जलव्यवस्थापन बदला

मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रात नाशिकला पावसाने झोडपून काढले आहे. जळगाव, धुळ्यातही पाऊस सुरु आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि पैठण तालुक्यात पूरस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून यासाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमची मदत घेण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बर्‍याच भागाला पावसाने झोडपले हे खरे असले तरी धरणे, तलाव क्षेत्र भरले असून नद्या खळखडून वाहू लागल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे. आधीच गत चार-पाच वर्ष संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात दुष्काळाचे चटके सहन करत असल्याने पाणी टंचाईपेक्षा हे जलसंकट वाईट नाही, अशी लोकभावना आहे.


पाऊस नैसर्गिक पण पूर मानवनिर्मित

हवामानाचा लहरीपणा हा सध्या जागतिक चिंतनाचा विषय ठरत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक प्रगत देशांनी काम सुरु केले आहे. या लहरीपणाचा फटका मोठ्याप्रमाणात भारतालाही बसत असला तरी आपण अजूनही याकडे गांभीर्याने पाहतच नाही. भारत पाण्यासाठी दरवर्षी मान्सूनदरम्यान पडणार्‍या मुसळधार पावसावर अवलंबून असतो. भारताच्या विविध भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या वेळी दाखल होतो. पाऊस लवकर दाखल झाला किंवा उशिरा आला तरी त्याचे भयंकर परिणाम शेतकर्‍यांवर होतात. जर नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरी भागांमध्ये त्याचे मोठे परिणाम होतात. याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास गेल्या महिन्यात जेंव्हा मुंबईत प्रचंड पाऊस पडत होता तेंव्हा चेन्नईमध्ये भयानक पाणी टंचाई निर्माण झाली होती. अनेकवेळा यास ग्लोबल वॉर्मिंग चे कारण सांगितले जाते. केरळमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हा तेथील भयावह चित्र आपण दूरचित्रवाणीवर पाहिलेच आहे. त्यावेळी प्रसिध्द पर्यावरणतज्ञ माधव गाडगील यांनी चेतावणी दिली होती की अशीच परिस्थिती गोवा व महाराष्ट्रातही उद्भवणार आहे. मात्र त्याकडे गांर्भीयाने पाहिले गेले नाही. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे केरळमधील पाऊस नैसर्गिक होता; पण पूर मानवनिर्मित होता, असे ते म्हणाले होते. यावरुन महाराष्ट्र शासनाने व आपणही कोणताच बोध न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. 

महाराष्ट्रातील परिस्थिती बोलकी

आज महाराष्ट्रातील परिस्थिती प्रचंड बोलकी आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजविला आहे. येथील सर्व रस्तेही बंद झाल्याने दूध आणि भाजीपाला येऊ शकत नाही. त्यामुळे बाजारपेठावर देखील परिणाम झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. त्या उलट मराठवाड्यात कोठे पाऊस तर कोठे कोरडे आहे. बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. लातुरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. राज्यात सगळीकडे पाणीच पाणी असताना बीड आणि लातुरकरांच्या डोळ्यांत मात्र पाऊस नसल्याने पाणी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव अद्याप कोरडेच आहेत. सोलापूर जिल्ह्यातही पावसाने बर्‍याच भागात दडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे व नंदूरबार जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असतांना जळगावमध्ये मात्र पुरेसा पाऊस नसल्याने बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. नाशिकमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने याचा वाहतुकीला मोठा तडखा बसला असून मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा थरार आठवला तरी अंगावर काटे उभे राहतात. पावसामुळे शेती, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचीही प्रचंड हानी झाली आहे. गावागावातील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने शहरांचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या तडाख्याने सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले आणि हाहाकार उडाला, त्यानंतर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वारंवार मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवावा लागला. अतिवृष्टीचा तडाखा वाहतुकीला बसला आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

आपत्ती व्यवस्थापनाची दिशा बदलावी लागणार

पावसाचा हा लहरीपणा व विरोधाभास केवळ चिंतेचा विषय नसून चिंतनाचाही आहे. नैसर्गिक कोप झाला की, आपण हतबल होऊन देवाचा धावा करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. त्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करतो; पण कोप रोखू शकत नाही. विज्ञानाला अजून तरी ते जमलेले नाही. पाऊस पडणार कि नाही, हेच हवामान खाते अजून ठामपणे सांगू शकत नाही, तेथे पाऊस किती कोसळणार? पूर येणार का? या गोष्टी तरी ते कसे सांगू शकेल? यासाठी जल व्यवस्थापन बदलण्याची आता वेळ आलेली आहे. हवामान बदलातील गतिमानतेमुळे हे बदलणे आवश्यक बनले आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ या अतिरेकी संकटावर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची दिशा देखील बदलावी लागणार आहे. दरवर्षी नाशिक, कोकणसह अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस पडतो मात्र तो त्याच वेगाने वाहून देखील जातो. त्याचा योग्य साठा कसा करता येईल का? याचा अभ्यास करुन महापुराचे पाणी उपसा पद्धतीने उचलून पठारावरील दुष्काळी प्रदेशाकडे वळवून भू गर्भात आणि भू पृ×ष्ठावर साठवणूक केल्यास संरक्षित सिंचन व्यवस्था होऊ शकते. महाराष्ट्रातल्या ४७ उपसा प्रकल्प तोट्यात असल्याची अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे, ऐन महापुरामध्येच उपसा सिंचन प्रकल्पाचे सर्व पंप व मोटार पाण्यात बुडतात त्यामुळे ते बंद राहतात. याव्यतिरिक्त मृत नदी खोर्‍यातील गाळ काढून नद्या जिवंत करणे आवश्यक आहे. तसेच धरणे गाळाने भरण्याच्या स्थितीवर कशी मात करता येईल, यासह लहान धरणांची उंची वाढवून अतिरिक्त जल, उपसा पद्धतीने दुष्काळी प्रदेशाकडे घेऊन जाता येईल यावर अभ्यास व संशोधन झाले पाहिजे. जशा नद्या-जोड प्रकल्प राबविले जातात, त्याप्रमाणे तलाव व सरोवरे एकमेकाला जोडली गेली पाहिजे. आज ओढवलेले हे जलसंकट मानवनिर्मितच आहे यामुळे यावर मात करणे आपल्याच हाती आहे. जुने व पारंपारिक ठोकताळे आणि पध्दतींमध्ये सुधारणा करुन जलव्यवस्थापनाची दिशा वेळीच निश्‍चित न केल्यास भविष्यात होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी करुन ठेवावी लागेल. 

Post a Comment

Designed By Blogger