‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्यानंतर भारतात राजकीय धुराळा उडाला आहे. काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदींचा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे. यात प्रसारमाध्यमेही मागे नाहीत. मात्र ट्रम्प यांचा इतीहास पाहता, वादग्रस्त व खोटे बोलण्यात त्यांचा हात आंतराष्ट्रीय पातळीवरील कोणताच नेता पकडू शकत नाही, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन आपणच इम्रान खान पाकिस्तानचे महत्त्व वाढवत आहोत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या नामांकित व प्रतिष्ठीत वृत्तपत्राचे कौतूक करायला हवे. त्यांनी ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत एक फॅक्टचेक अहवाल प्रकाशित केला आहे. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून जून २०१९ पर्यंत तब्बल १०,७९६ खोटे आणि वादग्रस्त दावे केले आहेत. त्यांनी दररोज सरासरी १२ वादग्रस्त विधाने केली असून त्यातील अनेक विधाने निराधार, भ्रामक आणि खोटी होती. काश्मीर मध्यस्थीचे कथित प्रकरण याच पंग्तीत बसणारे आहे. या विषयावरुन वाद वाढण्याची लक्षणे दिसताच घुमजाव करत काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या स्पष्टीकरणरणामुळे ट्रम्प यांची पुन्हा एकदा नाचक्की झाली.
वादग्रस्त विधानांची परंपरा
अमेरिका म्हणजे जागतिक शक्ती आणि जगाचा तारणहार! अमेरिकेने स्वतःविषयी अशी समजूत करून घेतली आहे, नव्हे इतरांनी तिला तसे संबोधावे आणि आपल्याहून वरचढ कोणी होऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हा पायंडा कधीच तोडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यास काहीसे अपवाद ठरत आहेत. वादग्रस्त विधानांची परंपरा त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून आतापर्यंत कायम ठेवली आहे. एक यशस्वी व्यावसायिक, बिल्डर, टीव्ही निर्माता म्हणून प्रसिध्द असलेल्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून अनेक वादांना तोंड फोडले होते. अनेक वाद, आरोपांनंतरही त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. ट्रम्प म्हणजे अमेरिकी राजकारणात अकास्मातपणे आलेले व उतावळ्या स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे निर्णय अमेरिकी जनतेलाच गोंधळात टाकणारे वाटतात. त्यांचे आंतरराष्ट्रीय निर्णय वादग्रस्त ठरतात. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग व ट्रम्प यांच्यात तर सर्वाधिक वादग्रस्त कोण बोलतो? अशी जणू स्पर्धाच लागली होती. किम यांनी ‘अणुबॉम्बची कळ माझ्या पटलावर आहे’, असा चिथावणीखोर संदेश पाठवल्यावर अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उतावळेपणाने प्रत्युत्तर दिले की, माझ्याही पटलावर महाशक्तिशाली बॉम्बची कळ आहे. या बालीशपणाच्या आरोप-प्रत्यारोपांनी दोन्ही नेत्यांची मानसिक वैद्यकीय चाचणी करण्यापर्यंत वाद रंगला होता. मुळात किम यांचा स्वभाव व उत्तर कोरियाचा इतीहास पाहता त्यांच्या विधानांचे फारसे काही वाटले नाही मात्र महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून अशी अपेक्षा निश्चितच नव्हती.
उतावीळपणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला शोभणारा नाही
ट्रम्प सत्तेत येण्याच्या आधीपासूनच वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होते. सत्तेत आल्यानंतरही ट्रम्प यांनी वादग्रस्त विधाने करणे सुरुच ठेवले आहे. ट्रम्प यांनी सर्वाधिक वादग्रस्त विधाने मेक्सिकोतून अमेरिकेत होणार्या स्थलांतरांवर केली आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबद्दल सर्वाधिक फसवे दावे ट्रम्प यांनी केले आहेत. ट्रम्प यांच्या विधानाशी सरकारच्या भूमिकेचा संबंध नसल्याची स्पष्टीकरणेही अमेरिकन सरकारने वारंवार दिली आहेत. आतापर्यंत परराष्ट्र धोरण, जेरुसालेमचा प्रश्न, कृषी उद्योग या क्षेत्रांबद्दलही असे खोटे व भ्रामक दावे करणार्या ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी नाक खूपसले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जर माझी मदत हवी असेल तर मला मध्यस्थी करणे आवडेल. जर माझी मदत हवी असेल तर मला सांगा.’ असे सागंत ‘काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी यांनीही माझी मदत मागितली होती,’ असा दावा केला. मुळात कश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या चर्चेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांतील चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. त्यामुळे दोघांत तिसर्याची गरज नाही. या विषयावर सिमला करार आणि लाहोर डिक्लेरेशननुसारच चर्चा होईल, असे स्पष्ट असतांना ट्रम्प यांचा उतावीळपणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला निश्चितच शोभणारा नाही.
भारताला अडकविण्यासाठी पाकिस्तानने नवी खेळी
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने हा विषय सोडविण्यासाठी भारताला कोणाचीही मदत नको, आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने हिच भूमिका कायम ठेवली आहे. पाकिस्तानसारख्या देशाबरोबर सर्वच वाद हाताळण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे. या विषयावर भारत नेहमीच वरचढ ठरत असल्याने पाकिस्तान हा प्रश्न वारंवार अमेरिकेस आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत मदतीची भीक मागतो. मात्र भारताने कधीही कोणत्याही देशाला या विषयासंदर्भात मध्यस्थी करण्याची विनंती केलेली नाही. आता पुन्हा एकदा भारताला अडकविण्यासाठी पाकिस्तानने नवी खेळी खेळली आहे. इम्रान खान यांनी केलेली खेळी नीट लक्षात घेतली पाहिजे. भारताने यापासून सावध राहिले पाहिजे. परंतु याच विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेला गदारोळ तितकाच महत्त्वाचा ठरतो. जाणीवपूर्वक हा विषय पाकिस्तानकडून उपस्थित केला गेला आहे म्हणून त्याच्या जाळ्यामध्ये आपण अडकणार नाही याची दक्षता भारताने घेतली पाहिजे. याबाबत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्टीकरण जरी दिले असले तरी ते पुरेसे ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देणे तितकेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये याबाबतचे निवेदन पंतप्रधानांकडून होणे त्याला आंतरराष्ट्रीय दृष्ट्यासुध्दा वेगळे महत्त्व आहे. अशावेळी इम्रान खान किंवा ट्रम्प काय म्हणतात याहीपेक्षा भारताचे पंतप्रधान मोदी काय म्हणतात हे सर्वांसमोर येणे तितकेच गरजेचे ठरते.
Post a Comment