कारगिल युध्द; सैन्यदलाच्या शैर्याचे प्रतीक

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला शुक्रवारी २० वर्षे पूर्ण होत आहेत. दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वात उंचीवरच्या भूमीत कारगिलचे युद्ध लढले गेले. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. कारगिल युद्धासह भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार मोठी युद्धे आणि असंख्य चकमकी घडल्या. या सर्व युद्धांत आणि चकमकींमध्ये पाकिस्तानला कधीच विजय मिळाला नाही. इतके होऊनही पाकिस्तानचा युद्धज्वर कमी झालेला नाही आणि नजीकच्या काळात तो कमी होण्याची शक्यता नाही. आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धातून काहीच धडा पाकने घेतला नाही. प्रत्येकवेळी नवी कुरापत काढण्याचा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला आहे. सध्या काश्मीरप्रकरणी अमेरिकेच्या मध्यस्थीचे प्रकरण याचेच उदाहरण आहे. पाकिस्तानने कितीही कुरापती काढल्या तरीही भारतीय सैन्य पाकड्यांना त्यांची जागा (लायकी म्हटले तरी चालेल) दाखविण्यासाठी समर्थ असला, तरी यावर कायमस्वरुपी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.


पाकिस्तानचा मोठा कट ‘ऑपरेशन बद्र’

पाकने भारताशी कायम शत्रुत्व अवलंबले आहे, त्याचे कारण काश्मीर आहे. १९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. इतक्यांदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट प्रत्येकवेळी उधळून लावले आहेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे ‘ऑपरेशन बद्र’. अणुचाचणीच्या मुद्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावे, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या करारानुसार, काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, ‘हम नही सुधरेंगे’ वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. कारगिलचा कट यासाठीच आखण्यात आला होता. भारतापासून आधी सियाचीन व मग लडाख तोडायचे आणि पाकिस्तानी लष्कराने काराकोरमपर्यंत मजल मारून चीनशी हातमिळवणी करायची आणि भारतावर दबाव टाकून काश्मीर पदरात पाडून घ्यायचे. 

भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य

यासाठी पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी अत्यंत काटेकोर योजना आखली होती. श्रीनगर ते लेह या महामार्गालगत असलेल्या सर्व पर्वतीय चौक्या पाकिस्तानी सैन्याने बळकवत या चौक्यांवरून मारा करून श्रीनगर ते लेह या महामार्गावरून सियाचेन व लडाखकडे जाणारी भारताची रसद अडवण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पर्वतांच्या शिखरांवरच्या चौक्या भक्कम संरक्षण यंत्रणा उभारून ताब्यात घेतल्या की, भारताला त्या परत मिळवणे जवळजवळ अशक्यच होते. १०-१५ हजार फूट उंचीवरून चाल करून येणार्‍या भारतीय सैन्याचा धुव्वा उडवणे त्यांना सहज शक्य होते. त्यामुळे या चौक्या पुन्हा ताब्यात घेणे हे सर्वात अवघड आव्हान भारतीय लष्करापुढे होते. दहशतवाद्यांच्या वेशातील पाकिस्तानी सैन्य उंचावरुन कारगिल-श्रीनगर रस्त्यावरून जाणार्‍या लष्कराच्या गाड्यांना रॉकेट लाँचवर टार्गेट केले होते. शत्रू नेमका कुठे आहे ते कळत नव्हते. कारगिल युध्द जिंकण्यासाठी भारतासमोर मुख्यत: दोन पर्याय होते. पहिला, ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा, काश्मीरमध्ये वा इतरत्र आक्रमणाकरवी पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. भारताने १९७१ नंतर सिमला कराराचे काटेकोरपणे पालन केले होते. भारताने आता ताबारेषा ओलांडणे म्हणजे पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते. दोन्ही बाजूंनी भारत कचाट्यात सापडला होता. मात्र जिद्दीच्या जोरावर लष्कराच्या पायदळाने विजयश्री खेचून आणली. साडेसहाशेहून अधिक जवान शौर्य गाजवून अजरामर झाले. यावेळी भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवत विजय मिळवला म्हणून कारगिल युध्दाला प्रचंड महत्त्व आहे. 

जगाला दिला वीरतेचा संदेश 

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला. या युद्धावेळी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आपण पाहिले. सीमेवर लढणार्‍या जवानांसाठी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने प्रयत्न करत होता. अडीच महिने सुरु असलेल्या या युद्धात भारताने ५२७ भूमीपुत्रांना गमावले तर १३०० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. विशेष म्हणजे या युद्धात ज्यांना वीरमरण आले, त्यापैकी बहुतांश जवानांनी वयाची तिशीही पार केली नव्हती. आयुष्यातील उमेदीच्या काळातच या भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान दिले. या शहिदांना शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक उभारले. आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा जवानांनी देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्यांबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वाढावा, याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शानाखाली २६ रोजी ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटालादेखील महत्त्व प्राप्त झाले आहे. कारगिल युध्द म्हणजे भारतीय सेनादलांच्या शौर्य, निग्रह आणि व्यावसायिक कौशल्याचा हा विजय होता. प्रारंभी अपयशाचे संपूर्ण यशात रूपांतर करणारा हा कारगिल संग्राम सैनिकी इतिहासात सदैव अजरामर राहील.

Post a Comment

Designed By Blogger