इनकमिंग, आऊटगोईंगमध्ये निष्ठावंतांची घुसमट!

लोकसभा निवडणुकांपासून अन्य पक्षातील नेत्यांचे भाजपात इनकमिंग सुरु असून आता तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मेगा भरती’ करण्याचा आगळावेगळा रेकॉर्ड भाजपाच्या नावे लिहीला गेला. लोकसभा निवणुकीत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक, काँग्रेसचे  नेते कालिदास कोळंबकर यांच्यासह नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या इनकमिंग, आऊटगोईंगच्या राजकारणात बेरीज-वजाबाकीची आकडेमोड करत केवळ संख्याबळावर जोर दिला जात आहे. परंतू दुसरीकडे तिकीट कोणाला मिळणार? यावरुन आतापासून धुसफूस सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात नेमकं काय ठरलयं? याचाही उलगडा होत नसल्याने राज्यात राजकीय गोधळ सुरु झाला आहे.


काँग्रेस व राष्ट्रवादीला भगदाड 

लोकसभा निवडणुकीनंतर देशात अनेक राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधकांना फोडून त्यांना आपल्याकडे घेण्याची नवी वृत्ती राजकारणात बोकाळू लागली. नजिकच्या काळात गोवा, कर्नाटक ही त्याची मूर्तीमंत उदाहरणे म्हणता येतील. एखाद्या पक्षातून निवडणूक लढवल्यावर त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार्‍यांवर अंकुश बसवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याची आखणी करण्यात आली आहे. परंतु आज या कायद्याची काय अवस्था आहे? या काद्यातल्या त्रुटीचा पुरेपूर फायदा उठवत अनेक लखोबांनी या कायद्याची पुरती वाट लावून टाकली. या कायद्याद्वारे पक्षाच्या एक तृतियांश सदस्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडल्यास किंवा ते दुसर्‍या पक्षात गेल्यास, ते अपात्र ठरत नाहीत. या अपवादाचा लाभ घेत छोटे प्रादेशिक पक्ष सहजपणे फोडले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा प्रकार सर्र्‍हासपणे दिसून येतो मात्र आता त्याची लागण आमदार व खासदारांना मोठ्या प्रमाणात झाली आहे. पक्षांतरामुळे केवळ लोकशाहीची चेष्टा होते असे नाही तर ज्यांच्यासाठी ही लोकशाही अस्तित्वात आली त्या लोकांचीही फसवणूक होते. याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. यासाठी पक्षात माझी घुसमठ होते, समाजाच्या विकासासाठी पक्ष बदलला, अशी अनेक गोंडस कारणे देवून सर्वसामान्य मतदारांच्या डोळ्यात धुळफेक केली जाते. निष्ठा विकाव्यात त्या गतीने पक्षांतर बंदीची पायमल्ली केली जाते. ज्या पक्षाच्या विरोधात निवडून आलो, त्याच पक्षाच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालायला या लोकप्रतिनिधींना काहीच वाटत नाही. लाज काढून ठेवल्यागत हे नेते एकमेकांचे गोडवे गाऊ लागतात. सध्या हेच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. भाजपाने तर फोडाफाडीचा सपाटा लावला असून यात काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चिंतेत भर 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला भगदाड पडले. सातारा जावळीचे आमदार व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे व पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे यामुळे राष्ट्रवादीला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत मात्र सध्यातरी त्यांना यश मिळतांना दिसत नाही. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे जोरात सुटले विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजप, शिवसेनेची कास धरणार्‍या नेत्यांची संख्या जास्त आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. भाजपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून कांग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत आहेत. त्यात आता राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनीही असाच दावा केल्यानं विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मंत्री महाजन यांचा दावा धक्कादायक असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जवळपास ५० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे. 

असंतुष्टांना घेण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न 

पलटवार करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदेखील त्यांच्या पध्दतीने रणणीती आखेल, हे निश्‍चित आहे. यात प्रामुख्याने ज्येष्ठ आमदार किंवा पक्षाच्या नेत्यांना भाजप आणि शिवसेनेचे आकर्षण वाटू लागल्याच्या पाश्वभूमीवर या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये भाजप किंवा शिवसेनेतील प्रभावी असंतुष्टांना घेण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न असू शकतो या पार्श्‍वभूमीवर काही मतदारसंघांमध्ये नव्या चेहर्‍यांचा शोध घेतला जात आहे. काही मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिकांचे सदस्यत्व चार-चार वेळा काही जणांनी भूषविले आहे. अशांना प्रस्थापित नेत्यांमुळे संधी मिळत नव्हती. अशा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा विधानसभेसाठी विचार केला जाऊ शकतो. यामुळे नव्या राजकीय समीकरणांचा उदय होईल. मात्र या आयाराम - गयारामांसारख्या संधीसाधू राजकारण्यांमुळे निष्ठावंताकडे दूर्लक्ष झाल्यास त्यातून होणारे नुकसान कधीच भरुन न निघणारे असेल. प्रामुख्याने भाजपाचा विचार केल्यास हा पक्ष संघटनेच्या बांधणीवर व शिस्तीच्या जोरावर यशोशिखरावर पोहचला आहे. यासाठी अनेकांनी हालअपेष्ठा सहन केल्या. आत पक्षाला सुवर्ण दिवस आल्यानंतर त्याची फळे अन्य पक्षातून आयात केलेल्यांना चाखायला मिळणार असतील तर निष्ठावंताची घुसमठ होणारच!

Post a Comment

Designed By Blogger