मनुष्य रुपातील देवदूत

कोल्हापूर, सांगलीसह गुजरात आणि केरळ मधील महापूरत बचावकार्यात प्राणपणाला लावून लष्कर, नौदल, पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी पूरग्रस्त महिला, मुलांना वाचवले. अतिशय भयानक संकटातून नागरिकांची सुटका केली. याबद्दल सर्वांचे प्राण वाचवणार्‍या जवानांचे आभार मानणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपत्ती ही कुठे ना कुठे तरी कोसळत असते. अशी आपत्ती कोसळूच नये, अशी आपण कितीही अपेक्षा केली तरी अशा आपत्तीपासून कुठलाही राज्य किंवा देश मुक्त नाही. प्रश्न आहे तो अशा आपत्तीत कमीतकमी हानी होईल व अशी आपत्ती कोसळलीच तर तत्परतेने प्रभावी आपत्ती व्यवस्थापन अमलात आणण्याचा. प्रगत देशात हे आपत्ती व्यवस्थापन कुठल्याही मोठया संकटानंतर परिणामकारकपणे राबवले जाते व आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा दिला जातो. भारतात जेंव्हा कधीही अशी आपत्ती येते तेंव्हा भारतीय सैन्यदलासह एनडीआरएफचे जवान धावून येतात. याची प्रचिती कोल्हापूर, सांगली, गुजरात, केरळसह विविध ठिकाणी येत आहे.


सर्वात आधी धावून येतात भारतील जवान

महाराष्ट्रासह अन्य काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पुरामुळे गावांसह शहरे पुर्णपणे पाण्याखाली बुडली आहेत. भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती. आपल्याला तोंड द्यावे लागते. आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट. यात मोठ्या प्रमाणत जीवित आणि वित्तहानी होते. कोणत्याही आपत्तीनंतर ताबडतोब मदतीचा ओघ सुरू होतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळे झटत असतात. जखमींची शुश्रूषा आणि रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या जातात. यात सर्वात आधी धावून येतात ते भारतील जवान! जे यंदाही हजारो नागरिकांचे जीव वाचवितांना धडपडत आहेत. 

एनडीआरएफ व लष्कराच्या जवानांची जीवाची बाजी

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांवर अनेकवेळा नैसर्गिक संकटे आली. पुण्यात १२ जुलै १९६१मध्ये पानशेत धरण फुटून जलप्रलय झाला आणि एकच हाहाकार उडाला. या धरणफुटीत खूप प्राणहानी व वित्तहानी झाली. मराठवाडयात २० वर्षापूर्वी किल्लारी येथे मोठा भूकंप होऊन जीवितहानी झाली. काही वर्षापूर्वी आंध्रमध्ये मोठे वादळ, त्सुनामी आल्याने समुद्राच्या लाटा किनार्‍याच्या आत खोलवर येऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले. मुंबईत २५ आणि २६ जुलैला जी अभूतपूर्व अतिवृष्टी झाली त्यातही बरीच प्राणहानी झाली व मुंबईचे सारे व्यवहार दोन दिवस ठप्प होते. या सर्व संकटांमध्ये एनडीआरएफ व लष्कराच्या जवानांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत हजारों नागरिकांचे प्राण वाचविले. आंध्र प्रदेशात जे वादळ झाले त्याची पूर्वसूचना हवामान खात्याने आधीच दिल्याने किनार्‍याजवळील गावांमधून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले व मोठा अनर्थ टळला. भारतीय अशा प्रकारचे हे सर्वात मोठे बचावकार्य होते. त्याचे जगभरात कौतुकही झाले. हे शिवधनुष्य भारतील सैन्य दलानेच राबविले होते. कोल्हापूर व सांगलीतील पुराच्या आधी अतिवृष्टीने मुंबईशी रस्ते, रेल्वे आणि हवाई अशा तीनही मार्गांनी संपर्क तुटला होता. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवाशी १७ तास अडकले होते. तसेच कोल्हापूरच्या महापुराच्या वेळी पुण्याहून गोव्याकडे जाणारे प्रवासीही १७ तास बसमध्येच अडकले होते. महालक्ष्मी एक्सप्रेस वागंणी स्टेशनजवळ अडकल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला धाव घ्यावी लागली. लोकांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवावे लागले.

