडून काय अपेक्षा बाळगणार? यामुळे बियांकच्या यशाला प्रचंड महत्त्व आहे. सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये पहिल्यांदा अमेरिका ओपनचा किताब जिंकला होता तेव्हा बियांका आंद्रेस्कूचा जन्मही झाला नव्हता. १६ जून २००० रोजी जन्मलेली बियांका कळायला लागल्यापासून सेरेनाचा टेनिस कोर्टवरील झंझावात बघूनच मोठी झाली. याच ३८ वर्षीय सेरेनाविरुद्ध खेळण्याचे स्वप्न १९ वर्षीय बियांकाने पाहिले होते. अमेरिका ओपनच्या किताबी लढतीत तिचे हे स्वप्न केवळ सत्यात उतरले नाही, तर तिने चक्क जेतेपदाला गवसणी घालून इतिहास घडविला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. सुमित, बियांका यांचा खेळ पाहून टेनिसचे भवितव्य योग्य हातांमध्ये सुरक्षित आहे, असे वाटते. कारण सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली आहे. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रॉजर फेडरर, नदाल यांच्यासारख्या सुपरस्टार्संना दुखापतींनी घेरले आहे. नदालच्या सुपरफास्ट कारकिर्दीला दुखर्या गुडघ्याने संथ केले आहे. तेव्हा टेनिसप्रेमींना आता नव्या पिढीचा बादशहा कोण? या प्रश्नाचे उत्तर बियंका, सुमितसारख्या खेळाडूंनी सोडवले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
Post a Comment