झंझावाती पर्वाची अखेर

अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणार्‍या व केवळ भारतीय राजकारणावरच नव्हे तर जागतिक पातळीवर स्वत:ची छाप सोडणार्‍या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भाजपाच्या ‘फायरब्रँड नेत्या’ म्हणून त्यांची ओळख होती. धाडसी निर्णय आणि सडेतोड प्रत्युत्तरासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमांनी परराष्ट्रमंत्री असताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री, उत्कृष्ट संसदपटू आणि महिलांच्या आयडॉल असणार्‍या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. ‘ट्विटर’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाला मानवी चेहरा दिला. सुषमा यांच्या निधनाने एका झंझावाती पर्वाची अखेर झाली आहे. 

इंदिरा गांधीनंतर दुसर्‍या महिला नेत्या

७०च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झालेल्या स्वराज त्यांच्या वक्तृत्वशैलीने ओळखल्या जायच्या. सुरुवातीपासूनच संघ आणि भाजपशी त्या जोडलेल्या होत्या. संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंडीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिलीही केली. सन १९७७ पासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. यानंतर त्यांना चौधरी देवीलालच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणार्‍या हरियाणातील सर्वांत तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. स्वराज यांच्या नावे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही आहे. १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. २०००-२००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसर्‍यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून चार लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्या परराष्ट्रमंत्री बनल्या. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीनंतर या पदावर घेणार्‍या त्या दुसर्‍या महिला नेत्या होत्या. 

संसद व संसदेबाहेर आंतरराष्ट्रीयस्तरावरही भाषणे गाजली

सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणार्‍या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सुषमा यांचे वकृत्व अनुभवणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. सन २००८ आणि २०१० मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत. संसदेतील व संसदेबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची भाषणे कायमच चर्चेचा विषय ठरली. अबूधाबीत झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेत त्यांनी केलेले भाषण प्रचंड गाजले होते. पुरुषधार्जिण्या, धार्मिक अतिरेकासाठी ओळखल्या जाणार्‍या देश प्रतिनिधींच्या गराड्यात भारतीय वेशात आणि आभूषणांत स्वत:स सादर करणार्‍या सुषमा स्वराज या अन्य पुरुष प्रतिनिधींचे लहानपण दाखवून गेल्या. देशात उजव्या विचारांचे सरकार असताना पन्नास वर्षांनंतर भारताला इस्लामधार्जिण्यांच्या परिषदेत सहभागी व्हायची संधी मिळाली. सुषमांनी ही संधी अक्षरश: गाजवली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांची मुत्सद्देगिरी पाहून आर्य चाणक्यही खूश झाले असते, अशी त्यांची कारकीर्द राहिली. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, येमेनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना सहीसलामत परत आणण्यापासून इराकमध्ये अडकलेल्या ३९ नर्सना सुखरूप मायदेशी आणण्यामध्ये त्यांची मुत्सद्देगिरी दिसून आली. पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये तीन-चार वर्षे खितपत पडलेला हमीद अन्सारी भारतात परतल्यानंतर, त्याने स्वराज यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. तर, पाकिस्तानच्याच तुरुंगामध्ये असणार्‍या कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला आता पदावर नसतानाही स्वराज यांचा आधार वाटत होता. जाधव कुटुंबीयांनी जुलै महिन्यातच स्वराज यांची भेट घेतली होती. यावरुन सुषमा यांच्या विषयीचा आदर व विश्‍वास दिसून येतो. 

परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वाधिक लक्ष

याचबरोबर लीबियामध्येही त्यांनी अशाच पद्धतीने मदत केली होती. ट्विटरवर येणार्‍या प्रत्येक संदेशाला उत्तर देत कार्यवाही करण्याची त्यांची ही कार्यपद्धती या काळामध्ये खूप चर्चेत राहिली. परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्वराज यांच्या काळामध्ये पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील देशांबरोबर भारताचे संबंध चांगल्या पद्धतीने सुधारले. त्याचबरोबर इराणबरोबरील संबंधांमध्येही प्रगती झाली. अमेरिकेबरोबरील सामरिक भागीदारी वाढत गेली. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्याबरोबरील त्यांचे मित्रत्वाचे संबंधही सर्वश्रुत होते. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याबरोबरील संबंधांमुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती कायम नियंत्रणात राहिली. याचे श्रेय सुषमा स्वराज यांनाच जाते. परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वाधिक लक्ष देणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या काळामध्येही स्वराज यांनी ठसा उठवला, हीच गोष्ट त्यांचे वेगळेपण सांगणारी आहे. राजकीय प्रवासात कुठे थांबायचे, याची जाणीव देखील त्यांना होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी मिळणारच होती मात्र त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे ती नाकारली तरीही त्या पक्षाच्या कामकाजात सक्रिय राहिल्या, यावरून त्यांची पक्षाप्रती आत्मियता दिसून येते. त्यांच्या अकाली निधनामुळे केवळ भाजपाचीच नव्हे तर भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली आहे. आज त्या आपल्यात नसल्या तरी आदर्श राजकारणी व मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री कसा असावा, याची मापदंड आखून दिला आहे. त्यांच्या या मार्गावरुन चालणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

Post a Comment

Designed By Blogger