खाकीतील देवदूत

सध्या गुजरातमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस हवालदार दोन चिमुकल्या मुलींना आपल्या खांद्यावर घेऊन पाण्यातून चालताना दिसत आहे. नेटकर्‍यांनी या हवालदाराच्या धैर्याला आणि कामगिरीला सलाम केला आहे. व्हिडिओत दिसणारे पोलीस हवालदाराचे नाव पृथ्वीराज जडेजा असल्याची माहिती समोर आली आहे.  पुराच्या पाण्यात कल्याणपूर येथील शाळेतील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. या शाळेमध्ये ४३ विद्यार्थी अडकल्याने शाळा प्रशासनाने एनडीआरएफलाही मदतीसाठी कळवले होते. मात्र पावसाचा जोर खूप असल्याने एनडीआरएफच्या तुकड्यांना तेथे पोहचण्यास उशीर होणार होता. एनडीआरएफआधी स्थानिक पोलिसांची तुकडी या ठिकाणी पोहचली. पाणी अधिक वाढण्याआधीच एक एक करत या मुलींना पूराच्या पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे ठरले. त्यावेळेस मुलींना पुराच्या पाण्यातून घेऊन जाणे शक्य नसल्याचे पोलिसांच्या तुकडीचा भाग असणार्‍या पृथ्वीराज जडेजा यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दोन्ही मुलींना आपल्या खांद्यावर बसवले आणि ते पुराच्या पाण्यातून चालू लागले. कंबरेएवढ्या पाण्यामधून खालील रस्ता दिसत नसतानाही पृथ्वीराज चालत असल्याचे व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चरही बाजूंने पुराचे पाणी असताना स्वत:चा जीव धोक्यात टाकत पृथ्वीराज यांनी या मुलींना खांद्यावर घेऊन चक्क दीड किलोमीटरची पायपीट करत त्यांना पुरातून सुखरूप बाहेर काढले. गुजरात पोलिसांनीच हा व्हिडिओ ट्विट करत पृथ्वीराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे. खाकीतील या माणसाला देवदूत नाही तर काय म्हणणार? 

जवानांच्या पाय पडल्या

पावसाने पालघर, त्र्यंबकेश्‍वरपासून थेट कोल्हापूर, सांगलीपर्यंत महापुराने थैमान घातले असून बुडालेली हजारो घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड हेच विदारक चित्र या दोन्ही शहर-जिल्ह्यांमध्ये दिसत असतांना अशा संकटात लष्कराने सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. अनेक ठिकाणी महिलांनी देवदूत म्हणून धावून येणार्‍या जवानांना राखी बांधत त्यांना ‘भारत माता की जय’च्या जयघोषात त्यांना निरोप दिला. मात्र दुसरीकडे यावर राजकीय चिखलफेक व ‘पूरपर्यटना’साठी आलेले नेतेही पाहण्याचा दुर्दव्यी योग आला. पुरग्रस्तांचा अश्यांवर जास्त संताप आले. एकीकडे जवानांच्या पाय पडल्या जात आहेत, त्यांच्या हातावर राख्या बांधल्या जात आहेत, तेव्हा दुसरीकडे राजकीय नेत्यांना शिव्या का दिल्या जात आहे, याचा राजकारण्यांनी प्रामाणिक विचार करण्याची गरज आहे. आपल्या धाडसी जवानांनी पुरातून नागरिकांची सुटका केली असली तरी आता त्यांच्या तात्पुरत्या निवार्याची, अन्नधान्याची, कपड्यालत्त्याची सोय करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.

Post a Comment

Designed By Blogger