जळगाव हे छोटेसे शहर पण शहरात विविध समस्या, अडचणी बेसुमारपणे वाढत आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा करावा लागेल. शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. खून, घरफोड्या, चोर्या, दरोडे, खुनी हल्ले यांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. दिवसाढवळ्या घडफोड्या करण्यापासून महाविद्यालयात खून होण्यापर्यंत परिस्थिती बिघडली आहे. दोन राज्यांच्या सीमांपर्यंत विस्तारलेल्या जळगाव जिल्ह्याचा गुन्हेगारीबाबतचा इतीहास लाजीरवाणा आहे. अगदी जगभर गाजलेल्या वासनाकांडापासून सीमी, इसीससाख्या दहशतवादी संघटनांपर्यंत जळगावचे कनेक्शन वेळोवेळी समोर आले आहे. कोणाचा कोणाला धाक नाही. कोणाचे या घटनांवर नियंत्रण नाही. पोलिसांची कसली भीतीच गुन्हेगारांना उरलेली नाही. आपल्याकडे गुन्हे घडल्यावर सारी यंत्रणा धावते पण गुन्हे रोखणारी, ते घडूच नयेत यासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा पुरेशी सक्षम नाही, अशी अवस्था जळगाव पोलीस दलाची झाली आहे.
पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी
जळगाव शहराच्या कक्षा रुंदावत असून, हा वेग गेल्या दहावर्षात झपाट्याने वाढला. शहरीकरणामुळे शहराची लाईफस्टाईल बदलली; अर्थात याचा परिणाम गुन्हेगारी घटनांवर देखील पडला. त्याआधी म्हणजे साधारणत: २०-२५ वर्षांपुर्वीचा गँगवॉरचा काळाडाग पुसला गेला नसला तरी अवघ्या सात-आठ वर्षांत घडलेल्या घटनांमुळे जळगाव पोलीस दलाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत. यातप्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास काही वर्षांपुर्वीचा आयसीआयसीआय बँकेवरील दरोडा, भादली हत्याकांड, निंबोल बँक दरोडा, भडगाव येथील चिमुकल्याचा खून व त्यानंतर त्याच्या आई वडीलानी केलेली आत्महत्या, अशी असंख्य उदाहरणे पुरेशी आहेत. आतापर्यंत घडलेल्या अनेक गुन्ह्यातील आरोपी पकडले गेले नाहीत, हे नव्याने सांगायलाच नको! पोलीस दलाची या निष्क्रीयतेमुळे शहरासह जिल्हाभरात चोर व दरोडेखोरांनी उच्छाद मांडला आहे. यासाठी गेल्या तिन महिन्यांची आकडेवारी बोलकी ठरते. जून, जुलै व ऑगस्ट या अवघ्या अडीच महिन्यात शहरात तब्बल ५४ घरफोड्या झाल्या आहेत तर जिल्ह्यात याची संख्या १०० च्यावर निश्चितच असेल. सर्वसामान्य नागरिकांचे घर तर सोडाच मात्र विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा न्यायालयातील कार्यालय, पोलीस अधिकार्यांचे घरदेखील यातून सुटलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मू.जे.महाविद्यालयच्या आवारात भरदिवसा विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर पोलीस दल अलर्ट झाले, असा दिखावा करण्यात आला मात्र शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पाहता पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराब उगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.
अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे, ही मोठी समस्या
अवैध धंद्याच्या कनेक्शनचा ठपका ठेवलेल्या, कामात हलगर्जीपणा करणार्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसाठी डॉ.उगले यांनी एक कोर्स देखील घेतला होता, याचा काय व किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र त्याच्या मुळाशी जाण्यास ते अपयशी ठरले हे तेवढेच सत्य आहे. आज शहरात गुन्हेगारी वाढली आहे मात्र गुन्हेगारांचे केंद्र किंवा त्यांची उगमस्थानांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांकडील गुन्हेगारांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, चोरी, प्रेमप्रकरण, मुलींना पळवून नेणे व छेडखानी यासारख्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाच मोठा सहभाग आहे. दोन वर्षात ११ अल्पवयीन मुलांवर बलात्कार, छेडखानीचा १४ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही ४ मुलांचा सहभाग आढळून आला आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे, ही मोठी समस्या बनली आहे. त्यात, बाल गुन्हेगारी ही समस्या हळूहळू आता उग्र रूप धारण करू पाहते आहे. बालवयातील कोवळी स्वप्न पाहण्याच्या वयात ही मुलं दरोडा, बलात्कार, खून, चेन स्नॅचिंग, चोरी, मोटार वाहन चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी झाली झाल्याचे पोलिसांचेचे आकडे म्हणतात.
गुन्हेगारीचे कनेक्शन म्हणजे ‘वाळू’
पुर्वी शनीपेठेत केंद्रीत असलेले टोळके आता हरीविठ्ठल नगर, तांबापूरा, कांचननगर, जैनाबाद, जुने जळगाव आदी भागात मोठ्याप्रमाणात दिसून येतात. मू.जे.महाविद्यालय परिसर, सागरपार्क, बाहेती कॉलेज परिसर ही त्यांचे प्रमुख अड्डे बनली आहेत. तरुण व अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचे ‘कॉमन कनेक्शन’ म्हणजे ‘वाळू’ शहरासह जिल्ह्यातील वाळू माफिया तरुणांचा वापर करुन घेतात. त्यांना मिळणारा ईझी मनी हा गुन्हेगारी विश्वातील पहिले पाऊल ठरते. यात नैसर्गिक कुतूहल असलेली मुले सहजतेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांच्या सान्निध्यात येतात. पोलिसांनी पकडले तर मुलांना शिक्षा होत नाही. यात सज्ञान गुन्हेगारांचे फावते. बरीच मुले फक्त मौजमजेसाठी चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. बदलती लाइफस्टाइल, महागड्या गॅझेटचे आकर्षण, वाहनांची हौस अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. अल्पवयीन मुले लागलीच प्रभावीखाली येतात. मोठ्यांकडून मिळणार्या चुकींच्या मार्गदर्शनामुळेही गुन्हेगारी वाढते. प्रत्येक मुलाची मानसिकता वेगळी असून, त्याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
स्मार्ट फोन व त्यावरी इंटरनेटचा मोठा वाटा
या घटनांमध्ये वाढ होण्यामागे स्मार्ट फोन व त्यावरी इंटरनेटचा मोठा वाटा आहे. इंटरनेटवर हिंसक बाबी, अफेयर, कट-कारस्थान याचेच धडे घेतल्यानंतर तो तसा प्रयत्न नक्कीच करून पाहतो. अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या भविष्यात सुप्त ज्वालामुखीप्रमाणे ठरू शकते. अल्पवयीन मुले अगदी तरबेज वा मुरलेल्या गुन्हेगाराप्रमाणे समाजविघातक गुन्हे वा अपराध का करू लागली? त्यांना कायद्याचा धाक वाटेनासा झाला का? याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी पोलिसांसह इतरांनी देखील घ्यायला हवी. गुन्हे करून, चोर्या मार्या करून गुजराण करणारा, चैन करणारा वर्ग वाढतो आहे. दहशत माजवून तो गुन्हेगारी करतो आहे. खरे तर पोलिसांनी सारे मोडून काढले पाहिजे. ते होताना दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारी कमी होत नाही. यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी हे पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल. कोणतेही युध्द जिंकण्यास किंवा हरण्यास सेनापतीच जबाबदार मानला जातो मग चुक कुणाचीही असो, याप्रमाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास पोलीस अधिक्षकच जबाबदार आहे. हा डाग पुसण्यासाठी त्यांच्याकडून आता ठोस उपाययोजनांची केवळ आखणीच नव्हे तर काटेकार अंमलबजावणीची अपेक्षा आहे.
Post a Comment