दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानची मोठया प्रमाणावर आगपाखड सुरु आहे. भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युध्दाची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र आधीच पाकिस्तानचे खाण्याचे वांधे असतांना असा अकालतांडव म्हणजे ‘घर में नहीं हैं दाने और अम्मा चली भुनाने’, सारखी आहे. आपल्या राजकारणामुळे आणि दहशतवादाबाबतच्या दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी पडत आहे. तेथील अस्थिरता वाढत असून, लष्कराचे वर्चस्व आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. याची जाणीव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही झाल्याने याप्रकरणी त्यांनी अखेर ट्विट करुन आपली हताशा व्यक्त केली. यावरुन त्यांचा पाय किती खोलात रुतला आहे, याची कल्पना येते.


पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात दबाव वाढवण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने भारताने घेतलेल्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्याचे जे प्रयत्न केले त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९७२ मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. तर काश्मीर मुद्दा द्विराष्ट्रीय असल्याच्या आपल्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे सांगत अमेरिकेनेही पाकला तोंडघशी पाडले आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी पाठिंबा मिळवण्यासाठी चीनमध्ये गेलेे. कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मित्रपक्ष चीननेही पाकचा अपेक्षाभंग केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानने चर्चा आणि वाटाघाटींद्वारे आपसातील वाद सोडवावेत,’ असे आवाहन चीनने केल्याने पाकिस्तानची शेवटची आशा देखील मावळली. यापूर्वी या मुद्द्यावर रशियाने आपली भूमिका स्पष्ट करत भारताला आपले समर्थन दिले होते. त्यानंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली होती. 

कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्‍वास नाही

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सर्वच स्तरावर भारताला घेरण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. परंतु प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला तोंडावर पडण्याची पाळी आली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीदेखील पाकिस्तानला कोणाची साथ मिळत नसल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली आहे. जगातील देश तर सोडाच मात्र तालिबान सारख्या दहशतवादी संघटनेने देखील पाकिस्तानची साथ सोडली. याला अनेक पैलू आहेत. कारण हा अत्यंत जटील व गुंतागुतीचा विषय आहे. अफगाणिस्तानमध्ये अराजकता पसरविण्यासाठी आणि अमेरिकी सैनिकांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच तालिबानचा वापर केला आहे. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये सरकार आणि अमेरिकी सैनिकांविरुद्ध हिंसाचार करणार्‍या तालिबानच्या गटाला पाठींबा देऊन त्यांना आश्रय द्यायचा आणि दुसरीकडे तालिबानच्या वेगळ्या गटाविरुद्ध कारवाई करायची व गरज पडल्यास अमेरिकेची मदत घ्यायची, तिसरीकडे भारतविरोधी दहशतवादी गटांना उत्तेजन द्यायचे आणि त्याच वेळी अमेरिकेकडे शस्त्रसामग्रीची मागणी करणे ज्याचा वापर भारताविरोध करता येईल, अशी तारेवरची कसरत पाकिस्तान करत असल्याचे आता संपूर्ण जगासमोर आले आहे. यामुळे जगातील कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्‍वास राहिलेला नाही. 

मोदींच्या विदेश दौऱ्याचे फलित! 

हा विषय समजून घेण्यासाठी अजून खोलात शिरल्यास लक्षात येते की, तालिबानला पाकिस्ताननेच तयार केले आहे. खरंतर काश्मीर प्रश्नावर तालिबानची भूमिका पाकिस्तानसाठी एक प्रकारचा झटकाच आहे. तालिबानने काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानला काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याच्या मोबदल्यात पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप हवा आहे. तालिबानला सुद्धा अमेरिकेबरोबर करार करण्याची इच्छा असून काश्मीर विषयामुळे ही प्रक्रिया अधिक जटील होऊ शकते असे वाटल्यामुळेच त्यांनी हे स्टेटमेंट जारी केले असण्याची शक्यता आहे. येथे शक्यता कोणतीही असली तरी एकाकी फक्त पाकिस्तानच पडला आहे, हेच अंतिम सत्य आहे. चीन स्वत:च्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा अधून मधून वापर करुन घेतो मात्र आता काश्मीर प्रश्‍नावरुन चीनने देखील पाकिस्तानची साथ सोडली आहे. याला केवळ पाकचे धोरण आणि चुकाच कारणीभूत आहेत. सलमा धरण आणि विद्युत प्रकल्प, झरांज-देलाराम महामार्ग आणि शेजारच्या इराणमध्ये चाबहार बंदराचा विकास आदी विकासकार्याद्वारे भारताने या देशांत स्वतःचा ठसा उमटविला आहे. याद्वारे भारताला अफगाणिस्तानच्या बिन-पश्तून भागात प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात यश मिळत आहे; दुसरीकडे इराण-अमेरिका संबंध सुधारण्याच्या मार्गावर असल्यामुळे तिथेही पाकिस्तान एकाकी पडत आहे. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांमुळे एफएटीएफ या आर्थिक कृती दलाकडून काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. काहीही करा पण दहशतवादाचा वापर करू नका, असा कडक संदेश जागतिक नेत्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला आहे. याचे श्रेय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या रणणीतीलाच द्यावे लागेल. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे विदेश दौरे टीकेचा विषय ठरत होती मात्र त्यांचे फलित आता मिळत आहे. गेल्या पाच वर्षात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण केला आहे. याचीच परिणीती कलम ३६०च्या निमित्ताने आली. याबद्दल नरेंद्र मोदी यांचे व त्यांच्या टीमच्या कुटनीतीचे अभिनंदन केलेच पाहिजे.

Post a Comment

Designed By Blogger